जल-व्यवस्थापनाचा आविष्कार असलेली "मंचरची बारव"

 माणसाच्या जीवनात जल, अन्न आणि निवारा हे मूलभूत घटक आहेत. जल अर्थात पाणी या घटकाला तर विशेष महत्त्व आहे. माणसाने वस्ती करण्यास सुरुवात केली तीही जलसाठ्यांच्या किनार्‍यावरच केली. पृथ्वीवरील प्रार्थनास्थळांत असलेल्या देवदेवतांसाठीही माणसाने जलसाठे तयार केले. यावरून पाण्याला अतिशय महत्त्व आहे हे स्पष्ट होते.बारव म्हणजे काय? हा प्रश्न अनेकांना पडतो. बारव ,विहीर,पुष्करणी हि नावे जवळपास एकाच उद्दिष्टासाठी बनवलेले स्थापत्याचे प्रकार. विहिरीनंतरचा  सुधारित स्थापत्याचा अविष्कार हा बारव व त्यानंतर पुष्करणी असा आहे. बारव हा सुद्धा एक प्रकारचा जलसाठाच असतो. मात्र बारवांचे वैशिष्ट्य म्हणजे गोल, चौरस वा किल्लीच्या आकारात बांधलेल्या या जलसाठ्यांना पायर्‍या असतात. म्हणूनच इंग्रजीत बारवांना स्टेपवेल म्हणतात. एकात एक लहान होत जाणारे तीन ते सात टप्पे हे बारवाचे स्वरुप असते. म्हणजेच जमिनीलगत यांचा आकार मोठा व जस-जसे आपण खाली उत्तरात जाऊ तास-तसे ते निमुळते होत गेलेले आढळते.या बारवांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बारवांत पाण्याचे अंतर्गत स्त्रोत असतात. म्हणजेच बारव ह्या अश्या जागी बांधल्या गेलेल्या असतात जिथे नैसर्गिक पाण्याचे स्रोत असतात.आपण पावसाचे पाणी अडविणे, ते मातीत जिरवणे आणि साठवणे यासाठी अनेक योजना केलेल्या पाहत असतो .त्यासाठी अनेक बंधारे बांधत असतो.पण कालांतराने हे सगळे स्रोत नष्ट होत किंवा याची वारंवार दुरुस्ती करावी लागते.पण या शेकडो वर्षांपूर्वी बांधलेल्या बारवा अजूनही आपल्या कुशल जल-व्यवस्थापन नीतीचे मूर्तिमंत उदाहरण बनून उभ्या आहेत. अशीच  एक बारव आपल्याला खुणावत असते.ती म्हणजे पुणे जिल्ह्यातील मंचर या गावातील बारव.

बारवेत उतरण्यासाठीच्या पायऱ्या व मार्ग 


                मंचरचे महत्व हे अगदी प्राचीन काळातही होते याचे दाखले अनेक संदर्भातून डोकावतात. इतिहास अभ्यासकांच्या मते बदामी चालुक्य राजा विनयादित्य याच्या ताम्रपटात मचोहनावाच्या गावाची नोंद आहे. यातील  मचोह म्हणजे मंचर असे असावे.मंचरचा हा सर्वात जुना उल्लेख.हा उल्लेख आहे  इ. स. २९ एप्रिल ६९० सालाचा. तसेच काही अभ्यासक असेही म्हणतात कि प्राचीन व मध्ययुगीन काळात जुन्नर व पैठण हि दोन महत्वाची शहरे होती.या महत्त्वाच्या व्यापारी शहरांना जोडणाऱ्या मार्गाजवळच  मंचर हे गाव वसलेले असल्यामुळे अनेक व्यापारी आपल्या मालाची ने-आण करीत असत त्यावेळी या मंचरच महत्व देखील वाढलं.त्यामुळेच त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हि बारव उभारली गेली असावी. सध्या  मंचर हे गाव ओळखलं जात ते भीमाशंकरच्या रस्त्यामुळे. अनेक शिवभक्त भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाकडे जाताना याच मंचरहून पुढे जात असतात.याच रस्त्यावर  खरडी नाल्याजवळ हि अद्भुत अशी चौरस आकाराची बारव आपल्याला पाहायला मिळते. या बारवची नोंद गॅझेटीअर ऑफ दि बॉम्बे प्रेसिडन्सीमध्ये (खंड १८, भाग ३ पुणे, पान क्र २७२) केलेली आहे. इतिहासाचे हे सारे संदर्भ तपासताच या बारवेजवळ दाखल व्हायचे आणि हिच्या गूढ अंतरंगात शिरायचे.

या बारवेची  लांबी रुंदीला अंदाजे २४ मीटर असून ती साधारण १० मीटर खोल आहे. एकात एक लहान होत जाणारे असे  तीन टप्पे या बारवेच्या  बांधणीत आढळतात. बारवेत खाली जाणेसाठी  पूर्व व दक्षिण दिशेला प्रवेशमार्ग  आहेत. या दोन्ही दिशेकडून खाली १० पायऱ्या  उतरल्यास  बारवेचा पहिला टप्पा आहे.या टप्प्यावर  चारही बाजूस बसण्यासाठी दगडी ओट्याची सोय केलेली आहे. पुन्हा पहिल्या टप्प्यावरून खालच्या दुसऱ्या टप्प्यावर जाण्यासाठी चारही बाजूला पंधरा पायऱ्या उतरून जावे लागते.  दगडी स्थापत्यात घडवलेल्या या पायऱ्या आजही सुस्थित शाबूत आहे हे जास्तच विशेष.तिसरा टप्पा बारवेमधील पाणी कमी झाल्यानंतर बघता येतो.या बारवेत बाराही महिने अतिशय स्वछ पाणी असते.याचे श्रेय हे निश्चितच येथल्या लोकांना जाते.कारण या बारवेची इथली स्थानिक मंडळी नियमित पाने स्वच्छता करीत असतात. या बारवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संरक्षक भिंतींच्या पश्चिम दिशेकडील  असलेल्या देवकोष्ठामध्ये एक आश्चर्य आपली वाट पाहत असते.या ठिकाणच्या भिंतीत बरोबर मध्यभागी तब्बल २५ ओळींचा संस्कृत भाषा व देवनागरी लिपीतील शिलालेख आपल्याला दिसतो.अन आपण आश्चर्यचकितच होतो.मुळात अश्या बारावांमध्ये आणि पुष्करणींमध्ये शिलालेख मुळातच आढळत नाही आणि   असले तरी ते पूर्णपणे नष्ट झालेले असतात.आणि इथे तर अगदी सुस्थितीत असलेला शिलालेख आहे.अभ्यासकांच्या मते हा यादवकालीन शिलालेख आहे.लेखाच्या सुरुवातीला चंद्र व सूर्य कोरलेले आहेत. याचाच अर्थ  जोपर्यंत आकाशात चंद्र व सूर्य आहेत तोपर्यंत हि वास्तूचे स्थान अढळ राहील.या लेखात मणिचर अर्थात मंचर गावाचे फार सुंदर वर्णन लेखात केले आहे.यावरून मंचरला पूर्वी मणिचर म्हणत असावेत.

(डेक्कन कॉलेज, पुणे येथे कार्यरत राहिलेल्या  श्री गिरीश मांडके यांनी या लेखाचे  वाचन केले आहे.)त्याचे वाचन पुढील प्रमाणे

दायक : सुकृतस्यास्येष्टा प्रभागिने

लब्धं यदुपदेश स्वेष्टापूर्त्त (सुकृत्फलं) |

||श्री गणेशाय नम:| नैमि (स्वभुज) दोईण्डकृतकोदण्डख

ण्डनं वैदेही हृदयानंदचंदन रघुनंदनं || अमरगिरिमही

ध्राद्दक्षिणं वीक्षणीयं मणिचरमिती संज्ञा यस्य (तत्त्वार्थ)

सारं | नगर मतुलवीरै (श्वारू) कैलासकल्पं पुरमथनमनो

तज्ञंद्व निर्मिमे विश्वकर्मा || तत्राभवत्प (ज्ज) नुषां कुलाम्ये प

नंदरिति प्रसिद्ध: | अलं चकार स्वकुलं गुणौधै:

क्त पितु:द्ध कुलं रत्नाकरैरिवेंदु: || कूर्माभिधस्तत्तनुजो म्हनून गु(णाकार)

सेवकाभूत | पुरा (ग्नपं) कच्छपमीशमीक्ष यो भूमिभारं सुमुषो ब

क्तभार || द्व तदंगजो देवगणै: प्रदत्त देवेंद्रसंज्ञा वसुधानिवास: | अभीष्ठत

(का) मदुघोधि कामयंतस्य देवेंद्र श्वापरोभूत् || कुलक्रमायातगु

(णै) रनून: पट्टैलवर्यस्तु कडित्तुनामा | तत्सूनुरासीद्रुरत्नरा शिराहा

करीव काम: || अभूदभूमि: प्रतिपक्षपक्षैर्गुणानुरागेण परा

क्रमेण तदंगज: सद्रुणसम्प्रदाय: श्रीलादिदेवष्कुलकीर्त्तिधुर्य: ||

धर्मार्थ मार्ग्गे क्षणशील चारस्वरूप सम्पज्जित चारूमार: | कृतस्वल

(क्ष्या) त्सदसद्विचार: स्वकंधरे सद्रुणकीर्तिहार: || मही तमीशानगणं क

दाचिन्मोदायनिशि सुप्तमीक्ष्य | त्वसंगतिं संततीमीक्षमाणा स्थास्ये |

त्र योषिद्वपुषेत्युवाच || इति प्रबुध्दस्तु निशावसाने स्वप्नानुभूतं मुहुरू

(त्स्म) रन्स: | ग्रामान्तिकासन्नम कालमेव संदृष्टवान्मीनमिवान्यदम्भ: ||१०|| तद्वा

सरं कर्त्तुमशेष दोष शोषाय तोषाय च सज्जनानां शंभोष्कपर्दप्रतिमानक्तरू

पी चद्वकार वापी निहततृतापी |११| स्वस्तिश्री रसवैरिलोचनमहीतुल्ये

मासि (बुधौ) तिथ विषु मिते पक्षे तु शुक्ले ध्रुवे | योगे भेसु

दिने (यु) ग्लाख्य लग्ने कृत: प्रारंभ: सुकृतोत्तमस्य विदु

वेन वै ||१२|| शिवमस्तु जगत:

 

या शिलालेखाचे मराठी भाषांतर खालील प्रमाणे आहे.

 

ज्याच्या उपदेशावरून हे इष्टपूर्तरूपी पुण्यकर्माचे फळ मिळाले, त्याला या पुण्यकर्माच्या फळातील वाटा मिळो. श्रीगणेशाला वंदन असो. ज्याने स्वत:च्या बलदंड अशा बाहुदंडाने शिवधनुष्याचे खंडन केले त्या सीतेच्या मनास चंदनाप्रमाणे आनंद देणाऱ्या रघुनंदनाला मी नमस्कार करतो |||| अमरगिरी नामक पर्वताच्या दक्षिणेस प्रेक्षणीय असे स्वत:चे नाम सार्थ असलेले मणिचर नावाचे बलाढ्य वीरांनी युक्त असे, इंद्रदेवालासुद्धा सुंदर वाटावे असे, सुंदर कैलासासमान नगर विश्वकर्मा याने निर्माण केले|||| तेथे ज्याप्रमाणे चंद्रमा रत्नकिरणांनी अओल्या पित्याच्या कुळास म्हणजे समुद्रास शोभा आणतो, त्याप्रमाणेनंदी नावाच्या आपल्या गुणांनी निम्न अशा स्ववंशाला अलंकारभूत झालेल्या अशा व्यक्तीने जन्म घेतला, अनेक गुणांची खाण असलेला कूर्म नावाचा मुलगा होऊन गेला ||||पृथ्वीपती परमेश्वराने कूर्मावतारात पृथ्वीचे रक्षण केलेले पाहून त्याने प्रसन्न वदनाने भूमीचा भार वाहिला |||| त्याला देवगणांनी देवेंद्र असे नाव दिल्यामुळे तो देवेंद्र नावाने प्रसिद्ध झाला. कामधेनूपेक्षा देखील अधिक योग्य अशा दानामुळे तो जणू काही प्रती देवराज इंद्रच झाला |||| त्याचा मुलगा गुणरत्नांच्या राशींनी युक्त असून कुलक्रमाने आलेल्या गुणांमध्ये कमी नव्हता. तो पट्टेलवर्य असून त्याला कडि्डत्तु असे नाव होते||||त्याचा मुलगा श्रीलादिदेव हा कुलकीर्ति वाढवणारा असा होऊन गेला. तो परंपरागत सद्गुणांनी युक्त असून त्याच्या गुणानुरागामुळे आणि पराक्रमामुळे त्याच्या भूमीवर प्रतिपक्षी म्हणजे वैरी पाय ठेवू शकले नाहीत|||| तो धर्म आणि अर्थ या दोन्ही मार्गांमध्ये विचारवंत असून सुंदर मदनाला देखील त्याने स्वरूप संपत्तीने जिंकलेले होते. उद्दिष्टांबद्दल तो विवेकपूर्ण विचार करीत असे. त्याने सद्गुणांमध्ये गुंफलेला कीर्तिरूपी हार खांद्यावर धारण केला |||| कदाचित एकदा तो रात्री सुखनिद्रा घेत असताना दैवीगुणांनी युक्त असलेल्या त्याला पाहून मही म्हणजे पृथ्वी म्हणाली की सतत तुझ्या संगतीची अपेक्षा करून मी स्त्रीरूपाने येथे राहीन|||| रात्र संपल्यावर जागा होऊन स्वप्नात अनुभवलेली गोष्ट हळूहळू स्मरण करताना त्याला असे आढळून आले की दुष्काळ (उन्हाळा) असून देखील गावाच्या जवळच एके ठिकाणी जणू दुसरा मासाच आहे असे स्वच्छ (किंवा चकाकणारे) पाणी वाहते आहे ||१०|| त्यानंतर त्याने त्या दिवशीच सर्व दोषांचा नाश व्हावा आणि सज्जनांना आनंद मिळावा अशी शंभू (महादेवा)च्या कवडीप्रमाणे दिसणारी आणि तिन्ही लोकांचा नाश करणारी वापी (विहीर) खोदण्यास सुरुवात केली ||११|| स्वस्ति श्री (मंगलकारक) अशा बाराशे सहासष्ट (यावर्षी) या महिन्यात शुद्ध पक्षातील पंचमी या तिथीस …. या योगावर मिथुन (?) लग्नावर या उत्तम व पुण्य अशा कार्याला प्रारंभ झाला.


यादवकालीन शिलालेख

 असो भलेही आजच्या व्यावहारिक युगात या बारवेची उपयुक्तता नसेलही..पण इतिहासाच्या आणि वारसा वैभवाच्या चष्म्याने जर का या वास्तूकडे पहिले तर हिचे मोल  कैक पटीने जास्त आहे.आपल्या संस्कृतीच्या गतवैभवाची हि स्मारके आहेत.एव्हढेच नव्हे तर त्याकाळात तत्कालीन राजसत्तेने रुजलेला जल-व्यवस्थापनाचा विचार आजच्या काळातही किती उपयोगी आणि महत्वाचा आहे हे यावरून कळते.आपण रोजच्या पाण्याच्या वापरासाठी कितीही विहिरी,तलाव,तळी,बंधारे बांधत असू...कितीही तंत्रज्ञान यात ओतत असू,हे सर्व या प्राचीन कलाकुसरीपुढे खुजे ठरते यात शंकाच नाही. यासाठी हि बारव मूर्तिमंत उदाहरण ठरावी.

बारवेत बारमाही असलेलं नितळ पाणी 


जाण्याचा मार्ग 

पुणे - नाशिक रस्ते महामार्ग- मंचर -भीमाशंकर रस्ता- खरडी नाल्याजवळ

भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी

वर्षभर  कधीही 


सूचना
  • निसर्गाची हानी टाळून  आणि त्याचे पावित्र्य राखूनच भटकंती करावी.



Comments

  1. *बाराही महिने खुलं असणं* ही या सुंदर ठिकाणाची आणि
    वर्णनाची जमेची बाजू म्हणायला हवी.

    ReplyDelete
  2. खरेच खूप सुंदर.

    ReplyDelete
  3. खुप सुंदर आणि आकर्षक बांधणी, अप्रतिम लेख....... धन्यवाद दादा...

    ReplyDelete
  4. The Barav pictures, its varnan, water quality and tuza lekh vachlyavar ....realized about such a very old historical treasure, heritage site...Really It`s Adbhut and Amazing

    ReplyDelete
  5. श्री विकास चिथडे बदलापुर
    श्री ओंकारजी आजचा पण सुंदर ब्लॉग नेहमी प्रमाणे 👌👌

    ReplyDelete
  6. उत्कृष्ट माहिती दिली आहे.धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पळशी ...एक सुंदर गाव !!

कऱ्हे पठारावरचा भक्तीचा मळा !!

गौताळा अभयारण्याचे अंतरंग