धबाबा लोटती धारा....!!

 पाऊस म्हटंल की धबधब्याच नाव ओघाने येतेच. किंबहुना पाऊस आणि धबधब्याच नातच मुळी पर्यटनाच्या विश्वात महत्वाच समजल जाते. दोघांचा अविष्कार हा पाहण्याजोगाच असतो. एकंदरीतच धबधबा जेवढा आकर्षक, सुंदर दिसतो, तसाच तो अनुभवासादेखील वाटत असतो. पावसाच्या दिवसात तर सह्याद्रीच्या डोंगररांगात तर धबधब्याचा असंख्य माळा साद घालताना दिसतात. डोंगराच्या कातळ कड्यावरून जीवाच्या आकांताने उड्या मारणाऱ्या या पाण्याच्या प्रवाहाने जसे भटक्यांना, पर्यटकांना वेड लावले आहे तसेच साहित्यक्षेत्रातील कवी, लेखकांनाही लावले आहे. नवसाहित्यिकांना तर पाऊस आणि धबधब्याशिवाय दुसरा सुंदर आधार बहुधा कुठलाही नसेल, इतकी यात शब्दांची सृजनशीलता भरलेली दिसून येते. समर्थ रामदासांनीही शिवथरघळी समोरून पडणाऱ्या धबधब्याचे किती सुंदर वर्णन केलंय पहा ना...

 "गिरीचे मस्तकी गंगा तेथुनि चालली बळे

 धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे"

धबधब्याच रौद्रसुंदर रूप, शेकडो फुटावरून कोसळणाऱ्या प्रपाताचा धीरगंभीर आवाज, पाण्याच्या प्रवाहाची होणारी नयनरम्य हालचाल या साऱ्या गोष्टीना नजरेत सामावून घेणे म्हणजे मोठे अवघड काम. धबधब्याच हे रूप डोळ्यांनी साठवताना दमछाक झाली की मग काही जण कॅमेऱ्याचा “क्लिक-क्लिकाट” सुरु करतात, तर काही शब्दांचा आधार घेऊन या धबधब्यांवर प्रेम करताना दिसतात. एकंदरीत सांगायचा मुद्दा हा की पाऊसात फिरायला जायचे म्हटल्यावर सर्वांच्या नजरेत एखादा धबधबा समोर येतोच.

..... पण झालय काय... सर्वांनाच पावसात फिरायचं. भिजायचय. धबधबा पाहायचाय. त्यामुळे वीकेंड आला की सगळ्यांचीच पावले कोणत्या ना कोणत्या धबधब्याकडे वळतात. येथे जत्रेसारखी गर्दी करतात. परंतु या सर्व गोंधळात रसिक पर्यटक किती? हा मोठा संशोधनाचा विषय असतो. यातले बहुतेक तर ‘नवशे’ असतात. अमुक निघाला म्हणून मी चाललो या गटातले! यांना पावसाच्या अंदाजाचा आणि रसिकतेचा आजीबात गंध नसतो.निसर्गाबाबत आपुलकी नसते. त्यामुळे केवळ मौजेसाठी ही मंडळी धबधब्याखाली धिंगाणा घालण्यासाठी जमत असतात. दारू पिली जाते. डोक्यावर बाटली ठेवून वेडेवाकडे अंगविक्षेप केले जातात. प्लास्टिकचा आणि बाटल्यांचा खच पाडला जातो. भिजण्यासाठी ही मंडळी धोकादायक ठिकाणी चढतात. कोणी ह्यांना समजावयाला गेले की त्यांच्यावर अर्वाच्य शिवीगाळ केली जाते. हा सारा धांगडधिंगा धबधब्याखाली सुरु असतो. असे वातावरण जर तिथेअसेल   तर कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांना माना खाली घालण्यासारखा दुसरा पर्याय नसतो . साधारण थोड्याफार असे चित्र सर्रासपणे आपल्याला पहायला मिळते. त्यामुळे धबधबा नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ आपल्यावर येते. तरी देखील धबधब्याची ओढ आपल्याला काय गप बसू देत नसते. आणि त्यात ट्रेकर्सचा ग्रुप असला की, मग विचायारालाच नको. भटकंतीच्या प्रेमापोटी गर्दीविरहीत, धांगडधिंगामुक्त धबधबा शोधून काढला जातोच.

मोहिली धबधबा

मोहिली धबधबा हा रायगड जिल्ह्यातील कर्जत पासून साधारण सहा  किलोमीटर्स अंतरावर आहे. या गावात  प्रवेश करताना आपल्याला उल्हास नदी ओलांडून जावे लागते.मोहिली गावातच रस्त्याला "मोहाली मिडोस" नावाचे मोठे हॉटेल आहे.या जवळच गाड्या लावायच्या अन पायवाटेने धबधब्याकडे निघायचे.या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा सोनगिरी किल्ल्याच्या डोंगरात हा धबधबा आहे. डोंगर माथ्यावरुन मुंबई-पुणे रेल्वेचा बोगदाहि  इथून दिसतो.दोन टप्प्यात कोसळणारा पाण्याचा प्रपात  आपल्या डोळ्यांना सुखावून जातो.
मोहिली धबधबा


मोहिली धबधबा

वदप धबधबा

अत्यंत मनमोहक असलेला हा धबधबा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या  वदप गावानजीक आहे.कर्जत  पासून केवळ सहा कि.मी. अंतरावर हा धबधबा आहे. हा धबधबा पर्यटकांना कायमच खुणावत असतो. कुटुंबियांसह आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे गर्दी करत असतात. विशेष म्हणजे हा धबधबा प्रसिद्ध अश्या भिवगड   अश्या किल्ल्याला लागूनच आहे.

वदप धबधबा

वदप धबधबा

कातळधार

येथे येण्यासाठी लोणावळ्याहून राजमाचीचा रस्ता पकडायचा. या रस्त्यावरील ‘डेला’ हे ठिकाण सोडून तीन-चार किलोमीटर पुढ आले कि, या रस्त्यालाच अप्पर डेकचा रस्ता मिळालेला दिसून येतो. येथून थोड पुढे गेलो की, एक मोठ आंब्याचं झाड दिसते. याच्याच पुढे भलामोठा गोल दगड पडलेला आहे. कातळधारेसाठी हीच महत्त्वाची खूण लक्षात ठेवायची. येथूनच मुख्य वाटा सोडून डाव्या बाजूला वळायच. खरतर आता आपला सुरु होतो कातळधारेसाठीचा एक उत्कट प्रवास! डोक्यावर कोसळणारा पाऊस, चिखलाने मळकटलेली रानवाट, गर्द झाडी, हिरव्या रंगाची धरतीवर पसरलेली चादर, वाटेवर मध्येच आडवे येणारे छोटे छोटे ओढे... या साऱ्या निसर्गखेळातून आपला एक अवर्णनीय प्रवास सुरु होतो. इतर ट्रेकर ग्रुप्सने केलेल्या छोट्या खुणावरून आपण भरकटत नाही. खरतर धबधबा पाहायला मिळणार ही उत्सुकता तरअसतेच; परंतु खरी मजा मात्र या उद्दिष्टांपर्यंतच्या प्रवासादरम्यान आहे. निसर्गाची ही सारी सर्जनशील रूपे डोळ्यांत साठवण्याइतका आनंद बहुधा दुसरा कुठला नसावा. वाटेवर निसर्गाने ओतलेले हे अदभूत क्षण म्हणजे भटकंतीला मिळालेली एक खमंग फोडणीच आहे.

कातळधार

कातळधार

           असो, कातळधारची ही वाट आहे दिडतासाची, उताराची आणि मधेच असणाऱ्या सपाट चालीची. ही वाट चालताना मध्येच रेल्वेचा आवाज गंमत वाढवतो. तर गर्द झुडुपातून समोर दिसणाऱ्या राजमाचीच्या दोन बालेकिल्ल्यांच्या दर्शनाने अंगावर रोमांच चढवतो. या प्रवासाची आता कुठे रंगत आलेली असते. वाटेवरच्या एका टप्प्यावर आपण वळतो अन काही पावले टाकतो तर ते अदभूत, अवर्णनीय आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य समोर अवतरते. एका उंच कातळाच्या माथ्यावरून खाली झेपावणारा पाण्याचा तो प्रचंड लोंढा जणू सौंदर्याची सारीच परिमाणे नव्याने मांडण्याचा प्रयत्न करतो की काय असे वाटत असते. साधारण दोन टप्यात आणि शंभर फुटांच्या आसपास उंचीवरून बेभान होणारं हे पाणी जीवाच्या आकांताने खाली पडत असतं. पाण्याच्या या खेळात किती उत्कटता आणि विविधता सामावलेली आहे त्याचं कौतुक वाटतं. या पाण्याला कुठलही बंधन नाही की, कुठलेही भय नाही. केवळ झेपावण एवढंच या पाण्याला माहित आहे. कातळधारेच्या सौंदर्याच हेच वैशिष्ट्य आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवत. या पाण्याच्या प्रपाताला कितीही वेळ पाहिलं तरीही मन भरत नाही आणि येथे मिळणारी मनसोक्त शांतता पायांना निघू देत नाही.निसर्गाचा हा सौंदर्याविष्कार पाहण्यासाठी मात्र थोडी काळजी आणि सावधानता बाळगण हे गरजेचे आहे. येथे येण्यासाठी स्थानिक वाटाड्या घेतला तर चुकण्याची शक्यता नाही.

परिटेवाडीचा धबधबा

परिटेवाडीचा धबधबा

खरेतर हे गावही अनेकांना माहीत नाही.नकाशावर शोधतानाही आपली दमछाक होईल.पण भूगोलाच्या चष्म्याने जर या गावाकदसे पहिले तर तुम्हालाही हेवा वाटेल. पाण्याने तुडुंब भरलेली भातखाचरे..ओलेचिंब वळणावळणाचे रस्ते ..आसमंतात पसरलेले धुके हे सारे अनुभवण्यासाठी एकदा तरी परिटेवाडीला भेट द्यावी लागेल.पुणे-मुंबई महामार्गाजवळील मावळ तालुक्यातील तळेगाव एम.आय.डी.सी. वरून निगडेमार्गे इंगळूनहून परिटेवाडीला यायचे. गावातच डोंगराच्या कुशीतील हा धबधबा डोळ्यांचे पारणेच फेडतो. धबधब्याकडे जाणारी वाट मात्र अजिबात मळलेली नाही.त्यामुळे येथे विचारातच शेताच्या बांधणीवरुन जावे लागते. आणि आपण साधारण अर्ध्या तासात डोंगरकड्याच्या खाली येतो. तीनशे फूट उंचीवरून कोसळणारा हा पाण्याचा प्रपात छातीवर अक्षरशः दडपणच आणतो.

परिटेवाडीचा धबधबा

मंदोशी आणि भोरगिरी

खेड म्हणजेच राजगुरूनगर. पुणे-नाशिक रस्त्यावर वसलेले तालुक्याचे ठिकाण. येथून वाडा मार्गे भीमाशंकरकडे  जाणारा रस्ता पकडायचा. या रस्त्याने मजल दरमजल करत आपण एका फाटय़ापाशी येऊन थांबतो. येथून डावीकडचा रस्ता भोरगिरीला जातो, तर उजव्या बाजूचा रस्ता भीमाशंकरला. भीमाशंकरचा रस्ता खडय़ा चढाचा आहे. या वाटेवर असणाऱ्या मंदोशी गावात आपल्याला जायचं आहे. हे गाव म्हणजे गाव कमी आणि निसर्गचित्रच अधिक आहे. येथील धबधबा प्रसिद्ध आहे. डोंगरमाथ्यावरून कोसळणारा जलप्रवाह येथील मूळ सौंदर्यात भर घालतो. हा धबधबा देखणा तर आहेच, शिवाय मनसोक्त भिजवणारा आहे. अगदी रस्त्यावरूनच त्याचे दर्शन होते. कडेला गाडी लावून चालत दहा मिनिटांत आपण हा धबधबा गाठू शकतो. अर्थातच सर्वच धबधब्यांवर जाताना जी काळजी घ्यायची तीच येथे देखील घ्यावी लागेल. मंदोशीवरून पुन्हा मागे येऊन भोरगिरीकडे जाणारी वाट पकडायची. सात-आठ किलोमीटरवर असलेले भोरगिरी म्हणजे येथील भटकंतीचा उत्कर्षबिंदूच म्हणायला हवा.भोरगिरी किल्ल्याशेजारीच असंख्य धबधब्यांच्या माळा तुम्हाला दिसतील.

मंदोशी धबधबा 

मंदोशी धबधबा 


पडसरे धबधबा

रायगड जिल्ह्यातील खोपोली-पाली रस्त्यावर पालीच्या अलीकडे साधारण सहा-सात किलोमीटरवर पडसरे गावाला जाणारा रस्ता  आहे. याच पडसरे गावाच्या अलीकडे अगदी रस्त्याला लागूनच पडसरे नावाचा नितांतसुंदर  धबधबा आहे.या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा   उंचीने  कमी आहे पण  रुंदीला बराच मोठा असल्यामुळे त्याखाली आपण भिजण्याची  मजा घेऊ शकतो.पाण्याच्या प्रवाहाने खाली एक कृत्रिम डोह तयार झालाय त्यामुळे  या डोहात डुंबण्याचा आनंद हि घेता येतो.. येथे येण्यासाठी स्वत:चे वाहन हवे अन्यथा पाली गावातून खाजगी वाहने मिळू शकतील.

पडसरे धबधबा

 

 


 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पळशी ...एक सुंदर गाव !!

कऱ्हे पठारावरचा भक्तीचा मळा !!

गौताळा अभयारण्याचे अंतरंग