"स्वर्गिय" नाणेघाट
आपल्या महाराष्ट्रात पर्यटनासाठी अनेक उत्तम वास्तू, किल्ले आहेत.गडकिल्ल्यांच्या शिवाय महाराष्ट्रातली भटकंती पूर्णच होऊ शकत नाही.भटक्यांच्या जीवाला वेड लावणा-या या किल्ल्यांवरचं वातावरण काही वेगळंच असतं.केवळ किल्लेच नाही तर सह्याद्रीच्या पोटातले घाटरस्ते हाही असाच अनेकांचा आवडीचा विषय आहे.सह्याद्रीच्या पोटातल्या या प्राचीन सा-या वाटा पालथ्या घातल्या तरीही आपले मन काही भरत नाही.याच यादीतला आणि अग्रणी असलेला असाच एक लहान थोरांचा आवडता स्पॉट म्हणजे नाणेघाट. हा प्राचीन भारताच्या महाराष्ट्रातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. पूर्वीच्या काळात व्यापार करणं सोपं जावं म्हणून हा घाट आणि यासारख्या असंख्य घाट वाटा सह्याद्रीच्या पोटात खोदण्यात आल्या . असाच वैभवशाली इतिहास असलेला आणि समुद्र सपाटीपासून २७२४ फूट उंच असलेल्या नाणेघाटाची सैर एकदा तरी केलीच पाहिजे.
भारतीय प्राचीन संस्कृतीच्या खाणाखुणा आपल्या अवतीभवती नांदत असतात. अशा संस्कृतीची ओळख व त्यांचं अस्तित्वही अशाच खाणाखुणांतून आपल्याला ‘शोधावं’ लागतं. शोधावं लागतं असं म्हणायचं कारण की अशी ठिकाणं आपण दुर्लक्षित आणि कोणत्याही संरक्षणाशिवाय सोडली आहेत. अशा ठिकाणांचं संवर्धन ही तर दूरचीच गोष्ट! तरीही ही ठिकाणं कशीबशी तग धरून आहेत, यातच काय ते समाधान. अशा समाधानातच आनंद शोधण्याचा आपला छंद असल्यामुळे साहजिकच नाणेघाटासारखी प्राचीन ठिकाणं हा हट्ट निश्चितच पुरा करतात.
| रस्ता वळणावळणाचा ...आणि नेत्र सुख देणारा |
| पावसाळ्यात येथे अक्षरशः स्वर्गच अवतरतो....आणि यावेळी धुक्याने लगडलेला नाणेघाट आणखीनच मनमोहक दिसू लागतो. |
पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्याच्या पश्चिमेला आणि ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याला लागून गेलेली सहयाद्रीची रांग जेवढी अजस्त्र भासते तितकीच ती गुढमयदेखील वाटते. कारण याच रांगेच्या अंगाखांद्यावरून आपल्या गतकाळातील ‘पाउलखुणा’ बाळगुन असलेला प्राचीन नाणेघाट म्हणजे पर्यटन आणि अभ्यासकांच्या दृष्टीने उत्तम ठिकाणच आहे. त्यामुळेच नाणेघाटाचा विषय आला की आपोआपच आपलं मन हजारो वर्षे मागे जातं..
प्राचीन काळात व्यापारासाठी आणि व्यवहारासाठी देशाला आणि कोकणाला जोडण्यासाठी काही घाटवाटांची निर्मिती सातवाहन राजवटीत करण्यात आली. प्रतिष्ठान (पैठण) ही सातवाहनांची राजधानी होती. पैठण ते कल्याण या राजमार्गावर जुन्नरजवळ डोंगर फोडून या घाटाची बांधणी झाली. अतिशय सुबकतेने साकार झालेला हा नाणेघाट म्हणजे अगदी गतकाळातील संस्कृतीचा ठेवा स्वत:पाशी जपत आपल्याला त्याच्या वाटेवर बोलावताना दिसतो. अन् एवढं एक निमित्त आपल्याला पुरेसं ठरतं याच्या भेटीसाठी!
या घाटाच्या शेजारीच भटक्यांमध्ये प्रसिद्ध असलेला नानाचा अंगठासुद्धा या दरम्यान पाहू शकतो. किंबहुना नानाच्या अंगठयाच्या पोटात दडलेला हा घाट म्हणजे सर्व वयोगटातील पर्यटकांसाठी एक उत्तम ठिकाण होऊ शकेल. या घाटाकडे मुंबईहून येताना माळशेजचा रस्ता पकडायचा. या रस्त्यावरच वैशाखरे गावाच्या थोडं पुढेच नाणेघाटाचा स्थळनिर्देश दर्शविणारा फलक आपल्याला घाटाकडेच नेतात. या घाट पायथ्याशी उभं असताना समोर वर जाणारी वळणदार वाट आणि आपल्या डोक्यावर नानाच्या अंगठयाची आकृती डोळयाचे पारणे फेडतात.
| नाणेघाट कडे जातानाचा निसर्गरम्य रस्ता |
नाणेघाटाला येण्यासाठी पुण्यावरूनसुद्धा एक वाट आहे. बहुतेक भटके ही वाट निवडतात. कारण पुणे जिल्ह्यातील जुन्नरहून शिवनेरी किल्ल्याच्या शेजारून गेलेली ही वाट भटक्यांसाठी रंग उधळत जाते. शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन अशी दुर्गचौकडी आणि घाटघर धरणाचा जलाशय हे पाहतच आपण नानाच्या अंगठयासमोर येतो. येथूनच अंगठयाच्या आकाराचा डोंगर जमिनीपासून काही अंशावर वर निमुळता होत गेलेला दिसतो. त्यामुळे हा अंगठयाचा आकार दुरूनच फार उत्सुकता ताणून धरतो. आपण जसजसं जवळ जातो, तसतसं या अंगठयाशेजारील दोन छोटया टेकडयांमध्ये खोदलेली वाटसुद्धा आकार घेऊ लागते.
| नानाच्या अंगठ्याचे दर्शन |
आपण जेव्हा या घाटाच्या मुखाशी येतो तेव्हा मात्र डोळे विस्फारून पाहण्याशिवाय काहीच करू शकत नाही. अगदी तासून बनविलेला एखादया कलाकुसरीसारखा हा घाट त्याच्या काळ्याभिन्न दगडी पाय-यांनी आपल्यासमोर पायघडया टाकून स्वागतास बोलावताना दिसतो.
| नाणेघाटाचे अंतरंग...तासून काढलेला घाट-रस्ता |
| नाणेघाटातील लेण्यांमधील ब्राम्हीलीपितील शिलालेख |
| नानाच्या अंगठ्यावरून दिसणारे विहंगम दृश्य ...याच्याच डाव्या बाजूला जीवधन आणि वानरलिंगी सुळका |
आपल्यासारखे भटके घाटाच्या पोटातलं हे सौंदर्यसार डोळ्यांत साठवण्यासाठी येतात..तर काही जण या भिंतीना कान लावून यांचा कानोसा घेतात.. तर काही जण या पुरातन काळातल्या शिल्पांना सलाम करताना दिसतात. नाणेघाटाच्या माथ्यावर उभे राहील्यावर पश्चिमेला दिसणारा कोकणप्रदेश, शेजारीच घाटाच्या संरक्षणासाठी अहोरात्र सज्ज असलेला जीवधन किल्ला, घाटाच्या डोक्यावर नानाच्या अंगठयाचा मोहक मुकुट आणि स्वत:च्याच पोटात गुढ प्राचीन अर्थ सामावलेला हा नाणेघाट म्हणजे सहयाद्रीचं खरखुरं प्राचीन आभुषणच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. घाटातल्या पाय-यांवरून चालताना प्रत्येक पावलागणिक गतकाळात हरवत चालल्याचा भास आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही.....
आजूबाजूला पाहण्याची ठिकाणे:-
जीवधन किल्ला,चावंड किल्ला,तुळजा लेणी, पूर येथील कुकडेश्वर मंदिर .
येण्यासाठी कालावधी:-
वर्षभर कधीही
| मित्रा-परीवारांसोबत |
जीवधन किल्ला,चावंड किल्ला,तुळजा लेणी, पूर येथील कुकडेश्वर मंदिर .
येण्यासाठी कालावधी:-
वर्षभर कधीही
Too good, beautiful and informative !
ReplyDeleteKeep on writing and exploring such a wonderful places to all of us...
Very nice sir
ReplyDelete