‘‘राजियांचा गड अन् गडांचा राजा’’ अशी बिरूदावली अभिमानाने मिरवनाऱ्या राजबिंडा या राजगडाचे स्थान हे दुर्गवेडयांच्या आणि भटकंतीच्या विश्वात मानाचे तर आहेच, तसेच ते इतर सर्व दुर्गापेक्षा वेगळे देखील आहे. अशा या किल्ल्याचे रांगडे, रूबाबदार रूप पाहण्यासाठी कित्येंक दुर्गयात्रींचे पाय हे या ठिकाणी कायमच वळत असतात. कितीही गड किल्ले पाहीले तरीही या गडाची बातच न्यारी! याचा इतिहास तर रंजक आहेच, शिवाय येथला भूगोलही आपल्या सारख्या पांथस्थांच्या डोळयांचे पारणे फिटवणारा आहे. त्यामुळे येथे का यायचे यासाठी कारणांची गिणतीच न केलेली बरी!
 |
| पावसाळ्यातला राजगड |
वारकरी ज्या भावनने पंढरपूरच्या विठुरायाची वारी दरवर्षी नित्यनियमाने न चुकता करीत असतात. अगदी त्याच भावनेने अस्सल दुर्गयात्री या देखण्या राजगडाची मोहीम नेहमीच आखीत असतात. म्हणूनच राजगडाला आवडीने भटक्यांची पंढरीसुद्धा म्हटले जाते ते याच कारणामुळे. दुर्गभ्रमंतीची आवड आहे पण राजगड अजुन पहायचाय... असा दुर्देवी फिरस्ता तुम्हाला शोधूनही सापडणार नाही आणि सापडलाच तरीही त्याच्यासारखा करंटा दुसरा कोणीही नसेल. त्यामुळेच ‘राजगड पाहीलास का?’ हा प्रश्न एकमेकांना विचारण्याऐवजी ‘‘तू, राजगड किती वेळा पाहीलास’’ हा प्रश्न आपोआपच विचारला जातो. मग या अशा प्रष्नाचे उत्तरही असेच दिलखुलासपणे दिले जाते. ‘‘राजगड ना... मी दहा वेळा पाहीलाय.’’ असे दर्दी उत्तर क्षणाचाही विलंब न लावता पलीकडून मिळून जाते. कधी-कधी तर ‘‘मी, राजगडला दरवर्शी तीनही ऋतुत जात असतो.’’ असेही चमकदार उत्तर मिळुन जाते. हे कमी म्हणून की काय राजगड किल्लयावर जाणाऱ्या वेगवेगळया वाटा चोखाळणारे साहसी वेडे सुद्धा आपल्याला याच गडावर भेटत असतात. अस्सल दुर्गवेडया मंडळींना तर राजगडावर जाण्यास कठुलीही वेळ आडवी येत नाही. ही मंडळी पौर्णिमेच्या पिठुर चांदण्यात तरी निघतील नाही तर अमावस्येच्या काळरात्रीही पाठीवर सॅक अडकवून या गडाची माती कपाळाला लावण्यासाठी घराबाहेर पडतील. त्यामुळेच कितीही रखरखत उन असो, धो-धो पाउस असो वा हाडे गोठावणारी थंडी असो. या साऱ्या अडचणींवर सहजपणे मात करत गडभेटीचा आनदं द्विगुणीत करणारे बरेचजण या गडावर तुम्हाला दिसतील. काही-काही हौशी मंडळी तर येथे दिवाळीत रांगोळया काढायला येतात. तर काहीजण दिपोत्सव साजरा करायला येतात. तर काही जण 15 ऑगस्ट , 26 जानेवारी असे राष्ट्रीय दिन सुद्धा उत्साहात साजरे करीत असतात. लहान मुलांचे बोट धरून राजगड चढणाऱ्या पालकांना आणि वडिलधाऱ्या मंडळींना पाहुन तर अगदी भारावल्यासारखच वाटतं. एकदा तर आम्ही गडावर जात असतांना अंध व्यक्तींचा ग्रुप गड ‘‘बघायला’’ आला होता. या सर्वांच्या उत्साहाला पाहून तर यांच्या मनात असलेल्या राजगडवरच्या प्रेमाला उपमाच सुचली नाही. यातल्याच एका व्यक्तीने सांगितले की, आम्ही राजगड अनेकवेळा ऐकला, पण मन भरले नाही. त्यामुळेच स्पर्शाने अनुभायाला आम्ही आलो आहोत.आमच्यापेक्षा या अंधानीच हा राजबिंडा गड जास्त अनुभवला असेल यात शंका नाही.
 |
पावसाळ्यातली वाट ...
|
 |
गडाच्या वाटेवरची रानफुले
|
 |
पावसाळ्यात राजगडच्या बुरुजानाही हिरवा साज चढतो
खरोखरच राजगडची वाट धरणार्यांना हा गड काही निराश करीत नाही. स्वराज्यासाठी अहोरात्र झिजणाऱ्या या गडाच भौगोलिक स्थानही तेवढंच आकर्षक आहे. पुणे जिल्हयातील वेल्हे तालुक्यात स्थित असणारा हा दुर्ग अनेक वाटांनी आपल्याला बोलावित असतो. एकदा का गडावर यायचं म्हटलं की पायथ्याच्या गुंजवणे गावातून गुंजवणे दरवाज्यातून वा चोरदरवाज्यातून, भूतोंडेवरून अळू दरवाजातून, पाली गावातून पाली दरवाजातून या साऱ्या वाटा आपली आतुरतेने वाट पाहत असतात. प्रत्येक वाट ही वेगळा आनदं आपल्या गाठीशी देते. जी गोष्ट वाटांची... तीच ऋतुंची. येथे येण्यासाठी कुठलाही ऋतू निवडा. या गडाचं रूप प्रत्येक ऋतुत वेगळंच भासत आणि हवहवसं देखील वाटतं. उन्हाळयात जेवढा हा गड आव्हानात्मक वाटतो, तेवढाच तो हिवाळयात रोमहर्षक वाटतो.पावसाळयातली तर याची बातच न्यारी. हिरवागार गालीचा पांघरलेला हा गड पाहताना आपण कधी शब्दवेडे होतो ते कळत देखील नाही.
|
 |
| महादरवाजा आणि तटबंदी |
 |
| महादरवाजा |
 |
पद्मावती तळ्याचे आणि त्याच्या पलीकडे उतरलेल्या ढगाचे अप्रतिम दृश्य
|
 |
| धुक्यात हरवलेला राजगड |
हे सारे सोपस्कार पार पाडत.... एकदा का आपण या गडावर आलो की मग या वेगळयाच विश्वात अगदी हरवून जातो. नक्की काय-काय पहायचे आणि किती पहायचे... या सर्वांनी आपण अगदी गोंधळून जातो. गडाची एकेक सुंदर बाजु अशी समोर येत जाते.... अन् आपण यात अलगद गुंतत जात असतो. गडाच्या तीन माच्या..... पद्मावती, सवुेळा आणि संजीवनी माची.... या माच्यांवर तर जीवच ओवाळुन टाकावासा वाटतो. नागिणीसारख्या सळसळत दुरवर गेलेल्या या माच्यांचे चिलखती बांधकाम तर अगदी पहातच राहावेसे वाटते. विषेशतः संजीवनी माचीचे डोळे विस्फारणारे बांधकाम पाहुन महाराजांची दुर्ग बांधणी किती प्रगत होती याचा अंदाज येतो. या अभेदय माच्या पाहून औरगं जेबाचा समकालीन साकी मुस्तैदीखान म्हणतो की, ‘‘या माच्या म्हणजे एक प्रकारे दुसरे किल्लेच आहेत.’’ यातच या माच्यांचे श्रेष्ठत्व समोर येते. या माच्या पाहण्यास एखादा दिवसही अपुरा पडेल. इतकं यात स्थापत्य दडलेलं आहे. शिवकाळात मोठी धामधुम असलेल्या या गडावर बांधकामे आता शाबुत राहीली आहेत कुठे ? तरीपण पद्मावती माचीवरील सदरेचे, वाडयाचे, अंबारखाना, घोडयाच्या पागा आदींचे पडके अवशेष पाहुन नकळतपणे आपले मन अगदी भारावून जाते. या पडलेल्या बांधकामांवरच आपल्या कल्पनेचे अंदाज बांधत मन शिवकाळात न्यायचे. यातनु बाहेर पडलो की मग वाट धरायची ती थेट बालेकिल्ल्यावरच!
 |
राजगडच्या बालेकील्ल्यावरून टिपलेले सुंदर दृश्य
|
 |
पद्मावती माची
 | फोटो घेण्याचा मोह येथे आवरत मात्र नाही
|
|
अत्यंत उभ्या चढणीचा हा बालेकिल्ला म्हणजे आपल्या साऱ्या भटकंतीचा उत्कर्ष बिंदूच! हाराकिरीची चढाई करून येथे आल्यावर सर्वप्रथम आपण ‘स्व’ च गमावून बसतो. येथून दिसणाऱ्या तीनही माच्यांचे वर्णन शब्दात करणं मोठं कठीण काम! तीन दिशेला तीन माच्या आणि यांच्यावर हा बालेकिल्ला! ही रचना जर आकाशातून पाहीली तर एखादया गरूडाप्रमाणेच भासले. येथून दिसणारा सहयाद्री जर पाहीला तर ती आयुष्यभराची शिदारेी ठरेल. इतकं सुंदर आणि उत्कट डोंगरांच लावण्य याची देही याची डोळा हे अनुभवायला मिळतं.
खरोखरच ‘राजगड’ हा सर्वार्थाने भाग्यशाली गड म्हटला पाहीजे. शिवरायांनी त्यांच्या हयातीतील साधारण पंचवीस वर्षे या गडावरून स्वराज्याचा कारभार पाहीला. त्यामुळे महाराजांचे कर्तृत्त्व खऱ्या अर्थाने अनुभवले,....आणि पाहीले ते या गडाने! किती-किती प्रसंग या गडाने अनुभवले असतील. स्वराज्याच्या पहील्या राजधानीचा उत्कट प्रसंग येथेच घडला. येथल्याच भिंतींनी अफजलखनाच्या आणि शायिस्तेखानाच्या पाडावाची खलबते ऐकली. एवढचे नव्हे अफजलखानाचे शिरही याच गडाने पाहीले. महाराज आग्र्याला निघाले असता हाच गड शहारला असेल आणि आग्र्याहून परतल्यावर याचे आनदं अश्रू क्वचितच कुणी पाहीले असतील. इतकचे नव्हे तर छत्रपती राजारामांचा जन्म आणि महाराणी सईबाईचा दुःखद प्रसंगही येथेच घडला..... यासारख्या कित्येक घटना येथे घडल्या असतील.कदाचित आपल्यासारख्या भटक्यांना त्या कल्पनेने जाणवतीलही... फक्त भावना मनात हवी. असो, या गडावर लिहीण्यासारखे बरेच आहे. त्यामुळेच कित्येक दुर्गवेडयांची, इतिहासकारांनी, सहयाद्रीवर प्रेम करणाऱ्यांनी या गडावर शब्दांची अक्षरशः उधळण केली आहे. या सर्वांच्या लेखणीतून उमटलेली शब्दांची फुले ही या गडाच्या प्रेमालाच अर्पण झाली आहे. म्हणूनच सहयाद्रीच्या या देव्हाऱ्यात उधळलेली फुले वेचण्यासाठी आणि पाहण्यासाठी का हेाईना या गडावर एकदा तरी या. न जाणो.... या फुलांचा सुगंध तुमच्या आमच्या मनात आयुष्यभर दरवळत राहील.....
 |
| राजगडाचे विलोभनीय दृश्य |
पावसाळ्यातले राजगड चे रुप नक्की पाहू....
ReplyDelete- वैभव कुलकर्णी.
तळेगाव.
धन्यवाद
Deleteखरंच आपल्या या ब्लॉग मुळे राजगडाची सफर घडली. खूप खूप धन्यवाद.🙏
ReplyDeleteधन्यवाद
DeleteBhardast..The pictures and likhan are are one of the best.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसुंदर लेख ओंकारजी जुन्या आठवणी जागृत झाल्या .
ReplyDelete