अस्सल कोकणमय प्रवास ...वालावल-नेरूरपार - धामापूर.
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या पर्यटनाचा दृष्टीने अत्यंत महत्वाचा जिल्हा.या जिल्ह्यात पर्यटनाची खूप ठिकाणे उपलब्ध आहेत.याला कारण या जिल्ह्याला लाभलेला स्वच्छ समुद्रकिनारा आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीची डोंगररांग.त्यामुळे घाटावरच्या इतर जिल्ह्यांपेक्षा कोकणाची...त्यातही सिंधुदुर्गाची पर्यटनस्थळे खूप वेगळी आहेत.कौलारू घरे,नारळी-पोफळीच्या बागा,हिरव्या रंगाचा कॅनव्हास धरणारी गर्द जंगले,हा तर कोकणी वातावरणाचा आत्माच.असा कोकणी टच तुम्हाला या जिल्ह्यात पदोपदी पाहायला मिळतो.पण बरेच जण सिंधुदुर्ग किल्ला,मालवण,सावंतवाडी या पलीकडे जाऊन पर्यटन स्थळे पाहत नाही.हि सारी पर्यटन स्थळे निर्विवाद सुंदर आहेच पण त्याहीपेक्षा सुंदर ठिकाणे या जिल्ह्यात लपलेली आहेत.
कुडाळ आणि मालवण तालुक्याच्या सीमारेषेवरून कर्ली नदी वाहत गेली आहे.कर्ली नदी हि जिल्ह्यातील महत्वाची नदी.सह्याद्रीच्या डोंगरात उगम पावून हि नदी समुद्राला मिळते.या नदीच्या खोऱ्यात तीन सुंदर पर्यटन स्थळे लपली आहेत.वालावल-नेरूरपार आणि धामापूर या नावाची . हि तीनही ठिकाणे एकमेकांना रस्त्याने अगदी जवळ-जवळ जोडली गेली आहेत. या तिघांमधले अंतर अवघे १७-१८ कि.मी. अवघ्या एका दिवसात आरामात पाहून होतात. पण या तीनही ठिकाणांचा प्रवास मात्र अक्षरशः तुमची भटकंती समृद्ध करणारा आहे.
| हीच ती निसर्गरम्य कर्ली नदी |
वालावल:-
हे गाव येते कुडाळ तालुक्यात. कुडाळ शहरापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर. वालावल गाव आहेच मुळी टुमदार आणि डौलदार! नारळी-पोफळीच्या बागा-कौलारू घरं-गावातून वळण घेत वाहत गेलेली नदी हे अस्सल कोकणी वैशिष्ट्य बाळगून असलेल्या गावात आलो कि हरखून जायला होते. निसर्गाने शब्दशः लयलूट केलेल्या या गावात देव लक्ष्मी नारायणाचे मंदिर मोठ्या दिमाखात उभे आहे.मंदिर कसं असावं त्याची स्वच्छता आणि निगराणी कशी ठेवावी,पावित्र्य कसं राखावं..? हे जर पाहायचं असेल तर मात्र हे मंदिर तुम्हाला आवर्जून अनुभवायलाच हवं. मंदिराच्या बाहेर गावकऱ्यांनी नवीन कमान उभारलेली दिसून येते. या कमानीतून आपण मुख्य मंदिरासमोर उभे राहतो.मुख्य देवालयाची बांधणी हि चालुक्य पद्धतीची असल्याचे म्हटले जाते.गाभारा-सभामंडप व दीपमाळ अशी या मंदिराची ढोबळ रचना असून या मंदिराच्या जीर्णोद्धारात मूळच्या बांधकामात बऱ्यापैकी बदल झालेले दिसून येतात. गाभाऱ्याचे बांधकाम जांभेथर दगडाचे व आतील खांब तसेच गाभाऱ्याच्या दरवाजा दगडाचा आहे. यावर सुंदर कोरीव काम केलेले दिसते.गाभार्याच्या महाद्वारावरील व त्यापुढील मोकळ्या जागेत (चौक) सहा पाषाणी खांबावरील कोरीव काम म्हणजे वास्तुस्थापत्याचा उत्कृष्ट नमुनाच.हे खांब काळ्या पाषाणात घडवलेले असून अतिशय गुळगुळीत आहेत.यावर विविध देव देवतांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत.यावर वेलबुट्टीची नक्षीही पाहायला मिळते. मंदिराचा सभामंडप जुन्या आणि नवीन पद्धतीच्या मिश्रणाची सांगड घालून उभारण्यात आलेला दिसतो. गाभाऱ्यातील देव लक्ष्मी नारायणाचे रूप खूपच मोहक आहे.मांगल्याची आणि पावित्रतेची सुरेख अनुभूती या मूर्तीकडे पाहून आपल्याला मिळते. सभामंडपाच्या समोर बाहेरील बाजूस काळीथर दगडाची पाच खांबी दीपमाळ आहे. हे सारं पाहून झालं कि मंदिराच्या बाजूलाच असणाऱ्या तलावाकडे जायचं.या मंदिराच्या सौंदर्यात भर घालणारा हा तलाव खूपच सुंदर आहे. या तलावाकाठी तासन तास बसावसं वाटत. खरं-तर भक्तीची भावना निसर्गाचे कोंदण,वास्तुस्थापत्याची नजाकत आणि धीरगंभीर वातावरणातूनच जन्माला येत असते. हे सारं वालावल मध्ये अनुभवायला मिळते. हि दोन्हीही ठिकाणे पाहून झाले कि मग आपल्या पुढच्या प्रवासाकडे निघायचे..नेरुरपारकडे....
| देव लक्ष्मी नारायणाचे मंदिर |
| मंदिर सभामंडप |
| देव लक्ष्मी नारायणाची अतिशय सुंदर मूर्ती |
| मंदिरातील मूर्तिकाम |
| देव लक्ष्मी नारायणाचे मंदिराची पंच-दीपमाळ |
नेरूरपार
वालावलच्या निसर्गपाशातून आपली सुटका तशी लवकर होणे अशक्यच. पण यातून बाहेर पडून आपण नेरूरपार कडे निघायचं. साधारण १० किमी अंतर पार केले कि मग आपल्याला कर्ली नदीचं विस्तीर्ण पात्र आडवं येते. कर्ली नदीवर आता खूप प्रशस्त पूल बांधला गेलाय. या पुलावर थांबून दोन्ही बाजूला दिसणाऱ्या कर्ली नदीच्या दृश्याला खरोखरीच तोड नाही.डोळ्यांचे पारणेच फेडणारी हि जागा. आपल्या नजरेत येणारे प्रत्येक दृश्य हे फ्रेमच वाटावे. नदीकाठी डोलणारी नारळाची झाडे,आकाशाचा रंग नदीत उतरलेला.. हे दृश्य तासनतास पाहत रहावस वाटतं. खरंतर आपल्या इकडची बरीचशी पर्यटक मंडळी केरळ आणि दक्षिण भारतात निसर्ग सौंदर्य पाहायला जात असतात त्यांनी एकदा तरी अशा ठिकाणी यावंच.मग त्यांना कोकणच्या भटकंतीचं महत्त्व कळेल.हे दृश्य डोळ्यात साठवून आपण नेरूरपार गावातल्या कलेश्वर मंदिरात यायचं. हे मंदिरही जून असून कोरीव कलाकुसरीने नटलेले आहे.चौकोनी आकाराची शिवपिंडी हे मंदिराचं वैशिष्ट्य.कौलारू धाटणीचं हे मंदिर वेगळाच आनंद देऊन जाते.
नेरूरपारमध्ये आणखी एक ठिकाण पर्यटकांची गर्दी खेचत आहे. ते म्हणजे वसुंधरा विज्ञान केंद्र. एक आगळ वेगळं ठिकाण.गर्द झाडीतल्या साडे चार एकरात पसरलेल्या या विज्ञान केंद्राची स्थापना बाबा आमटेंचे शिष्य सी.बी.नाईक यांनी केली. युरेका हॉल, फिरते वाचनालय,शिक्षक प्रशिक्षण केंद्र,खेंस्य पाड्यातील मुलांसाठी आकाश दर्शन, आरोग्य विषयक उपक्रम हे इथलं वैशिष्ट्य. हे सारं अतिशय नाम मात्र शुल्क भरून. या विज्ञान केंद्राला भेट दिली तर सिंधुदुर्गच्या जैव - विविधतेचीही ओळख करून दिली जाते. आगाऊ सूचना केली तर येथे निवासाची सोयही होऊ शकते. नेरुरपारच्या
निसर्ग सौंदर्याला विज्ञानाचीही जोड मिळाली आहे. हे विज्ञान केंद्र सुजाण पर्यटकांनी तरी न चुकवावे असेच.
वसुंधरा विज्ञान केंद्र
|
धामापूर ;-
नेरूरपार वरून अवघ्या पाच किलोमीटर वर "धामापूर" हे पर्यटन स्थळ आहे. खरं तर हे ठिकाण कोकणच्या पर्यटनाचा शिरपेचच म्हटलं पाहिजे. या ठिकाणाचं वैशिष्ट्यच मुळी बहूआयामी आहे. मानव निर्मित सिंधुदुर्गमधील सर्वात मोठा तलाव,त्याच्या काठी खास कोकणी टच लाभलेलं देवी भगवती मंदिर,तलावाच्या आजूबाजूला असणाऱ्या गर्द जंगलात फिरण्यासाठी तयार केलेल्या रानवाटा,बोटिंगची सुविधा आणि पक्षी निरीक्षणासाठी उभा केलेला मनोरा. हि सारी वैशिष्ट्ये इथे सामावलेली आहेत. भटकंतीचे हे बहुरंगी पदर धामापूर मध्ये अनुभवायला मिळतात. त्यामुळे या ठिकाणी बराच वेळ द्यावा लागतो.हे ठिकाण येते मालवण तालुक्यात . पण कुडाळ तालुक्याला लागूनच. कर्ली नदीच्या खोऱ्यात. असं म्हणतात कि हा तलाव सन १५३० साली नागेश देसाई यांनी निर्माण केला.नागेश देसाई हे विजयनगर साम्राज्याचे वतनदार होते असे इतिहासकार सांगतात.या धामापूरच्या तलावाच्या सौंदर्यात भर घातली आहे ती देवी भगवती मंदिराने. हे मंदिर कौलारू असून त्याचा गाभारा मात्र दगडी आहे.गाभाऱ्यात देवीची सुमारे साडे चार फूट उंचीची सुरेख मूर्ती आहे. या मंदिरातून दिसणारा धामापूरच्या तलावाचे दृश्य म्हणजे हॅट्स ऑफच.अरसिक माणसालाही रसिकता निर्माण होईल अशी हि जागा. तलावाकाठच्या जंगलामुळे झाडीमुळे अनेक पक्षी येथे येतात.त्यामुळेच अनेक पक्ष्यांचं येथे दर्शन होत असतं.काही पक्षीप्रेमींच्या नोंदी असे सांगतात कि डार्टर ,लेसर विसलिंग, डकास ,ब्रान्झविंग जकाना ,हॉर्नबिल आदी पक्षी येथे दिसतात. एव्हढेच नव्हे तर फुलपाखरांच्याही अनेक प्रजाती येथे संशोधकांना आढळून आल्या आहेत.त्यामुळेही अनेक पक्षीप्रेमींची येथे गर्दी असते. सकाळ आणि संध्याकाळ हि पक्षी निरीक्षणाची सर्वोत्तम वेळ. धामापूर हे ठिकाण सहकुटुंब पाहण्यासारखे यात शंकाच नाही.
![]() | ||
धामापूर तलाव
|
वालावल-नेरूरपार-धामापूरहा
खरतर १८
किमी चा
हा अद्भुत
प्रवास आहे.पण आहे
आडवाटेवरचा.वळणावळणाचा.
भटकंतीची कवाडे
उघडे करून
देणारा.थकवा
घालवणारा.भटकंतीसाठी
आपण कोकणात
येत असतोच.अश्यावेळी गर्दी
विरहित आणि
निसर्गाने ठासून
भरलेली हि
ठिकाणे पहिली
तर कोकणच्या
संस्कृतीचं खरंखुरं
दर्शन नक्की
घडेल.


छान!
ReplyDeleteखुपच छान लिहिले आहे.....
ReplyDeleteनक्कीच आता सिंधुदुर्ग मध्ये फिरायला गेलो तर वरील सर्व ठिकाणे पाहणार.....
Apratim Varnan of Unknown Nature sites....Supperb must visit spot
ReplyDelete