मुळशीच्या खोऱ्यात.....गोठं आणि भादसकोंडा लेणं

 मुळशीच्या खोऱ्यात

                एकदा का भटकंतीचा ध्यास घेतला की, मग सुट्टीच्या दिवशी पावलं घरात थांबतच नाहीत. पाठीवर सॅक अडकवून वेगवेगळी भटकंतीची ठिकाणे शोधून त्यावर फिरण्याची हौस बरेच हाडाचे दुर्गमित्र भागवित असतात. यातही नेहमीच्या रूळलेल्या वाटांपेक्षा अनवट, ऑफबीट ठिकाणांकडेही बऱ्याच ट्रेकर्स मंडळींची पावले फिरताना दिसतात. आठवडामाजी फिरत जावेया उक्तीप्रमाणे कुठेतरी जावून आलंच पाहिजे, हा ध्यास घेवून जंगले-अभयारण्ये, प्राचीन हेमाडपंथी मंदिरे, नद्या, विहिरी, वाडे आदी ठिकाणे धुंडाळणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. काहीतरी वेगळं पाहण्याचा ध्यास बरेच जण बाळगतात. यातच मग मुळशी खोऱ्यातली दोन अनवट नाव समोर येतात. गोठं आणि भादसकोंडा अशा दोन आगळ्यावेगळ्या लेण्यांची.

                पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याच्या पश्चिमेकडील म्हणजेच सह्याद्रीच्या कुशीतला भाग हा अक्षरशः डोळ्यांचे पारणेच फेडणारा आहे. याच तालुक्यातून जाणारा आणि पुणे-रायगड जिल्ह्याला जोडणारा प्रचंड गर्दीचा ताम्हिणी घाट रस्ता तर हमखास गर्दीचं ठिकाण झालंय. सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर या ताम्हिणी घाटातून जाणं-येणं खरंतर आता अंगावर येवू लागलंय. अतिउत्साही पर्यटकांच्या गर्दीमुळे इथला निसर्ग नको रे बाबाअशी म्हणण्याची वेळ येते आहे. भटकंतीसाठी लागणाऱ्या शहाणपणाचा अभाव आता सर्वत्रच जाणवू लागला आहे. पण हा ताम्हीणीचा घाटरस्ता सोडला की मग आजूबाजूची छोटीखाणी टुमदार गावे, तळी, धरणं हे अगदी मनसोक्त पाहण्यासारखं आहे. कोणत्याही ऋतूत येथील निसर्ग तुम्हाला वेडच लावेल यात शंका नाही. अशा याच दुर्गम भागात म्हणजे मुळशीच्या खोऱ्यात दोन अद्भुत गिरिशिल्पे दडून बसली आहेत. ही दोन्हीही ठिकाणे एकमेकांपासून जवळच असल्याने एका दिवसात आरामात पाहून होतात. त्यांचीच भटकंती आपण करणार आहोत.

भादसकोंडा लेणं :-

                खरंतर भादसकोंडा हे नाव बहुतेकजण तर पहिल्यांदाच ऐकतील. पण या गावाचं वैशिष्ट मात्र बरंच वेगळं आहे. भटक्यांना अपरिचित असलेला कैलासगड ज्या गावाला खेटून उभा आहे, तेच हे भादसकोंडा गाव. मुळात कैलासगडावर येणाऱ्यांची संख्याच विरळ. आणि या विरळ गर्दीतली पावलं देखील या भादसकोंडा लेणीकडे फिरकत नाही. इतकं हे उपेक्षित लेणीशिल्प आहे. पुणे जिल्ह्यातील पौडवरून ताम्हिणी घाटाकडे निघालो की, उजवीकडे लोणावळ्याला जाण्यासाठी एक फाटा लागतो. या फाट्यावरून पिंप्रीवरून भादसकोंडा हे गाव गाठायचे. या गावातच हे लेणं कैलासगडाच्या पोटात लपलेलं दिसतं. खरंतर हे लेणं म्हणजे एक छोटसं विहारच आहे फक्त. रस्त्यापासून पाचच मिनिटात आपण या विहारासमोर पोहचतो. याच्या उजव्या बाजूला एक खोली कोरलेली आहे. त्याच्या आतमध्ये झोपण्यासाठी बाक देखील बनवला आहे. या विहाराच्याच डाव्या बाजूला दिड-दोन फुटाचं खोलगट कुंड देखील दिसते. सध्या हे विहार अतिशय अस्वच्छ असून येथे कचराही केलेला दिसतो. हे विहार जरी लहान असले तरी मात्र या विहारामधून समोर दिसणारा मुळशी धरणाचा कॅनव्हास हा जबरदस्तच आहे. भटकंतीचा सारा शीण पळवणारे हे दृश्य म्हणजे मुळशी खोऱ्यातील निसर्गाची फक्त एक झलक आहे.

स्थानिक देवता ....हीच भादसकोंडा लेण्याकडे जाताना ची महत्त्वाची खूण  



           

भादसकोंडा लेण्यामधून मुळशीचा परिसर 

    

भादसकोंडा लेण्यात 

निवांतक्षणी 



असो हे भादसकोंडा लेणं पहायला पंधरा-वीस मिनिटे आरामात पुरतात. पण प्रश्न या ठिकाणच्या लहानपणाबद्दल नाहीये. कारण सह्याद्रीत आढळणारी एखादी वास्तू लहान असो व मोठी तुमची भटकंती ही नक्कीच समृद्ध करत असते. आणि एक नवा अनुभव तुमच्या पाठीशी बांधून देत असते. भादसकोंडाची भटकंती ही त्याच पंक्तीतली .....

गोठं लेणं-गुहा:-

                वर उल्लेख केलेल्या पिंप्रीगावावरूनच गोठं गाव विचारायचं. या मुळशी खोऱ्यातली गावं अतिशय छोटी; पण देखणी. त्यामुळे हि गावे एकमेकांपासून बऱ्याच अंतरावर दिसतात. गोठं गावाचं नावही बहुतेकांनी पहिल्यांदाच ऐकलं असणारं यात शंका नाही. या गोठं गावातही भटकंतीचा मोठा ऐवज लपलाय. तो म्हणजे एका गुहेचा. यासाठी गावातच गाडी लावायची अन् गावातीलच एखाद्या ग्रामस्थाला गुहेचा रस्ता विचारायचा. स्थानिक लोकं या ठिकाणाला गुहा म्हणूनच संबोधतात. पक्क्या डांबरी रस्त्यापासून अर्ध्यातासाची तंगडतोड आपल्याला करावी लागते.

गोठे लेण्याकडे जाताना 

 

डोंगराच्या कुशीत दडलेलं गोठे लेणे

गोठे लेण्यात 

गावच्याच पश्चिमेला असणाऱ्या अर्धवर्तुळाकार डोंगराच्या पोटात हि वाट जाते. घनदाट झाडीतून थोडा चढ चढून आपण एका अद्भुत गुहेपाशी पोहोचतो. अर्धवर्तुळाकार आकारात खोदलेली ही गुहा रामघळीची अथवा शिवघरघळीचीच  आठवण करून देते. अतिशय प्रशस्त असलेल्या या गुहेत १०० ते १५० माणसं सहजपणे बसू शकतील, एवढ्या मोठ्या आकाराची ही आहे. आणि ही अतिशय स्वच्छ आहे हे विशेष. या गुहेच्या छपरावर छन्नी-हातोड्याचे घाव दिसतात म्हणजे हि गुहा घडवली असल्याचे अनेक संशोधकांचे मत आहे. या गुहेचा शोधही अलीकडेच लागल्याचे सांगितले जाते. या गुहेच्या डाव्या बाजूस एका तुटलेल्या बाकाचे अवशेष दिसतात. तसेच गुहेत गावकऱ्यांनी पुजलेला पाटा आणि वरवंटा ठेवलेला आहे. गुहेचा सभोवताल गर्द झाडीने वेढला असल्यामुळे येथे कमालीची शांतता आणि थंडावा जाणवतो. ही गुहा अजूनही धांगडाधिंग्यापासून दूर असल्यामुळे येथे निवांतपणा अनुभवायला मिळतो.

कपारीसारख असलेल मानवनिर्मित गोठे लेणे 

   इंझाई माता    

         असो. या दोन्ही ठिकाणाबरोबरच पौड जवळील पिरंगुट गावातील इंझाई मातेचं मंदिरही पाहण्यासारखे आहे. गर्द झाडीत वसलेलं आणि उभेवाडीच्या उंच डोंगरावर असलेलं हे मंदीर वेगळाच फिल देऊन जाते. यात शंका नाही.

 इंझाई माता    

                अशी ही मुळशीची अनवट ठिकाणे, एका दिवसांत आरामात पाहून होतात. स्वत:च्या वाहनांशिवाय येथे जाणे केवळ अशक्यच. दिवसभराच्या ताणतणावातून ज्यांना बाहेर पडायचे आहे त्यांच्यासाठी ही ठिकाणे आहेत. नेहमीच्या ठिकाणांवर जाण्यापेक्षा एकदा या आडवाटेवर येवून पहायला काय हरकत आहे ...... ?  



ट्रेकला जाताना मिसळ खाल्लीच पाहिजे 


जाण्याचा मार्ग 

पुणे जिल्ह्यातील पौडवरून ताम्हिणी घाटाकडे निघालो कीउजवीकडे लोणावळ्याला जाण्यासाठी एक फाटा लागतो. या फाट्यावरून पिंप्रीवरून भादसकोंडा हे गाव गाठायचे. पिंप्रीगावावरूनच गोठं गाव विचारायचं. 

भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी

पावसाळा सोडून कधीही 


सूचना
  • भादसकोंडा  गावात या लेण्याकडे जाण्याची वाट विचारून घ्यावी.
  • निसर्गाची हानी टाळून  आणि त्याचे पावित्र्य राखूनच भटकंती करावी.




 


Comments

Popular posts from this blog

पळशी ...एक सुंदर गाव !!

कऱ्हे पठारावरचा भक्तीचा मळा !!

गौताळा अभयारण्याचे अंतरंग