देखणा “बामणडोह”

 

          महाराष्ट्रातल्या अनेक गावांत विहिरी दिसतात. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या गावात तर आवर्जून दिसतात. या अशा गावांपैकी एक गाव म्हणजे तळेगाव दाभाडे! मराठेशाहीतील पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांना इनामात मिळालेलं हे गाव इतिहासाच्या पाउल खुणा अंगावर घेऊन उभं आहे. याच गावात काही ऐतिहासिक वास्तू आपल्याला दिसतात. यातलीच एक सुंदर आणि सुरेख वास्तू म्हणजे एक अदभूत विहीर. हिलाच स्थानिक भाषेत “बामणडोह” म्हटलं  जात. पुर्वी विशिष्ट समुदायांना  सरदारांकडून अथवा राजांकडून विहिरी बांधून दिल्या जात असत. अशीच एक विहीर तळेगावात बांधून दिली गेली. ब्राम्हण समुदायाला अथवा वस्तीला  बांधून दिलेल्या या विहिरीला “बामणडोह” असे नाव पडले, असे अनेक इतिहास अभ्यासक सांगतात. तर अशा विहिरी या राजस्त्रियांच्या स्नानासाठी बांधल्या जात असत असही काही अभ्यासकांच मत आहे. कारण काहीही असो, पण अशा विहिरी असतात मात्र सुरेख !

        गोल-गोल किंवा चौकांनी अशा आकाराच्या या विहिरींभोवती इतिहासाच वलय तर असतेच पण या विहिरींना स्थापत्याच अनोख कोंदणही लाभलेलं असत. तर कधी-कधी या विहिरींना गूढरम्य आश्चर्याची किनारही चिकटलेली असते याशिवाय  खाली विहिरींच्या पोटात गारवाही  सुखाने नांदत असतो. अशा गारव्याचा निवांत अनुभव घेण्यासाठी खास बसण्यासाठी जागाही बांधलेली असते, त्यामुळेच या अशा विहिरी जणूकाही “ जलवास्तुच” भासतात. एखाद्या निवांत क्षणी याव अन ही जलवास्तू मनसोक्त अनुभवावी .अगदी याच प्रकारात ही “बामणडोह” मोडते.

वरून घेतलेला फोटो 

बामण डोह मध्ये उतरण्यासाठीच्या पायऱ्या 

शिवलिंगाच्या आकाराची  बामणडोह विहीर 

विहिरीचे गवाक्ष 

बाराही महिने तळाशी असणारे पाणी 




          पुणे-मुंबई द्रुतगती  मार्गाने अथवा मुंबई-बेंगळूरु जुन्या रस्ते महामार्गाने तळेगाव हे गाव लागते. मुख्य रस्त्यापासून साधारण तीन-किलोमीटर आत गाव भागात आलो की स्मशान भूमी शेजारील “बामण डोह” पाशी यायचं. अर्थात येथे रेल्वेमार्गाने ही येऊ शकतो. पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर तळेगाव स्थानक आहे. येथून रिक्षाने येथे येता येते. एकदा का प्रवासाचे सोपस्कार पार पडत विहिरीपाशी आलो की विहिरीच्या स्थापत्यात दंग व्हायचे.

          साधारण शिवलिंगाच्या आकाराची ही विहीर संपूर्ण दगडातच बांधलेली दिसते. पूर्वेकडून या विहिरीत खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आपल्याला विहिरीच्या अंतरंगात घेऊन जातात. साधारण मध्यभागी गेलो की, मग आश्चर्याचा आणखी एक धक्का आपल्याला बसतो. तो म्हणजे या विहिरीभोवती  आतमध्ये फिरण्यासाठी गावाक्षांचा सुंदर अर्धवर्तुळाकार  मार्ग म्हणजे हॅटस ऑफ! दगडात घडवलेल्या पाच कमानींचा  असलेल्या हा मार्ग विहिरींच अंतरंग सुरेख  उलगडून दाखवतो .येथे बराच वेळ रेंगाळल तरी मन भरत नाही. करण अशी सुंदर कलाकृतीने घडवलेली विहीर बघायची सवय आपल्याला नसते आणि येथे तर स्थापत्याचाही अविष्कार  जोडलेला आहे. विहिरीतुंन बाहेर आलो की मग वरच्या बाजूस मोटेच्या धक्क्यापाशी यायचे. विहिरीतले पाणी उपसण्यासाठी अशी बांधकामे ही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी विहिरीकाठी आढळतात. शेतीसाठी लागणारे पाणीसुद्धा या मोटेतून पुरवले जाई. हे सारे बारीक-सारीक तपशील पाहिले पाहिजे तरच अशा वास्तू बघण्यात मजा आहे. कारण अशा छोट्या छोट्या  गोष्टीतूनच विहीरीच सौंदर्य अनुभवण्यात जास्त आनंद आहे.

          अशी ही विहीर! भलेही आजच्या युगात हिचे व्यवहारमुल्य शून्य असेल. पण इतिहासाच्या चष्म्याने पाहिलं तर हा वैभवशाली वारसा आहे. ही वास्तू म्हणजे केवळ पाणी साठविण्याचे साधन नसून ती एक परिपूर्ण जलवास्तूच आहे यात शंका नाही. एखाद्या निवांतक्षणी या जलवास्तूत यायचे अन कमानीदार  गवाक्षांमधून विहिरीचं गहिर पाणी पाहत  राहायचं.... एकदा तरी हा अनुभव घ्यायला तळेगावी याच.


जाण्याचा मार्ग

पुणे-मुंबई द्रुतगती  मार्गाने अथवा मुंबई-बेंगळूरु जुन्या रस्ते महामार्गाने तळेगाव हे गाव लागते. मुख्य रस्त्यापासून साधारण तीन-किलोमीटर आत गाव भागात आलो की स्मशान भूमी शेजारील “बामण डोह” पाशी यायचं. अर्थात येथे रेल्वेमार्गाने ही येऊ शकतो. पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर तळेगाव स्थानक आहे. येथून रिक्षाने येथे येता येते. 


भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी 

वर्षभर  केव्हाही.


निसर्गाची हानी टाळून  आणि त्याचे पावित्र्य राखूनच भटकंती करावी.



                                           

Comments

  1. अतिशय सुंदर लिखाण...
    लहानपणी बसत असत आम्ही या विहिरीजवळ....

    ReplyDelete
    Replies
    1. खर आहे..ती जागाच भन्नाट आहे.

      Delete
  2. The garva seating area..must be amazing and refreshing..nice information..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पळशी ...एक सुंदर गाव !!

कऱ्हे पठारावरचा भक्तीचा मळा !!

गौताळा अभयारण्याचे अंतरंग