आंदर मावळची अपरिचित "पद्मावती लेणी"
सह्याद्रीच्या डोंगररांगांवर कितीतरी लेण्या लपलेल्या आहेत. त्यातील काही लेण्या जागतिक नकाशावर पोहोचल्या, काही लेण्या वीकेंडची पर्यंटनस्थळे म्हणून पसंतीस उतरल्या. पण तरीही कित्येक लेण्या स्वत:चं अस्तित्व कसंबसं सांभाळत आजही पर्यटकांच्या प्रतिक्षेत आहेत. येथे पोहोचण्याच्या वाटा या खडतर तर आहेतच शिवाय भटकंतीचा कसही पाहणाऱ्या आहेत. पण तरीही त्यांना दुर्लक्षून चालणार नाही. अशा अपरीचित लेण्यापैकीच एक पद्मावती लेणी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आंदर मावळात उभी आहे. त्याच लेणीची ही सफर.
| डोंगराच्या पोटात दिसणारी पद्मावती लेणी |
सह्याद्रीच्या रांगेत उभ्या असलेल्या डोंगरांचं कवतिक हे काही तुम्हा-आम्हाला सांगायची गरज नाही. एक मात्र खरं. सह्याद्रीनं आपल्या पदरी टाकलेलं दान मात्र कधीही न संपणारं आहे.आजही तुम्ही सह्याद्रीच्या कुशीतल्या ग्रामीण भागात गेला की, तिथे तुम्हाला जाणवेल की, छोट्या टेकड्यांना आणि डोंगरांनाही त्यांनी वेगळी नावे दिलीत आणि त्यांना दंतकथेत सामावून घेतलयं. या सह्याद्रीवर फिरण्यासारखे बरेच आहे. पण आपण मात्र नेहमीच्याच आणि प्रसिद्ध ठिकाणांकडे वळत असतो. त्यामुळे बरीचशी आडवाटेवरील ठिकाणे दुर्लक्षिली जातात. भटकंतीच्या विश्वात मात्र हीच अप्रसिद्ध ठिकाणे मानाचे स्थान घेऊन उभे आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आंदरमावळात असलेलं "पद्मावती लेणी' हे ठिकाण असेच काहीस अपरिचित आणि अनवट ठिकाण! या ठिकाणाची माहिती माझ्या ट्रेकर मित्राने मला सांगितली असल्यामुळे आम्ही सारेचजण या ठिकाणाबाबत उत्सुक होतो. या उत्सुकतेपोटीच पुणे जवळील मावळ तालुक्यातील वडगाव मावळ हे गाव गाठलं. येथूनच एक रस्ता तळेगाव एमआयडीसीला जातो. या रस्त्याने आंबळे गावावरून निगडे गाव गाठायचं. निगडे हे तसंच बऱ्यापैकी मोठं गाव आहे. या निगडेत आम्ही तेव्हा चहुबाजूंनी वेढलेल्या या गावाला विकासाची बऱ्यापैकी चाहुल लागलेली दिसत होती. मोठमोठे प्रकल्प, पवनचक्क्यांनी या गावचा चेहरामोहरा पालटलेला दिसत होता. याच्याच मागील बाजूस असलेली डोंगराची एक प्रचंड आडवी भिंत लक्ष वेधून घेत होती. या भिंतीच्या बरोबर मध्यभागी लेणीच्या खूणा दिसून येत होत्या. गावात लेणीबाबत चौकशी केली तर कोणास सांगताही येत नव्हते. आम्हालाही आश्चर्य वाटले. ही माणंस इतकी अनभिज्ञ कशी? पण आमच्यातीलच एकाने विचारले की, पद्मावती देवीचं मंदिर डोंगरात कोठे आहे? तेव्हा एका वयस्कर माणसाने बोटानेच ती डोंगराच्या मध्यभागी असलेली खाचेची जागा दाखविली. यानंतर तो माणूस म्हणाला, कुठ दर्शनाला चालला का? आम्ही होकारार्थी मान हलवली. त्यावर तो उत्तरला ""अरे पोरांनो लई अवघड जागा हाय ती. असं वंगाळ धाडस करू नगा! तिथवर जायाला लई हिम्मत लागतीया." आम्ही त्यांना कसबसं सांगून रस्ता विचारून घेतला व तेथून निघालो.
ती लेणी म्हणजे या गावकऱ्यांसाठी एक श्रद्धेचं मंदिर होतं तर.अनवट आणि अप्रसिद्ध ठिकाणे पाहण्यात एक रोमांच असतो. कारण तिथे वर्दळ नसते आणि फारशी माहिती उपलब्ध नसते. अशामुळे आपली उत्सुकता ताणून धरली जात असते. आम्ही निगडे गावातच गाड्या लावल्या. अन् अर्ध्या तासात मोकळे पटांगण सोडून गर्द झाडीत शिरलो. दाट सागवानांच्या झाडांनी फुललेली ही देवराई खरतर घनदाट आहे. गर्द अशा या वनराईत आलो की, मग जीवाला कस हायसं वाटतं. येथून दहा मिनिटांतच आपण तीव्र आणि अंगावर येणाऱ्या चढाईपाशी येतो. हा टप्पा म्हणजे या चढाईचा कठीण भाग! कारण ही वाट अक्षरश: घसऱ्याची आहे. या बाजूला कारवीची झाडे आहेत. या झाडांचाच आधार घेत आणि सावकाश चढत आपण एका लोखंडी शिडीखाली येतो. या शिडीमुळे आपली पुढील चढाई सुखकर होते.
एका अवघड टप्प्यावर लावलेली लोखंडी शिडी
|
या टप्प्यानंतर आपण कातळ-कोरीव पाऱ्यांसमोर येतो. अशा खोदीव पायऱ्या पाहून क्षणभर आनंदच वाटतो. असं कातळात खोदलेलं हे काम इतिहास शेकडो वर्षांनी मागे नेत असते आणि अशा कलाकृती त्यावेळचे कलारूपी महत्त्व सांगत असतात. असे विविध टप्पे पार करून आपण एकदाचे डोंगराच्या मध्यभागी पोहचतो. येथूनच उजव्या बाजूला चालत निघायचे. काही पावलावरच डोक्याच्यावर एक चौकोनी गुहा वजा खोदीव काम दिसते. येथे जाणाऱ्या पायऱ्याही तुटल्या असल्यामुळे येथे पोहोचणे केवळ अशक्यच आहे. पण हे कोरीव काम मात्र आहे सुबक! बहुधा तो विहारच असावा.
याच्याच पुढे एक मोठा विहार दिसतो आणि या विहाराच्याच शेजारी पाण्याच्या टाक्या दिसतात. शेकडो वर्षांपूर्वीच्या इतिहासाचं हे भग्न रूप आता मात्र आपल्याला विचार करायला लावताना दिसतं. हे सारं पाहत पुढे गेलो की, एक देवळाची घुमटी दिसते. हीच ती पद्मावती देवी! पंचक्रोशीतल्या नागरिकांचे श्रद्धास्थान! आतमध्ये देवीचा तांदळा असून समोर पितळी घंटा टांगलेल्या दिसतात. या घुमटी शेजारीच पाण्याच्या आणखी टाक्या दिसतात. यात मात्र शेवाळलेलं पाणी आहे. देवीच्या मूर्तीसमोर नतमस्तक झालं की, आपली या लेणीची छोटीशी पण अनवट अशी सफारी पूर्ण होते.
लेणीसमोर उभं राहिलो की, समोर दिसणारा आंद्रा धरणाचा जलाशय आणि निसर्ग तुम्हाला अगदी गुंतवून सोडतो. कितीतरी डोंगर आपल्यासमोर फेर धरून उभे असल्यासारखे वाटतात. बहुधा ते इतिहासाच स्वत:शी असलेलं नातं ते अधोरेखित करतात की काय? असं क्षणभर वाटते. खरं तर हे नातं ओळखण्याची कला आपल्यात निर्माण व्हायला हवी, तरच हे डोंगर आपल्याशी बोलतील.पद्मावती लेणीसारखं सौंदर्याचं दान हे अशाच भटकंतीचं वैशिष्ट्य! प्रत्येक भटकंतीत काहीतरी नवीन शोधण्याची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण आहे मात्र भन्नाट! डोळसपणे आणि अभ्यासू नजरेने अशा ठिकाणांकडे तुम्ही गेलात तर ही पद्मावती लेण्यांसारखी ठिकाणे तुम्हाला अगदी भरभरून अनुभव देतील.
मुंबई-पुणे रस्ते महामार्ग (जुना) -- वडगाव मावळ -- तळेगाव एमआयडीसी --आंबळे --- निगडे गाव .
भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी
पावसाळा सोडून केव्हाही.
सूचना
- निगडे गावात या लेण्याकडे जाण्याची वाट विचारून घ्यावी.
- या लेणीकडे जाण्याची वाट काहीशी अवघड आहे.
- शक्यतो जाताना पिण्याचे पाणी सोबत घेणे.
- निसर्गाची हानी टाळून आणि त्याचे पावित्र्य राखूनच भटकंती करावी.

अतिशय सुंदर असा लेख आहे....
ReplyDeleteइतके वर्ष तळेगांव दाभाडे मध्ये राहतो पण या लेणी बद्दल प्रथमच ऐकतो आहे...
ते म्हणतात ना काखेत कोळसा आणि गावाळा वळसा अगदी तसेच झालंय....
नक्कीच ऐखदए या लेणी वर जाऊन येणार.....
स्वतः जाऊन आल्यासारखं वाटलं, अतिशय सुंदर शब्दचित्र ! शेजारीच वडगांवला असून हे माहिती नव्हतं. खूप खूप धन्यवाद !
ReplyDeleteयाला निगडे लेणी असे ही संबोधतात का?
ReplyDeleteहो. निगडे लेणी म्हणुनच स्थानिकांमध्ये ओळखली जाते.
DeleteVarnan atishay surekh...while reading itself I feel the dangerous road leading to Padmavati leni..its really impressive writing
ReplyDeleteनेहमी प्रमाणे सुंदर आणि माहिती पूर्ण 👌
ReplyDelete