कृष्णेकाठचं "कोळे नृसिंह" मंदिर
विष्णूचे वर्णन ऋग्वेदापासून मिळते आहे. सृष्टीच्या पालनकर्त्यांचा मान तिला मिळाला. या कर्तृत्वविशेषाला अनुसरूनच तिला युगायुगात प्रगट व्हावे लागले. जेव्हा जेव्हा दुष्टशक्ती बळावत असते, तेव्हा तेव्हा सुष्टशक्तींना बळ देण्यास्तव श्रीविष्णूला पृथ्वीवर उतरावे लागत असे. या उतरण्यालाच अवतार म्हणायचे. मात्र सगळय़ाच अवतारासंबंधात एकच अनुस्यूत गोष्ट होती ती म्हणजे पृथ्वीचे रक्षण, याला कलीचा अवतार अपवाद समजावा. नृसिंह अवताराची पुराणात कथा येते त्याप्रमाणे विष्णुभक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी नृसिंह अवतार झाला असे मानले जाते. नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. या विषयीची अशी आख्यायिका प्रचलित आहे कि हिरण्यकश्यपू या राक्षसाने तपश्चर्येने ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले कि ‘ हे भगवन, तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री,ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे." ब्रह्मदेवांनी त्याला हे सर्व प्रदान केले.परंतु विष्णूने मनुष्य व सिंह असे मिश्र रूप (त्याला मिळालेल्या वरानुसार ते रूप मनुष्यही नव्हते आणि प्राणीही नव्हते) धारण करून संध्याकाळच्या वेळी दारामध्ये उंबऱ्यावर बसून हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर उताणा पाडून नखांनी त्याचे हृदय विदीर्ण केले. तर असे नृसिंहाचे रूप.
याच रुपाला अनुसरुन नृसिंहाची स्वतंत्र मंदिरे उभारली गेली, विशेषत: दक्षिण भारतात. महाराष्ट्रातही ती उभारली गेली असावीत हे त्याच्या उत्कृष्ट घडणींच्या अनेक मूर्तीच्या उपलब्धतेवरून म्हणता येते. आज नृसिंहाची प्राचीन मंदिरे महाराष्ट्रात अभावानेच दिसतात, मात्र त्या काळच्या अनेक मूर्ती उपलब्ध आहेत. नृसिंह कमीतकमी चार अधिकात अधिक म्हणजे सोळा भुजांचा असतो. अशीच सुंदर मूर्ती आणि तिचे मंदिर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कोळे नरसिंहपूर या गावात उभे आहे.
| मंदिरातून दिसणारे कृष्णेचे मनमोहक दृश्य |
पुणे-बेंगळुरू महामार्गावर कराड वरून रेठरेबुद्रुक या गावावरून कृष्ण सहकारी साखर कारखाना गाठायचा येथूनच कोळे नरसिंहपूरला रस्ता जातो.या गावाचं महत्व केवळ मंदिरामुळे नाही तर या गावावरून कृष्णा नदीचं रुंद पात्र स्पर्शून गेलंय. या नदीवर येथे फारच सुरेख घाट बांधला आला आहे.सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी या घाटावर उभे राहून इथलं अथांग आणि शांत पाणी पाहण्यासारखा दुसरा योग नाही. तस हे गावही छोटेसे आहे.पण आता हे गाव नृसिंह मंदिरामुळे प्रसिद्ध पावलंय. मंदिरात आत जाण्यासाठी दगडी बांधकामातील प्रवेशद्वार लागत.
| कृष्णेच्या पात्रात मासेमारी करताना युवक |
मंदिराच्या बाहेरील भिंतीवर कोरलेला मारुती
|
हे पार करून आत गेलो कि मंदिराचा नव्याने बांधलेला सभामंडप लागतो. याच
सभामंडपात मंदिराचे वर्णन करणाऱ्या काही सुंदर ओळी लिहिल्यात...
कोळे नृसिंहपूर
ख्यात प्रसिद्ध क्षेत्र I
कृष्णा तटी,सुबक घाट,पवित्र पात्र II
देवालयी,परम गुप्त
भुयार श्रेष्ठ Iमूर्ती पुरातन ,अतीव नृसिंह
ज्येष्ठ Ii
जवळ नृसिंह ,कर षोडश पाच फूट I कोरीव काम अति
उत्कट नीट नेट Ii
पूर्णत्व शिल्प
प्रभू मूर्ती ,दशावतार I हातावरील शुभ
चिन्ह किरीट ताट II
या काव्य पंक्ती
मंदिराचं समर्पक वर्णन करतात.ह्या वाचून पुढे जायचं .जून मंदिर याच्याच पुढे आहे.
दगडी दीपमाळेनंतर लगेचच एक वाट खाली भुयारात उतरते. आणि आपण आश्चर्यचकित होतो.येथे
काही पायऱ्या लागतात . त्या सरळ खाली जातात. या पायऱ्यांवर एक शिलालेखही लिहिलेला
आढळतो. तो म्हणजे,
"भानू तुकदेव त्याचा पुत्र गोपाळ भास्कर त्याचा पुत्र भानू गोपाळ " असा आहे.या पायऱ्या उतरून आत गेलो कि सरळ गाभाऱ्यात पोहोचतो अन आपल्या समोर काळ्या पाषाणातील १६ हातांची नृसिंहाची सर्वांगसुंदर मूर्ती दिसते आणि आपण नतमस्तक होतो.
| गाभाऱ्यात असणारी नृसिंहाची मूर्ती |
या मूर्तीची सुबकता आणि नजाकत खरोखरीच पाहण्यासारखी आहे. या मूर्तीचे चार हात भग्न झालेले दिसतात.पण उर्वरित डाव्या हातात ढाल,धनुष्य,पाश,वाजत हि अस्त्र दिसतात. तर एका हाताने हिरण्यकश्यपू राक्षसाचे डोके धरलेले दिसते तर दुसऱ्या हाताची नखे त्याच्या पोटात खुपसलेली दिसतात. असं म्हणतात कि इ.स १०७ मध्ये कृष्णेच्याच डोहात या मूर्तीचा शोध राजा कौंडिल्या याला लागला आणि त्यानेच या मूर्तीची स्थापना केली.नंतर यादव काळातही राजा रामदेवराय यानेही मंदिराचे बांधकाम केल्याचे इतिहासकार सांगतात.सातारचे छत्रपती शाहू महाराज यांनी जमीन या देवस्थानाला दिल्याचे सांगण्यात येते.असो नृसिंहाचे हे रुप साठवूनच बाहेर पडायचे. हे मंदिर तीन मजल्यांचे असून सर्वात खाली भुयारात हि मूर्ती आहे तर याच मूर्तीच्या बरोबर वर म्हणजे दुसऱ्या मजल्यावर वृंदावन दिसते. असे म्हणतात कि या वृंदावनाच्या कोनाड्यातून टाकलेले किंवा वाहिलेले नाणे हे मूर्तीच्या पायाशी जाऊन पडते.
असो मंदिर छोटेसेच आहे पण मन तृप्त करणारे आहे.
कृष्णा नदीवरच्या घाटाने या मंदिराला वेगळाच सौंदर्य प्राप्त झालाय.हे डोळ्याने
एकदातरी अनुभवावं असंच....
| मंदिरातून दिसणारे कृष्णेचे मनमोहक दृश्य पूर्वप्रकाशित साप्ताहिक लोकप्रभा |


Khup Chan
ReplyDeleteMast mahiti ani Murti sudhdha 👌👌
ReplyDelete