पाऊस
म्हटंल की धबधब्याच नाव ओघाने येतेच. किंबहुना पाऊस आणि धबधब्याच नातच मुळी
पर्यटनाच्या विश्वात महत्वाच समजल जाते. दोघांचा अविष्कार हा पाहण्याजोगाच असतो.
एकंदरीतच धबधबा जेवढा आकर्षक, सुंदर दिसतो, तसाच तो अनुभवासादेखील वाटत असतो.
पावसाच्या दिवसात तर सह्याद्रीच्या डोंगररांगात तर धबधब्याचा असंख्य माळा साद
घालताना दिसतात. डोंगराच्या कातळ कड्यावरून जीवाच्या आकांताने उड्या मारणाऱ्या या
पाण्याच्या प्रवाहाने जसे भटक्यांना, पर्यटकांना वेड लावले आहे तसेच साहित्यक्षेत्रातील
कवी, लेखकांनाही लावले आहे. नवसाहित्यिकांना तर पाऊस आणि धबधब्याशिवाय दुसरा सुंदर
आधार बहुधा कुठलाही नसेल, इतकी यात शब्दांची सृजनशीलता भरलेली दिसून येते. धबधब्याच
रौद्रसुंदर रूप, शेकडो फुटावरून कोसळणाऱ्या प्रपाताचा धीरगंभीर आवाज, पाण्याच्या
प्रवाहाची होणारी नयनरम्य हालचाल या साऱ्या गोष्टीना नजरेत सामावून घेणे म्हणजे
मोठे अवघड काम. धबधब्याच हे रूप डोळ्यांनी साठवताना दमछाक झाली की मग काही जण कॅमेऱ्याचा
“क्लिक-क्लिकाट” सुरु करतात, तर काही शब्दांचा आधार घेऊन या धबधब्यांवर प्रेम
करताना दिसतात. एकंदरीत सांगायचा मुद्दा हा की पाऊसात फिरायला जायचे म्हटल्यावर
सर्वांच्या नजरेत एखादा धबधबा समोर येतोच.
 |
| हेच त्या कातळधारेचे रौद्र रूप |
.....
पण झालय काय... सर्वांनाच पावसात फिरायचं. भिजायचय. धबधबा पाहायचाय. त्यामुळे
वीकेंड आला की सगळ्यांचीच पावले कोणत्या ना कोणत्या धबधब्याकडे वळतात. येथे
जत्रेसारखी गर्दी करतात. परंतु या सर्व गोंधळात रसिक पर्यटक किती? हा मोठा
संशोधनाचा विषय असतो. यातले बहुतेक तर ‘नवशे’ असतात. अमुक निघाला म्हणून मी चाललो या
गटातले! यांना पावसाच्या अंदाजाचा आणि रसिकतेचा आजीबात गंध नसतो.निसर्गाबाबत
आपुलकी नसते. त्यामुळे केवळ मौजेसाठी ही मंडळी धबधब्याखाली धिंगाणा घालण्यासाठी
जमत असतात. दारू पिली जाते. डोक्यावर बाटली ठेवून वेडेवाकडे अंगविक्षेप केले
जातात. प्लास्टिकचा आणि बाटल्यांचा खच पाडला जातो. भिजण्यासाठी ही मंडळी धोकादायक
ठिकाणी चढतात. कोणी ह्यांना समजावयाला गेले की त्यांच्यावर अर्वाच्य शिवीगाळ केली
जाते. हा सारा धांगडधिंगा धबधब्याखाली सुरु असतो. असे वातावरण जर तिथेअसेल तर
कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांना माना खाली घालण्यासारखा दुसरा पर्याय नसतो . साधारण
थोड्याफार असे चित्र सर्रासपणे आपल्याला पहायला मिळते. त्यामुळे धबधबा नको रे बाबा
असे म्हणण्याची वेळ आपल्यावर येते. तरी देखील धबधब्याची ओढ आपल्याला काय गप बसू
देत नसते. आणि त्यात ट्रेकर्सचा ग्रुप असला की, मग विचायारालाच नको. भटकंतीच्या
प्रेमापोटी गर्दीविरहीत, धांगडधिंगामुक्त धबधबा शोधून काढला जातोच.
 |
गर्द रानातील पायवाट
|
 |
| कातळ धार कडे आपण अक्षरशः निसर्गाच्या कोंदणात असतो |
‘कातळधार’
हा धबधबादेखील असाच आडवाटे वरचा! जणू काही अस्सल रसिकांची वाट पाहत असलेला वाटतो.
याचे ठिकाण विचाराल तर प्रसिद्ध राजमाचीच्या किल्ल्याजवळ आहे. इतर धबधब्यांच्या
तुलनेत कातळधारेच सौंदर्य अजून बऱ्यापैकी तरी शाबूत आहे. याच कारण म्हणजे येथे जाण्यासाठी
मुख्य रस्त्यापासून करावी लागणारी दिड तासाची तंगडतोड! त्यामुळे येथे येणारी पावले
ही भटक्यांचीच असतात. येथे येण्यासाठी लोणावळ्याहून राजमाचीचा रस्ता पकडायचा. या
रस्त्यावरील ‘डेला’ हे ठिकाण सोडून तीन-चार किलोमीटर पुढ आले कि, या रस्त्यालाच
अप्पर डेकचा रस्ता मिळालेला दिसून येतो. येथून थोड पुढे गेलो की, एक मोठ आंब्याचं
झाड दिसते. याच्याच पुढे भलामोठा गोल दगड पडलेला आहे. कातळधारेसाठी हीच महत्त्वाची
खूण लक्षात ठेवायची. येथूनच मुख्य वाटा सोडून डाव्या बाजूला वळायच. खरतर आता आपला
सुरु होतो कातळधारेसाठीचा एक उत्कट प्रवास! डोक्यावर कोसळणारा पाऊस, चिखलाने
मळकटलेली रानवाट, गर्द झाडी, हिरव्या रंगाची धरतीवर पसरलेली चादर, वाटेवर मध्येच
आडवे येणारे छोटे छोटे ओढे... या साऱ्या निसर्गखेळातून आपला एक अवर्णनीय प्रवास
सुरु होतो.
 |
| भटक्यांनी वाट चुकू नये म्हणून अनामिकांनी लावलेल्या काही सांकेतिक खुणा
|
|
इतर ट्रेकर ग्रुप्सने केलेल्या छोट्या खुणावरून आपण भरकटत नाही. खरतर
धबधबा पाहायला मिळणार ही उत्सुकता तरअसतेच; परंतु खरी मजा मात्र या
उद्दिष्टांपर्यंतच्या प्रवासादरम्यान आहे. निसर्गाची ही सारी सर्जनशील रूपे
डोळ्यांत साठवण्याइतका आनंद बहुधा दुसरा कुठला नसावा. वाटेवर निसर्गाने ओतलेले हे
अदभूत क्षण म्हणजे भटकंतीला मिळालेली एक खमंग फोडणीच आहे.
 |
कातळधार कडे जाताना असे अनेक प्रवाह आपल्या सामोरे येत असतात
|
 |
कातळधार धबधब्याकडे जाताना लागणारा छोटासा आणि आकर्षक पाण्याचा प्रवाह
|
असो,
कातळधारची ही वाट आहे दिडतासाची, उताराची आणि मधेच असणाऱ्या सपाट चालीची. ही वाट
चालताना मध्येच रेल्वेचा आवाज गंमत वाढवतो. तर गर्द झुडुपातून समोर दिसणाऱ्या
राजमाचीच्या दोन बालेकिल्ल्यांच्या दर्शनाने अंगावर रोमांच चढवतो. या प्रवासाची
आता कुठे रंगत आलेली असते. पण क्लायमॅक्स मात्र अजून उत्सुकता ताणून धरीत असतो. एक
क्षण असा येतो की, पक्ष्यांचे, पावसाच्या थेंबाचे, पानांच्या सळसळीचे आवाज क्षीण
होत जावून पाण्याच्या प्रपाताचा धीरगंभीर ऐकू येऊ लागतो. कातळधार धबधबा जवळ येवू
लागल्याची ही खून कानानेच ओळखायची. आता मात्र आपल्या पावलांची गती नकळतपणे
वाढल्याचे लक्षात येते. आणि मग आवाजही अधिकाधिक गंभीर आणि मोठा होऊ लागतो. अन
आपणही अधिकच अस्वस्थ होऊन जातो. वाटेवरच्या एका टप्प्यावर आपण वळतो अन काही पावले
टाकतो तर ते अदभूत, अवर्णनीय आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य समोर अवतरते. एका
उंच कातळाच्या माथ्यावरून खाली झेपावणारा पाण्याचा तो प्रचंड लोंढा जणू सौंदर्याची
सारीच परिमाणे नव्याने मांडण्याचा प्रयत्न करतो की काय असे वाटत असते. साधारण दोन
टप्यात आणि शंभर फुटांच्या आसपास उंचीवरून बेभान होणारं हे पाणी जीवाच्या आकांताने
खाली पडत असतं. पाण्याच्या या खेळात किती उत्कटता आणि विविधता सामावलेली आहे त्याचं
कौतुक वाटतं. या पाण्याला कुठलही बंधन नाही की, कुठलेही भय नाही. केवळ झेपावण एवढंच
या पाण्याला माहित आहे. कातळधारेच्या सौंदर्याच हेच वैशिष्ट्य आपल्याला अक्षरशः
खिळवून ठेवत. या पाण्याच्या प्रपाताला कितीही वेळ पाहिलं तरीही मन भरत नाही आणि
येथे मिळणारी मनसोक्त शांतता पायांना निघू देत नाही.
 | याच दृश्यासाठी केला होता हट्टहास
|
|
निसर्गाचा
हा सौंदर्याविष्कार पाहण्यासाठी मात्र थोडी काळजी आणि सावधानता बाळगण हे गरजेचे आहे.
येथे येण्यासाठी स्थानिक वाटाड्या घेतला तर चुकण्याची शक्यता नाही. या धबधब्याजवळच
एक नैसर्गिक कपार तयार झाली आहे, तेथे सुरक्षितपणे थांबून हे दृश्य अनुभवता येवू
शकते. ‘गडबड’, धांगडधिंगा, गर्दीचा कोलाहल यापासून दूर असलेला हा कातळधारेचा
अविष्कार आपला दिवस सत्कारणी लावतो एवढ मात्र नक्की....
 |
| भटकंतीला मित्र आणि बाईक तर हवीच ना |
जाण्याचा मार्ग
लोणावळा-खंडाळा यामधून राजमाची किल्ल्याकडे जाणारा रस्ता--Della Adventurer मार्गे- अप्पर डेक हॉटेल फाटा -- कातळधार धबधबा .
(अप्पर डेक फाट्यापासून काहीच अंतरावर कातळधार धबधबा कडे जाणारी पायवाट आहे.वाट दुर्गम आहे.स्थानिकांना विचारून किंवा व्यवस्थित माहितीच्या आधारे येथे येण्याचे नियोजन करावे.)
Wow 🤩
ReplyDeleteAmazing.....
ReplyDeleteAmazing.....
ReplyDeleteखूपच छान व सविस्तर माहिती दिली ओंकार जी....👍👌
ReplyDelete