कऱ्हे पठारावरचा भक्तीचा मळा !!

     सासवड हे नाव आपण बऱ्याच वेळा ऐकलं आहे किंवा या गावावरून पुढे गेलेलोदेखील असू. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरच हे महत्त्वाचं गाव. पौराणिक कालापासून देवांची संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी कऱ्हामाई भोगावती (चांबळी) यांच्या पवित्र संगमाच्या उत्तर तीरावर वसलेली आहे. पुण्याच्या शेजारीच उभी असलेली सासवडचे भूमी एक वेगळाच आब राखून उभी आहे. पुणे जिल्ह्यातून विविध मार्गाने या सासवडला येता येते. या विविध मार्गाने आपल्याला  साबगरखिंड, पांगारखिंड, पानवडीचीखिंड, बोपदेव घाट, पुरंदर घाट, भुलेश्वरघाट, दिवे घाट, शिंदवणेघाट हे घाट लागतात.बापदेव घाटाजवळ एक दक्षिणोत्तर जाणारी डोंगररांग दिसते. पण पुढे हीच डोंगर रंग दोन भागात विभागली जाते ती म्हणजे सिंहगड रांग पुरंदर रांग .ह्या तिन्हीही रांगामुळे एक मोठे विस्तृत पठार तयार झाले आहे, या पठाराला कऱ्हे पठार म्हणतात.याच कऱ्हे पठारावर सासवड हि पुण्यभूमी वसलेली आहे.फार प्राचीन काळी ब्रह्मदेवाने या पुण्यभूमीत गहन तप केले. ही भूमी ब्रह्मदेवाच्या पदस्पर्शाने पुनीत झाली म्हणून तीस त्या काळी ब्रह्मपुरी म्हणत.

ब्रह्मपुरीप्रमाणेच सासवडला ज्ञानेश्वरांच्या काळी संवत्सर असेही नामाभिधान होते असे अभ्यासक म्हणतात . श्रीसंत सोपानमहाराजांच्या समाधीच्या प्रसंगी अनेक अभंगांतून याचे पुरावे देखील  आपणांस मिळतात. तर असे प्राचीन सासवड.पुढे इतिहासात सुद्धा प्रसिद्ध पावले. शिवरायांनी स्वराज्याचा पाया इथेच घातला. मोगलांशी लढता लढता स्वराज्याचा पहिला सरसेनापती वीर बाजी पासलकर याने येथेच देह ठेवला. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला पुरंदर किल्ला येथून जवळच आहे.पण याच सासवड जवळ भक्तीने नटलेली खूप सुंदर ठिकाणे आहेत. त्याच ठिकाणांचा करून घेतलेला हा परिचय.

नद्यांच्या संगमावरचं "संगमेश्वर"

संगमेश्वर मंदिर हे नावाप्रमाणेच कऱ्हा आणि भोगावती नदीच्या संगमावर उभे आहेयादव काळात आणि नंतर पेशवाईच्या काळात जीर्णोध्दारीत झालेल्या या मंदिराचं लावण्य जबरदस्तच आहेमंदिर पूर्वाभिमुख असून समोरच दोन कोपऱ्यात दोन दगडी दीपमाळा दिसतात.मंदिराची रचना हि नंदीमंडप ,सभामंडप आणि गाभारा अशी असून यातला नंदी मात्र आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाहीदगडात कोरलेला हा सालंकृत नंदी खूपच सुंदररीतीने घडविला आहे.सभामंडपाला उत्तर आणि दक्षिण अशी दोन प्रवेशद्वारे असून हा मंडप सोळा अश्या आखीव आणि रेखीव दगडी खांबांवर तोललेला आहेगाभाऱ्यातील शिवपिंडीही खासचमंदिराच्या बाह्य भिंतीवरची घडीव दगडांची नक्षी आश्चर्य चकित करणारी आहेमंदिरावरील चढत्या क्रमाचे कळस/शिखर यांची रचना वस्तू स्थापत्याचे सुंदर दर्शन घडवितात.गावातूनच या मंदिराला जाण्यासाठी रस्ता आहेपंचक्रोशीत हे मंदिर प्रसिद्ध आहे.


संगमेश्वर मंदिर 

संगमेश्वर मंदिराचे आकर्षक शिखर 

संगमेश्वर मंदिर 

संगमेश्वर मंदिर 

संगमेश्वर मंदिरातील नंदी



कानिफनाथांची महती

पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील बोपदेव म्हणजे या डोंगराच्या पायथ्याचे गाव! बोपदेव घाटातूनच आपण पुढे सासवडकडे जातो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून निघालेली एक उपरांगभुलेश्वरया नावाने ओळखली जाते. ही उपरांग सिंहगडापासून ते यवतपर्यंतच्या भुलेश्वर या ठिकाणापर्यंत पसरलेली दिसते. याच रांगेवर कानिफनाथाचा डोंगरसुद्धा विसावला आहे. या डोंगराचा भूगोल फारच सुंदर आहे. कारण पुण्यापासून सासवडच्या दिशेने निघालेले दिवे आणि बोपदेव हे दोन घाट या डोंगराच्या दोन्ही बाजूंनी गेलेले आहेत.

त्यामुळे ज्यांना डोंगर चढण्याचा आनंद आणि रोमांच अनुभवायचा असेल त्यांनी दिवे घाटाचा पर्याय निवडायचा. याच रस्त्यावर वडकी नावाचे गाव लागते. या वडकी गावातच आपल्या गाडय़ा लावायच्या आणि थेट डोंगरालाच भिडायचे. ही वाट -यापैकी मळलेली असल्यामुळे चुकण्याची शक्यता तशी कमीच! वयस्कर महिला अन् लहान मुले जर असतील तर बोपदेव घाटाचा सोपा पर्याय निवडायचा. या घाटवाटेने आपण थेट बोपदेव गावात पोहोचतो. तेथूनच एक गाडीरस्ता या डोंगरावरच गेला आहे. त्यामुळे चढाई अजिबातच करावी लागत नाही. गाडीरस्त्याने आपण माथ्यावर पोहोचतो. येथेही -यापैकी झाडी असल्याने थंडावाही अनुभवायला मिळतो. पावसाळ्यात तर या डोंगराला आणखीन बहर येतो. येथला सारा परिसर हिरवागार होऊन जातो.असो. एकदा का डोंगरावर आलो की, कानिफनाथाचे देऊळ समोर दिसते. काही पाय-या चढून आपण मंदिर आवारात प्रवेश करतो. दर्शनाची ओढ तर मनात असतेच, परंतु त्यापूर्वीही एक आश्चर्य आपल्या पुढय़ात उभं असतं. ते म्हणजे कानिफनाथ मंदिराच्या गाभा-यात पोहोचण्याचा अद्भुत मार्ग! येथे दर्शनासाठी आपल्याला एक दिव्यपरीक्षा पार करूनच पोहोचावं लागणार असते. ते दिव्य म्हणजे अवघ्या एक फूट बाय एक फूट आकाराच्या छोटय़ा खिडकीतून आतमध्ये प्रवेश करण्याचं! या खिडकीपाशी पोहोचलं की मग आपल्या मनात एक शंका उपस्थित राहते.ती म्हणजे एवढय़ाशा खिडकीतून आपण आत जाणार कसे..? परंतु आत जाण्याची एक पद्धत आहे. विशिष्ट कोनामध्ये तिरके होऊन आपले शरीर आत ढकलायचे असते. हे करताना येथे मात्र डोकेच सर्वप्रथम आत जायला हवे आणि पाय मागाहून. अन्यथा याच्या उलटे केले की या खिडकीत आपण अडकलोच असं समजायचे. अशी येथे भाविकांची अपार श्रद्धा आहे. ही सारी कृती करताना मनात मात्र श्रद्धा असायलाच हवी, तरच आपल्याला आत जाता येते. कारण या मंदिराच्या एका भिंतीवर लिहिलेलेच आहे की, ‘‘असेल श्रद्धा ज्याच्या उरी, त्यासी दिसे कानिफनाथ मुरारी’’ या उक्तीनुसार कितीतरी जाड आणि उंचीची माणसे सहजपणे आत जात असतात. आपणही असेच दर्शन करून मन तृप्त करायचे.दर्शनानंतर मंदिराबाहेरुन दिसणारा पुणे शहराचा देखावा मात्र लाजवाब!







कानिफनाथ मंदिरात जाताना करायला लागणारी कसरत 

कानिफनाथ मंदिर 

कानिफनाथ डोंगरावरून दिसणारे सुंदर दृश्य 

कानिफनाथ डोंगरावरून दिसणारे सुंदर दृश्य 

कानिफनाथ डोंगर 




चांगावटेश्वर मंदिर

योगी चांगदेवांनी भूमी म्हणून हा परिसर सर्व वैष्णवांमध्ये ओळखला जातो.अश्या या योग्याची पाऊले चांगावटेश्वर मंदिरात अली होती असे इथले ग्रामस्थ सांगतात.खरतर चांगावटेश्वर आणि संगमेश्वर हि दोन्हीही मंदिरे सर्वसामान्यांच्या नजरेला सारखीच वाटतील. पण चांगावटेश्वर मात्र स्वतःच अस्तित्व राखून आहे एव्हढं मात्र नक्की.सासवड कापूरहोळ रस्त्यावर असलेलं हे मंदिर नितांतसुंदर आहे मात्र नक्की.

चांगदेव हे योगमार्गातील असामान्य पुरुष होते.आपल्या सामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगल्याचे सांगितले जाते.यांच्या गुरुचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर म्हटले जाते.चांगदेवांनीच या मंदिरची आणि इथल्या शिवलिंगाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. आजूबाजूला भरगच्चं झाडी आणि मंदिर परिसरात फुलवलेली बाग  पाहून आपल्याला आल्या आल्या धक्काच बसतो. इथलं केलेलं संवर्धन आणि स्वच्छतेचं आपल्या मनात घर करून राहतं. मंदिराची वस्तू हि जमिनीपासून पन्नास फूट असल्यामुळे अगदी रस्त्यावरूनही सहज दिसते.मंदिराभोवती तटही बांधलेला दिसून येतो.पायऱ्या चढून आपण तटामधील प्रवेशदारातून मंदिराच्या स्थापत्यविश्वात हजर होतो.दगडी बांधकामात घडवलेलं हे प्राचीन मंदिर हेमाडपंथी धाटणीचे वाटते.मंदिराच्या समोरच दोन दीपमाळा सौंदर्यात भर घालताना दिसतात. मंदिराची मूळ वास्तू दगडात घडवलेली होती पण कालौघात झीज झाल्यामुळे पेशवाईच्या काळात कळसाचा जीर्णोद्धार करण्यात आला .मंदिराची सभामंडप,गर्भगृह,मध्यगर्भगृह अशी ढोबळ रचना दिसते.मन्दिर सभामंडपात नंदीची अतिशय आकर्षक मूर्ती दिसते. सभामंडपात येण्यासाठी उत्तर आणि दक्षिण दिशेलाही दरवाजे दिसतात.दोन्हीही सभामंडप एकूण ३० दगडी खांबावर उभे आहेत.या खांबांची रचना गोलाकार आणि चौकोनी अश्या मिश्र स्वरूपाची आहे.या खांबावरच्या कलाकृती पाहणे म्हणजे मंदिर भेटीचं सार्थकच ठरेल इतकं यावर शिल्पवैभव कोरलेलं दिसून येते.मानवी जीवनाच्या निरनिराळ्या प्रसंगातील भावना येथे प्रसंगांमधून चितारलेल्या आहेत.यामध्ये ताक घुसळणारी स्त्री,कुशीत खेळणारे मल्ल ,नृत्य करणाऱ्या नर्तकी तसेच प्राणी आणि पक्षी विश्वही कोरलेले आहेत. महिशासूरमर्दिनीचे युध्धशिल्पही खासच.गाभार्यतील शिवपिंडीचे दर्शन घेऊन आलो कि येथील स्वच्छता खूपच भावते. मंदिराच्या शेजारिच चाफ्याचे झाड बहरलेलं दिसते, काळ्या पाषाणातील मंदिर आणि चाफ्याचे झाड हे एकत्रित दृश्य पाहणे म्हणजे मंदिर भेटीचा उत्कर्षबिंदूच ठरावा.

तीन शिखरांचे चांगावटेश्वर मंदिर 

चांगावटेश्वर मंदिर 

चांगावटेश्वर मंदिर सभामंडप 


चांगावटेश्वर मंदिरात फुललेला सुंदर चाफा  


नारायणेश्वर मंदिर

            सासवड-कापुरहोळ रस्त्यावर पश्चिमाभिमुख असलेलं हे मंदिर चालुक्य कालखंडात बांधले गेल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या भोवताली छोटीशी तटबंदी असून या तटबंदीच्या दरवाजातूनच आपला या मंदिरामध्ये प्रवेश होतो. आत प्रवेश करताक्षणीच येथली शांतता आपल्याला लगेचच जाणवते. मंदिराच्या बाहेरच हनुमंताची एक सुरेख मूर्ती दिसते. या मूर्तीत हनुमानाच्या पायाखाली एका राक्षिनीला दाखविण्यात आले आहे. मंदिराचे दगडी बांधकाम आजही शाबूत आहे. मंदिराबाहेरील नंदीमंडप मात्र कोसळलेल्या अवस्थेत असून त्याचे फक्त खांब तेवढे शाबूत दिसतात. सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी मंदिराची ढोबळ रचना दिसते. मंदिराच्या द्वारपट्टीवर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले आहे. यामध्ये एक गणेशाची प्रतिमाही कोरलेली दिसते. मंदिराचा सभामंडप हा मुख्यत्त्वे चार खांबावर उभा आहे. छताला आधार देणाऱ्या यां खांबाची रचनाही पाहण्यासारखी आहे. छताकडे या खांबाच्या टोकावर यक्ष दिसतात. आत सभामंडपामध्ये उत्तरेस आणि दक्षिणेस देखील दोन प्रवेशद्वारे दिसतात. चांगा वटेश्वर, चांगा वटेश्वराचा श्रीधर योगी अंचालध्वज असे तीन शिलालेख वेगवेगळ्या जागेवर कोरलेले आहेत. असे म्हणतात की, चांगदेव महाराज आणि त्यांच्या शिष्यगणांनी या नारायणेश्वर मंदिरात तपश्चर्या केली होती. सभामंडपानंतर आपण गाभाराच्या समोर म्हणजेच अंतराळकक्षात येतो. गाभाऱ्यात प्रवेश केला की, आपल्याला एक वर्तुळाकार खड्डा दिसेल. यात तीन पिंडी आहेत, त्यावर काचेचे आवरण लावलेले आहे. येथे नतमस्तक व्हायचे अन फेरी मारण्यासाठीबाहेर यायचे.

मंदिराच्याबाह्यभाग हा अतिशय सुंदर असून दुमडत गेलेल्या दगडाच्या घडीसारखा वाटतो. दगडाची घडीवर घडी असलेली ही नक्षी मात्र डोळ्यांचे पारणेच फेडते. या दगडांच्या भिंतीवरचा जुना कळस कालौघात कोसळला असून त्या ठिकाणी नवा कळस बांधलेला दिसतो. एकसुंदर कातळी शिल्प पहिल्याचा तुम्हाला निश्चितच आनंद मिळेल यात शंका नाही.

 

नारायणेश्वर मंदिर 

                                                                                                          

नारायणेश्वर मंदिरातील नक्षीदार खांब 

             

नारायणेश्वर मंदिराची आकर्षक रचना 

नारायणेश्वर मंदिर 

 

Comments

Popular posts from this blog

गौताळा अभयारण्याचे अंतरंग

पळशी ...एक सुंदर गाव !!

जल-व्यवस्थापनाचा आविष्कार असलेली "मंचरची बारव"