"वाघेश्वर" मावळ तालुक्याच्या पश्चिमेला असणारं छोटंसं गाव! तसं पाहिलं तर जिल्ह्याच्याच नव्हे तर तालुक्याच्याही नकाशात हे गाव शोधताना दमछाक होईल. इतकं याचं अस्तित्व लहान आहे.इथला सारा भाग पवनमावळ म्हणून ओळखला जातो.पवना नदीच्या काठचा हा परिसर.मोहक..आणि तितकाच निसर्गरम्य! साधारण पन्नास वर्षांपूर्वी याच गावासारखीच आजूबाजूची काही गावे पवना धरणाखाली गेली आणि आजूबाजूला विस्थापित झाली. या गावच्या जमिनीबरोबरच येथली देवळे, वाडे, घरे आदींना जलसमाधी मिळाली.ह्या साऱ्या वास्तू शिवकाळातील होत्या तर मंदिरे मात्र अगदी हेमाडपंथी धाटणीचीच होती. परंतु हे सारं काही पाण्याखाली गेलं आणि आपण सर्वजण या अनमोल अशा वैभवशाली ठेव्याला मुकलो.तसं पाहिलं तर पवनमावळचा हा सारा परिसरच तुंग-त्रिकोणा-लोहगड-विसापूर अशा ऐतिहासिक किल्ल्यांच्या कोंदणात स्थित आहे. त्यामुळे या अशा किल्ल्यांच्यापायथ्याशी असणारी ही गावेसुद्धा इतिहासातून तावून-सुलाखून निघालेली होती यात शंकाच नाही.
मावळातील या किल्ल्यांवर जशी उत्कृष्ट बांधकामे, स्थापत्याची शैली आकाराला आली. तशीच कला या गावांतील इमारतींना, देवळांनादेखील प्राप्त झाली.वाघेश्वरमधील एक शिवमंदिरदेखील याच पंक्तीतलं होतं. असं शिवमंदिर की बघताक्षणीच डोळ्याचं पारणं फिटावं. हे ऐतिहासिक देखणं शिवमंदिर या गावात अगदी 1970 च्या पूर्वी मोठ्या दिमाखात उभं होतं. पण सत्तरच्या दशकात पवना धरण पूर्ण झालं अन हे सारं वैभव पाण्याखाली गेलं.जेव्हा कुठलंही धरण बांधलं जातं, तेव्हा आसपासच्या आणि बाधित गावांना याची मोठी किंमत मोजावी लागते. स्वत:चे अस्तित्व गमावूनच हे धरण पाहायची वेळ अशा गावांवर येते.अश्या गावांच्या त्यागावरच तर अशी विकासकामे आकाराला येत असतात. वाघेश्वर गावानंही ही किंमत मोजली. हे दगडी स्थापत्यातलं शिवमंदिरही याला अपवाद नव्हते. मंदिर पवना धरणाच्या पाण्याखाली गेलं. वाघेश्वर गावाचा हा परिसर पावन धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येतो पण खूपच मागे.त्यामुळे दरवर्षी साधारण मार्च-एप्रिलच्या सुमारास धरणाचे पाणी कमी झालं की हे मंदिर पुन्हा हळूहळू उघडं पडतं आणि आपल्या कशा तरी टिकून राहिलेल्या अवशेषातून सुखद दर्शन देऊन जातं.
 |
| वाघेश्वराचे धरण पात्रातल अप्रतिम मंदिर |
यंदाही हे मंदिर असंच उघडं पडलंय... मावळच्या गतवैभवाची साक्ष देणार्या या वाघेश्वर मंदिराकडे जायचे झाल्यास
पवनानगर येथून तिकोणा पेठ-जवण-आजिवली- असा प्रवासकरून वाघेश्वर या गावात यायचं. किंवा
लोणावळेवरून-भुशी डॅम-घुसळखांब फाटा- शिळींब -वाघेश्वर असेही जाता येते. गावातून अगदी दहाच मिनिटांत आपण या देखण्या मंदिरासमोर येतो. अस्ताव्यस्त पडलेले मंदिराचे दगड, शिल्पे यातूनच वाट काढत मंदिराच्या मुख्य पण मोडकळीस आलेल्या वास्तूसमोर येतो. भग्न व झीज झालेला नंदी आजही शिवपिंडीसमोर उभा असलेला दिसतो. या नंदीची सुबक मूर्ती पाहूनखरोखर मंदिराचे लावण्य कसं असेल याची पुसटशी कल्पना येते. प्रत्येक शिवमंदिराची जशी रचना असते तशी याचीही रचन असण्याची शक्यता आहे. नंदीमंडप, सभामंडप आणि गाभारा आणि या सर्वांना असलेली सुरेख तटबंदी! नंदीसमोरून आपण सुरेख अशा प्रवेशद्वारातूनसभामंडपात प्रवेश करतो.
 |
| सभामंडपाचे दगडी खांब |
 |
| कलाकुसर असलेले दगड |
या मंडपात आल्यावर आजही सुस्थितीत उभे असलेले हे खांब पाहून खरोखरीच आश्चर्य वाटते.एवढ्या वर्षापासून पाण्याचा तडाखा सोसत सभामंडप अजूनही तग धरून उभा आहे; यातच काय ते समाधान! सभामंडप पाहूनझालं की आपण येतो ते गाभार्यातच. येथे एक सुंदर शिवपिंडी आहे. या पिंडीसमोर आजही आपण गेलो तर आपल्या चेहर्यावर समाधानाचा आणि भक्तीचा भाव आपोआपच उमटेल.मंदिराच्या बाहेर अस्ताव्यस्त पडलेले दगडसुद्धा काहीतरी कलाकृती, नक्षी, कलाकुसर अंगावर घेऊन आपल्याला सांगताना दिसतात. या सर्व भग्न अवशेषांना मनोमन बांधूनच आणि रचूनच यामंदिराच्या प्रतिकृतीचा अंदाज बांधायचा.एवढंच आपल्या हातात आहे. हे सारे अवशेष पाहिले की सदर मंदिर हे अगदी शिवकाळाच्या आधीच म्हणजे शेकडोवर्षांपूर्वी बांधले गेले असण्याची दाट शक्यता आहे.
 |
| सध्या दगडी खांबाना अश्या धातूच्या पट्टीचा आधार दिला आहे. |
 |
| गाभाऱ्याबाहेर असलेली सुबक गणेश मूर्ती |
 |
| दगडात कोरलेला नंदी |
या मंदिरासंबंधी आख्यायिका व दंतकथा आजही येथील ज्येष्ठ मंडळी सांगत असतात.येथल्या गावकर्यांचंही कौतुक करू तितकं थोडं आहे.कारण पवना धरणामुळे विस्थापित झाल्याचं सारं दु:ख बाजूला सारून ऐतिहासिक ठेवण्याचं पावित्र्य जपण्यासाठी हे सारे एकत्र येत असतात.वर्षातील आठ महिने पाण्यात राहिलेले. हेमंदिर बाहेर आलं की हे सारे गावकरी या मंदिरात येतात. मंदिरातलं शेवाळ, घाण दूरकरून रोज विधीवत पूजादेखील करतात.अन् या आपल्या कृतीतून मंदिराप्रती प्रेम व्यक्त करतात. हे प्रेम आणि भक्ती अगदीधरणाचं पाणी या मंदिराला शिवेपर्यंत कायम असते. एकदा का पाणी आत आलं की थेट पुढच्या वर्षीचीच प्रतीक्षा!
असो मावळचा हा अनोखा वास्तु ठेवा आपल्या डोळ्यांत भरण्यासाठीएकदा तरी येथली वाट धरायला हवी आणि या मंदिराचं दर्शन घ्यायला हवं, कारण दरवर्षी हे मंदिर पुन्हा नेहमीप्रमाणे जुलैनंतर पाण्याखाली जाते... ते थेट पुढच्या वर्षीपर्यंत! तोपर्यंत काय सांगावे... की हे अद्वितीय लावण्य पुन्हा सुस्थितीत दिसेल... न दिसेल...!!!
सोप्या शब्दांमध्ये सुरेख माहिती
ReplyDeleteतुम्ही मावळ चा इतिहास आणि निसर्ग याची उत्तम सांगड घालत आहात
धन्यवाद
DeleteReally awesome man you have a different personality from other the people like you are very rare in the society I am proud of you man👍👍🙏🙏
ReplyDeleteधन्यवाद
DeleteHidden Maval Treasure..opened because of you Dear Onkar..Great
ReplyDeleteधन्यवाद मित्रा
DeleteBeautiful and awesome ...
ReplyDelete