नयनरम्य “आंद्रा खोरं”

 

    आपल्या मराठीत एक म्हण आहे, “ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये.या म्हणीप्रमाणे आपण तसे वागतोही. पण तरीही काही भटक्यांची पाऊले ही नदीच्या मुळाकडे वळतातच. नदीचे मूळ असते कसे...? किंवा नदीचा प्रवास असतो तरी कसा…? या प्रश्नाचे उत्तर अशा भटक्यांच्या शोधक बुद्धीला अस्वस्थ करत असते. आणि मग सुरु होते अनोखी भटकंती... नदीच्या प्रवाहाच्या   दिशेने. आजही सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत विविध नद्यांची ठिकाणे दडलेली आहेत,त्यांचं  सौंदर्य आपल्याला अक्षरशः भुरळ पाडते. असच एक अनवट ठिकाण रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या प्राचीन कुसूर घाटवाटेजवळ दडलंय. कुसूर हा घाट हाडाच्या पर्यटकांना माहित आहे. हा कुसूर घाट येतो मावळमध्ये. सह्याद्रीच्या रांगड्या सौंदर्याचं दर्शन या घाटाच्या प्रत्येक फ्रेममधून पहायला मिळत. याच घाटवाटेजवळ आंद्रा नदी उगम पावून ती पूर्वेकडे वाहते.त्यामुळे या भागाला आंद्रेचं  खोरं असं म्हटलं जात.त्यामुळे अविस्मरणीय अनुभवासाठी आंद्रा नदीचा  प्रवास आणि तिच्या सहवासाने संपन्न झालेले आंद्रा खोरे  एकदा तरी अनुभवायला हरकत नाही.

कुसूर घाट वाट 

कुसूर घाट वाटेवरील पाण्याची टाकी 

आंद्रा खोऱ्याचे प्रवेशद्वार कुसूर घाट 


कुसूर घाट 



            आंद्रा खोरं म्हणजे पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये असणार महत्वाचं खोरं. आंद्रा या नदीची लांबी भलेही याच तालुक्यात असणाऱ्या इंद्रायणी आणि पवना या नद्यांच्या तुलनेत कमी असली तरी या नदीचं महत्व काही कमी होत  नाही. कारण  या नदीचा इतिहास अगदी सातवाहन काळापर्यंत जातो.म्हणूनच इतिहासकार आणि अभ्यासक यांच्या दृष्टीने हे खोरं तसं प्राचीनच.या खोऱ्याला अगदी शिवकाळात आणि आजही "आंदर मावळ"  म्हटलं जात.शिवरायांच्या बारामावळांपैकी एक असलेले हे मावळ."सह्याद्री" कार स.अ.जोगळेकर  असं म्हणतात कि आंदर हा आंध्र शब्दाचा अपभ्रंश असावा. या भागात  आंद्रा नदी भिवपुरीच्या डोंगरात (कर्जत तालुका आणि मावळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या डोंगरात म्हणजेच खांडीजवळच्या) येथे उगम पावून राजपुरी येथे  इंद्रायणी नदीला मिळते. या दरम्यान या नदीवर ठोकळवाडी आणि आंद्रा या नावाची धरणे बांधली आहेत.हि धरणे डोळ्यांची पारणेच फेडतात.पूर्वीच्या काळी नालासोपारा हे कोकणातलं महत्वाचं बंदर होत.समुद्रमार्गे आलेला माळ या ठिकाणाहून घाटमाथ्यावरील प्रदेशात जात असे. समुद्रमार्गे आलेला माल या ठिकाणाहून घाटमाथ्यावरील प्रदेशात जात असे. म्हणजेच नालासोपारा हे महत्त्वाचं व्यापारी केंद्र होत.तेव्हा हा व्यापार नालासोपारा-भिवपुरी-कुसुरघाट मार्गे आंद्रा खोऱ्यातून पुढे पुणेला होत असे.कुसूर घाट हि प्राचीन घाटवाट. या घाटाच्या  खाणाखुणा आजही आपल्याला   या घाटवाटेवर पाहायला मिळतात.कुसूर ते भिवपुरी हा एकदिवसाचा सुंदर ट्रेक आहे.तसेच या भागात तत्कालीन साधकांनी-तपस्वींनीं -बौद्ध भिक्खुनी खोदलेल्या निगडे- कल्हाट -कांब्रे  येथील लेण्या म्हणजे या भागात कलेचाही उगम झाला होता याचीच साक्ष देतात.या ठिकाणच्या लेण्या सर्वसामान्यांपासून दूर राहिल्या आहेत.यातील कांब्रे  लेणी जास्तच देखणी. कल्हाट  जवळच्या डोंगरावर उभे असलेले तासूबाई देवीचं मंदिर तर खूपच सुंदर.या ठिकाणावरून दिसणारा आंदर मावळचा कॅनव्हास लाजवाबच. या ठिकाणी तासन-तास बसावसं वाटत. 

आंद्रा खोऱ्यातील प्राचीन कल्हाट लेणी 
निगडे येथील पद्मावती लेणी 

प्राचीनतेची साक्ष देणारी काम्ब्रे लेणी 

चढाईस अवघड अशी  काम्ब्रे लेणी 


टाकवे-खांडी-कुसूर-पिंपरी-कुणे-निगडे-भोयरे-कशाळ-फाळने-राजपुरी-किवळे हि याच खोऱ्यातील देखणी गावे.सह्याद्रीचा परिसस्पर्श झाला कि गावे कशी देखणी होतात याचीच हि मूर्तिमंत उदाहरणे.पावसाळ्यात येथे अक्षरश: स्वर्गच अवतरतो.मावळचा हा दुर्गम भाग येथल्या भटकंतीत आवर्जून पाहावा. हा भाग शब्दशः सह्याद्रीच्या अजस्त्र रंगानी वेढला गेला आहे. त्यामुळे या भागात निसर्गाची लयलूट पाहायला मिळते.  चारही महिने धुवांधार पाऊस येथल्या भागात पडत असतो.त्यामुळे या भागात असंख्य  धबधबे पाहायला मिळतात.किंबहुना केवळ पाऊसात भिजण्यासाठी आणि धबधबे पाहण्यासाठी हजारो पर्यटकांची  पाऊले या आंदर मावळात वळत असतात.खांडी-इंगळून-परीटेवाडी-माऊ येथले धबधबे तर प्रसिद्धच आहेत.

आंद्रा खोऱ्यातील सुंदर बंधारे 

आंद्रा खोऱ्यातील धबधबे 

रानफुले 


आंद्रा खोऱ्यातील भातशेती 

आंद्रा नदीवरचे सुंदर धरण 

आंद्रा खोऱ्यातील भातशेती 



तसं पाहिलं तर आजच्या काळात नदी आणि तीच खोरं पाहणे हे केवळ दिवास्वप्नच ठरावं.इतक आपण नद्यांना प्रदूषित करून ठेवलंय.पण आपल्या सुदैवाने अजूनही काही नद्यांची खोरी पाहण्यासारखी राहिली आहेत. आंद्रा हि त्यापैकीच एक. मंदिरे-जंगले-लेण्या-धरणे-निसर्गरम्य खेडी-धबधबे या साऱ्यांसाठी हे खोरं वैशिष्ट्यपूर्ण आहे.पर्यटनाची वेगळी दृष्टी आणि नदी बाबत संवर्धनाची जाणीव म्हणून आंद्रा खोऱ्यात एकदा तरी यायला हवं....एका संपन्न अनुभवासाठी...

 

                                              

आंद्रा खोऱ्याचा "कॅनव्हास" 




येण्याचा मार्ग 
मुंबई - पुणे रस्ते महामार्ग (जुना)-कान्हे फाटा - टाकवे वरून आंद्रा खोऱ्यात येता येते. किंवा 
मुंबई - पुणे रस्ते महामार्ग (जुना)- तळेगाव MIDC - निगडे वरूनही आंद्रा खोऱ्यात येता येत

वर्षभर कोणत्याही ऋतूत तुम्ही या भागात फिरू शकता.पण पावसाळा हा सर्वोत्तम ऋतू.








 

Comments

  1. सहज, सुंदर वर्णन ! प्रत्यक्ष भटकंती केल्याचा आनंद देणारे लिखाण !
    👍👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पळशी ...एक सुंदर गाव !!

कऱ्हे पठारावरचा भक्तीचा मळा !!

गौताळा अभयारण्याचे अंतरंग