‘मोरगिरी’च्या अपरिचित वाटेवर ...


 खरंतरं एखाद्या रविवारी बाहेर कुठ जायचे आणि काय पहायचे ...? असा प्रश्न एखाद्या दुर्गभटक्याला कधी पडतच नसतो. कारण सह्याद्रीच्या कुशीत अनेक ज्ञात – अज्ञात ठिकाणे अक्षरशः ठाण मांडून बसलीत. यातील ज्ञात ठिकाणे म्हणजे अगदी सर्वसामान्यानांही माहित असलेली ठिकाणे म्हणजे यात सिंहगड, रायगड, कार्ला अशी ओळखीची नावे येतील. हि यादी सोडली तर अज्ञात/ अपरिचित यादीत बरेच नावे दिसतात. ठराविक गड- किल्ले- लेण्या- मंदिरे यांच्याही पलीकडे भटकंतीचे विश्व उभे आहे. यातलं बरचस अजुन तर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं देखील नाही. त्यामुळे यांच्याकडे काही मोजके पर्यटक सोडले तर इतर कोणी फिरकत देखील नाही. परंतु अत्यंत आडबाजूस/ आणि दुर्लक्षित असलेली हि ठिकाणे म्हणजे दर्दी भटक्यांसाठी मौल्यवान खजिनाच जणू! कारण अशा ठिकाणी मानवी गर्दी नसल्यामुळे याचं भौगोलिक कवच, निसर्ग हे बऱ्यापैकी मानवी आघातापासून दूर राहिलंय. त्यामुळे तेथे आले कि, मन हरखून जाते. येथेच गुंतून रहावसं वाटतं. या अशाच आडवाटेवर आणि इतिहासातही उल्लेख नसलेला एक किल्ला उभा आहे. मोरगिरी त्याचं नाव! खरतर हा किल्ला आहे कि टेहळणी चौकी याबद्दल अनेक इतिहास अभ्यासकांच दुमत आहे. पण आपण यात पडायचं नाही. आपण फक्त येथे येवून भटकंतीचा आस्वाद घ्यावा. एक मात्र खर या ठिकाणी असलेल्या अप्रतिम भूगोल सौंदर्याबद्दल कोणाचही दुमत नाही. त्यामुळे भटकंतीच्या सौंदर्याची चव चाखायला एवढं पुरेसं असलं कि मग आपली आडवाटेवरची भटकंती सुरु होते.... तर हा मोरगिरी उभा आहे, पुणे जिल्ह्याच्या आणि रायगड जिल्ह्याच्या सीमारेषेजवळ. याचं नेमकं स्थान म्हणजे पुण्यातील मावळ तालुक्याच्या पश्चिम दिशेला. म्हणजे या किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला लोणावळावरून सहारा रस्त्यामार्गे घुसळखांब फाट्यावरून तुंग गावाच्या दिशेकडे यावे लागते. पण आपण मात्र तुंग गावात जायचे नाही, तर घुसळखांब फाट्यावरून तुंग रस्त्यावरच एक-दोन किलोमीटरवर असणाऱ्या कातकरी वस्ती जवळ यायचे. प्राथमिक गरजांसाठी संघर्ष करीत असलेल्या अशा वाड्या पाहिल्या की, मग आपल मन अगदी हेलावून उठते. दहा- पंधरा उंबऱ्याची ही वस्ती डोंगराच्या कुशीत जगत आहे. खरंतरं या वस्तीच्या भौगोलिक सौंदर्यासाठी हेवा करायचा की, या विकासापासून ही वस्ती दूर आहे याची खंत बाळगायची? या प्रश्नाच उत्तर बराच वेळ आपल्याला मिळत नाही पण ही माणस मात्र तुम्हाला अगदी आपुलकीने मोरगिरीचा रस्ता दाखवतील. या वस्तीजवळच मोरगिरीसाठीचे माहितीचे फलक व मार्गाचे फलक दिसतात . येथेच आपल्या गाड्या लावायच्या. मोरगिरीच स्थान हे तुंग- तिकोना- लोहगड- विसापूर- कोरीगड यांच्या परिघात आहे. त्यामुळे या मोरगिरीवर भूगोलाची किती उधळण असेल यांची कल्पना केलेलीच बरी. त्यामुळे इतिहास जरी अज्ञात असला तरी मात्र हे स्थान भूगोलात अगदी आकंठ बुडालेला आहे. याची अनुभूती आपल्याला पावला- पावलावर जाणवत राहते.

वस्तीजवळ लावलेला मोरगिरी किल्ल्याचा नकाशा 

.

किल्ल्याकडे जाताना लावलेले दिशादर्शक फलक 


वस्तीची मुले खेळात दंग झाली होती 

वस्तीपासून निघालेली पायवाट आणि आम्ही भटके मित्र 

          कातकरी वस्तीवरून आपण थेट मोरगिरीकडे निघायचे. शक्यतो वाट्याडा घेतला तर चुकण्याची शक्यता कमी असते. परंतु या मार्गावर बऱ्याच ठिकाणी एका ट्रेकिंग ग्रुपने बाणांच्या खुणा केलेल्या दिसतात, त्यामुळे वर जाण्यासाठी यांचा फार उपयोग होतो. वस्तीपासून आपण चालायला सुरुवात केली तर खड्या चढाईनंतर अर्ध्या तासात आपण एका सपाटीवर येतो. या सपाटीवरून पुन्हा पाउणतासाची चाल आहे. आता मात्र मोरगिरी आपल्यासमोर असतो. परंतु आपणाला याला वळसा मारून जायचे असते (Traverse), उजव्या बाजूला खोलवर दरी आपल्या सोबत असते. नंतर पुन्हा हि वाट डावीकडे वळते. आता सपाट चालीनंतर पुन्हा आपल्याला मुख्य किल्ल्याची चढण लागते. हा टप्पा अत्यंत कठीण असून पावसाळ्यात येथे येणे केवळ अशक्यच! ही वाट अत्यंत घसाऱ्याची असून अगदी जपून आपल्याला चढाई करावी लागते. ही अत्यंत कठीण चढाई पार करून आपण एका पाण्याच्या टाक्यापाशी आणि छोट्याश्या गुहा मंदिरापाशी येतो. येथे गुहेत जाखमातेचे मंदिर आहे. स्थानिक गावकरी येथे दर्शनासाठी येत असतात. आपणही या ठिकाणी नतमस्तक व्हायचे. 

तीव्र घसारा असलेली वाट 

तीव्र घसारा असलेली वाटेवरून जपूनच जावे लागते 

या टप्प्यापासून पुढे लोखंडी शिडी लावली आहे. या टप्प्यापासून पुढे लोखंडी शिडी लावली आहे. ही पार केली की, आपल्याला कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसतात. या पायऱ्यांनी आपण माथ्या वर हजर होतो. गडाचा माथा अत्यंत छोटा असून यावर पाण्याच्या दोन टाक्याही दिसतात. बाकी तटबंदीचे, बुरुजाचे, दरवाजेचे अवशेष मात्र दिसून येत नाही.

तीव्र चढाई पार करून समोर आलेला कातळ टप्पा 

तीव्र चढाई पार करून समोर आलेला कातळ टप्पा 

माथ्यावर जाणेसाठी असलेली शिडीची वाट  


पाण्याची टाकी 


          ... पण माथ्यावरून दिसणारा भूगोल मात्र डोळ्यांचे शब्दशः पारणे फेडतो. जिकडे पहावे तिकडे, चहूबाजूंनी सह्याद्रीच अक्षरशः रौद्र तांडव आपल्याला अनुभवायला मिळतो. विशेषतः दक्षिणेकडे म्हणजेच मोरवे गावाच्या दिशेने सळसळत गेलेली डोंगराची रांग मात्र जास्त नजरेत भरते. रुंद पठार असलेली ही रांग एखादी नागमोडी सळसळत गेलेली माचीच वाटून जाते. पूर्वेकडे         दिसणा-या तुंग- तिकोना या जोडगोळीसाठी मात्र काही वेळ राखुनच ठेवायला हवा. असो माथ्यावरून दिसणारे हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी आपले डोळेही अपुरे पडत असतात. या साऱ्या दृश्यांना डोळ्यात सामावण्यासाठीची आपली धडपड मात्र केविलवाणी होते. मनाला आणि शरीलाला उर्जेचा स्त्रोत देणारी ही अशी ठिकाणे पाहताना कसा वेळ जातो हे कळत देखील नाही. असो आता परतायची वेळ येवून ठेपलेली असते. परत फिरताना पावले जड झालेली असतात. अशा ठिकाणावरून मागे फिरताना साहजिकच नको वाटत असते. आता तीव्र उतार समोर असतो. शरीराचा तोल सांभाळायचा असतो. पायांनाही काबुत ठेवायचे असते. तरीही मनात मात्र पाहिलेल्या ठिकाणांचा फ्लॅशबॅक चालूच असतो.

मोरगीरीवरून दिसणारा तुंगी किल्ला 

मोरगीरीवरून दिसणारा तुंगी किल्ला
मोरगीरीवरून दिसणारे  मोरवेचे पठार 

     मोरगिरी हे ठिकाण केवळ कसलेल्या डोंगर यात्रींसाठीच आहे. येथे चुकीच्या वागणुकीला क्षमा नाही, तसेच पावसाळा सोडून इतर ऋतूत येथे येणे कधीही चांगलेच. लोणावळा- खंडाळा हे पर्यटनाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. पण याचं ठिकाणापासून जवळच असलेले हे ठिकाण डोंगरमित्रांसाठी ‘मस्ट विजीट’ या जातकुळीतील आहे. या किल्ल्याचे स्थान आणि त्यावरील अवशेष पाहाता हा किल्ला टेहळणीसाठी बांधला असावा असे वाटते.कारण या किल्ल्याचे स्थान प्राचीन बोर घाटेजवळ असल्याने या घाट वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असावा.

जाण्याचा मार्ग 

लोणावळावरून सहारा रस्त्यामार्गे घुसळखांब फाट्यावरून तुंग गावाच्या दिशेकडे यावे लागते. पण आपण मात्र तुंग गावात जायचे नाही, तर घुसळखांब फाट्यावरून तुंग रस्त्यावरच एक-दोन किलोमीटरवर असणाऱ्या कातकरी वस्ती जवळ यावे लागते.

भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी

पावसाळा सोडून कधीही 


सूचना

  • कातकरी वस्तीत  किल्ल्याकडे जाण्याची वाट विचारून घ्यावी.
  • पावसाळ्यात  येथे जाणे धोक्याचे आहे. 
  •  जाताना पिण्याचे पाणी सोबत घेणे.
  •  जाताना शक्यतो वाटाड्या  सोबत घेणे.
  • निसर्गाची हानी टाळून  आणि त्याचे पावित्र्य राखूनच भटकंती करावी.


  

Comments

  1. आम्ही चढू शकू का?

    ReplyDelete
  2. Nice coverage..
    Really different kind of fort or landscape...
    Hope to visit sometimes .

    ReplyDelete
  3. Katkari Vasti and Top of Morgiri che varan khup surekh....Shidi experience must be thrilling

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पळशी ...एक सुंदर गाव !!

कऱ्हे पठारावरचा भक्तीचा मळा !!

गौताळा अभयारण्याचे अंतरंग