पारनेरचा तालुक्याचा "वैभवशाली" वारसा !!
पारनेरचा वैभवशाली वारसा
पारनेर हा अहमदनगर मधील तालुका पुणे जिल्ह्याला अगदीच खेटून आहे.या पारनेरचं
ऐतिहासिक आणि प्राचीन महत्वही मोठे आहे. असं म्हणतात कि पराशर ऋषींच्या नावावरून या
गावाला पारनेर हे नाव पडलं.पराशर ऋषी म्हणजे महाभारतकार व्यासमुनी यांचे पुत्र. यावरून या गावाचे पौराणिक
महत्त्वही लक्षात येईल. याच पारनेर तालुक्यात बरीच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.जामगाव
येथील महादजी शिंदे यांचा वाडा,टाकळी-ढोकेश्वराची अप्रतिम लेणी आवर्जून
पाहण्यासारखी आहेत.पण यात सर्वात देखणी
वास्तू आहे ती सिद्धेश्वर
मंदिराची. अशाच पारनेरच्या परिसरातील हि भटकंती आपल्या डोळ्यांना
सुखावल्याशिवाय राहत नाही.
निसर्गरम्य
सिद्धेश्वर
देखणं मंदिर,निसर्गरम्य भवताल
आणि हवी-हवीशी शांतता अश्या त्रिवेणी संगमात हे मंदिर सजलंय. त्यामुळेच सहकुटुंब
सहलीसाठी हे ठिकाण "मस्ट वॉच" या श्रेणीतच मोडतं. पारनेर या
तालुक्याच्या गावावरून सिद्धेशवर वाडीकडे एक डांबरी रस्ता जातो.याच वाडीत आपण
पोहोचायचे.हि वाडी आहे पारनेरपासून तीन किमी अंतरावर.याच ठिकाणी एका खोल दरीत हे
सिद्धेश्वर मंदिर उभारलं आहे.खूपच भन्नाट जागा आहे हि.वाडीत आपण पोहोचलो कि,ओढा आपला रस्ता अडवीत पुढे येतो.यात
पावसाळ्याचे काही दिवस सोडले तर हा ओढा अगदी कोरडा ठणठणीत असतो.याच ओढ्याच्या
अलीकडे आपल्या गाड्या लावायच्या आणि समोर छोट्या डोंगराच्या घालीत लपलेल्या
नितांतसुंदर मंदिराकडे चालत निघायचे.उजव्या बाजूस काही प्राचीन इमारतींचे अवशेष
दिसतात.हे दुरूनच पाहत काही पायऱ्यांनी खाली बेचक्यात उतरत जायचे. अन या मंदिराच्या
आवारात पाऊल ठेवायचे. नंदीमंडप ,घंटामंडप,सभामंडप,अंतराळ व गाभारा अशी मंदिराची ढोबळ रचना आहे.यातले सभामंडप-गाभारा-अंतराळ हे
सलग पद्धतीने एकमेकांना जोडले आहे. आपण थेट येतो ते घंटामंडपाच्या समोरच.
घंटामंडप हा प्रकार तसा मंदिराच्या स्थापत्यात अभावानेच आढळतो.चार दगडी
खांबांनी जोडलेल्या या मंडपात भली मोठी घंटा टांगलेली आढळते.या घंटेवरचं चिन्ह
पाहता हि घंटा वसईच्या किल्ल्यावरून पेशवाईच्या
काळात इथे आणली असावी.वसई येथे
पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीची सांगता झाल्यानंतर येथील बऱ्याच घंटा
महाराष्ट्रातील अनेक मंदिरांमध्ये अर्पण करण्यात आल्या तशीच हि घंटा असावी. या घंटेची उंची
१००सेमी,तोंडापाशी व्यास ८०सेमी,काड्यांची उंची १४ सेमी,आणि कड्यांची संख्या तीन आहे.हा वैशिष्ट्यपूर्ण घंटामंडप पाहून झाला कि आपण
शिव मंदिरात प्रवेश करायचा.हे मंदिर पश्चिमाभिमुख असून सुरुवातीला नंदीमंडप
लागतो.नंदीमंडपानंतर मंदिरात शिरताना जाणवतो तो या मंदिराचा भव्यपणा.मोठमोठ्या
घडीव दगडापासून हे सुरेख चिरेबंदी मंदिर घडवलंय . याचे आपल्याला पदोपदी
आश्चर्य वाटत राहते.हा भव्यपणा डोळ्यात
साठवतच सभामंडपात प्रवेश करायचा.हा
सभामंडप बराच मोठा असून यामध्ये मधोमध कुठलाही खांब नाही हे विशेष.संपूर्ण
छताचा भाग हा केवळ दगडी भिंतींनीच तोलून
धरला आहे. यामुळे या वास्तुस्थापत्याचं नवल वाटते.या मंडपाला उत्तर-पश्चिम-दक्षिण
असे तीन दिशांना दरवाजे आहेत.सभामंडपानंतर आपण अंतराळकक्षात प्रवेश करतो.याच
कक्षातून गाभाऱ्यात जाण्यासाठी प्रवेशद्वार लागते. पायऱ्या उतरून आत गेलो कि
सुरेख शिवपिंडीच दर्शन होतं.या गाभाऱ्यात आणखी एका वैशिष्ट्य म्हणजे पूर्वेच्या
बाजूला असणाऱ्या भिंतीवर एका विशिष्ट आकाराची छोटी खिडकीवजा छिद्र निर्माण केले
आहे.याच छिद्रातून सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट शिवपिंडीवर पडण्याची
रचना केलेली दिसते.अशी रचना असणारे गाभारे मुळातच दुर्मिळ.पण सिद्धेश्वर मंदिरात
हि रचना दिसते. मंदिराचे अंतरंग पाहून झाले कि मग प्रदक्षिणेसाठी बाहेर
यायचे.
मंदिरापासून काही फुटांवर शिवलिंगाची आराधना करताना बळीराजाची संगमरवरी मूर्ती
असलेले तळघरातील कोरलेले मंदिर पाहण्यासारखे आहे.हे अलीकडच्या काळातील
आहे.बळीराजाला वामन अवतारातील भगवान विष्णूने पाताळात घातले या संकल्पनेवरून या
मंदिराची निर्मिती केलेली दिसते. असं हे सिद्धेश्वराचं मंदिर पाहण्यासाठी पावसाळा आणि हिवाळा
हा सर्वोत्तम ऋतू. हे निसर्गरम्य मंदिर पाहून आपल्याला वेगळाच आनंद मिळून जातो.
महादजी शिंदेंचा
जामगावातील भव्य वाडा
महाराष्ट्राच्या मातीत अनेक पराक्रमी आणि शूर रत्ने जन्माला आली. या अशा
नर-रत्नांनी मराठेशाहीची ताकद उभ्या हिंदुस्थानाला दाखवून दिली होती.या अश्या
योध्यांमध्ये पराक्रमी रत्न म्हणजे
महादजी शिंदे.थोरले बाजीराव पेशवे यांचे विश्वासू साथीदार राणोजी शिंदे यांचे
पुत्र म्हणजे महादजी शिंदे.मराठ्यांची पताका दिल्ली आणि उत्तर भारतात डौलाने
फडकावत ठेवणारे महादजी शिंदे म्हणजे
मराठेशाहीतील एका सोनेरी पानच.अशा महादजी शिंदे यांनी बांधलेला एका वाडा
पारनेरजवळच्या जामगावात मोठ्या दिमाखात उभा आहे.इतिहासप्रेमी आणि पर्यटकांनी
आवर्जून पाहावा असं वाड्याचं वास्तुस्थापत्य आहे. पारनेर तालुक्यापासून अवघ्या
१२किमि अंतरावर हा महाकाय वाडा म्हणजे जणू काही भुईकोटचं वाटावा किंवा एखादी गढीच
वाटावी इतक्या मोठ्या प्रमाणात तो पसरला आहे.जवळपास ८६ एकर जागेवर हा पसरला गेला
आहे.या वाड्याला चहूबाजूंनी तटबंदी देखील बांधलेली होती .या तटबंदीतून आत जनतेसाठी
पूर्व-दक्षिण-उत्तर अशा तीन दिशांना तीन प्रवेशदार होती.ती आजही दिसतात.पण तटबंदी
मात्र बऱ्याच ठिकाणी ढासळली दिसते.आपण मात्र पूर्व दिशेच्या भल्या मोठ्या
दरवाजातून आत येतो.किल्ल्याच्या तोडीसतोड असलेला आणि दोन भल्या मोठ्या बुरुजांमध्ये असलेला हा महाकाय दरवाजा पाहून छातीच दडपून जाते. याला लागूनच पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत.हा दरवाजा
पार करून आत आलो कि आपल्याला मुख्य वाड्याचे दर्शन होते.या वाड्याला पुन्हा दुहेरी
तटबंदी दिसते.जमिनीलगत असे वडे उभारल्यामुळे आणि शत्रूच्या हल्ल्यास सहज बाली पडू
नये म्हणून अशी दुहेरी तटबंदी उभारत असे.या मुख्य वाड्याला सुद्धा खणखणीत
प्रवेशद्वारे आहेत.या दरवाजांच्या मध्यभागी शिंदे सरकारचं राजचिन्ह कोरलेले
दिसते.या वाड्याला एकूण सहा बुरुज आहेत आणि ते व्यवस्थित पाहता देखील
येतात.वाड्यात आलो कि आपल्या समोर तीन मजली
इमारत येते.आणि क्षणभर आपण अचंबित होऊन जातो.आता हळूहळू या वाड्याचे अंतरंग
उलगडायला लागते.यामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल तो दगडी बांधकामात सजलेल्या
विहिरीचा.एव्हढ्या मोठ्या वाड्याची तहान भागवायची म्हटली तर विहीरही तेव्हढीच
हवी.वाड्याचा आकार पहिला कि या विहिरीची उपयुक्तता ध्यानात येते. पाणी उपसण्यासाठी
मोटेचीही सोय केलेली दिसते.यानंतर वाड्यामधील राजदरबाराची जागा,महादेवाचे मंदिर,रंगमहाल,मुदपाकखाना,आंबेमहाल,ह्या जागा आवर्जून पाहण्यासारख्या .वाड्यामधील
लाकडी खाम्ब व त्यावरील नक्षीकाम आजही
सौंदर्यात भर घालते.तळमजल्यावरून सूर्य व तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी जिनेही
दिसतात.वाड्याचा तिसरा मजला मात्र मरणासन्न अवस्थेत आहे. पण या मजल्यावरून
वाड्याचे अंतरंग विशेषतः चौक फारच छान दिसतो.
वाडा पाहताना दोन-तीन तास कसे जातात हेच कळत नाही.महादजी शिंदे यांचे वंशज
जिवाजीराव शिंदे यांनी हा वाडा रयत शिक्षण संस्थेला १९५५ साली बक्षीस पत्र करून दिला.त्यामुळे वाड्याची
मालकी सध्या याच संस्थेकडे असून सध्या या वाड्यात अध्यापक महाविद्यालयाचे वर्ग
भरतात.त्यामुळे येथे थोडीफार वर्दळ असते.त्यामुळे काही प्रमाणात स्वच्छताही राखली
जाते.रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी आलात तर हे वैभव निवांतपणे पाहता येऊ शकते
....
टाकळी ढोकेश्वर
लेणी
पारनेर पासून
२०किमि अंतरावर असलेल्या टाकळी ढोकेश्वर या गावातील लेण्या या राष्ट्रकूट कालीन
आहे .त्यांची निर्मिती हि साधारण ६व्या व ७ व्या शतकात झाल्याचे अभ्यासकांचे मत
आहे.पायथ्यापासून लेणीपर्यंत पायऱ्या आहेत.दहा मिनिटातच आपण या लेण्यांच्या समोर
येतो.एका प्रशस्त मोठं लेणं,त्याच्या बाजूलाच
जराशा उंचीवर खोदलेले पण अर्धवट अवस्थेत असलेलं लेणं,आणि पाण्याचं टाकं अशी याची सर्वसाधारण रचना आहे.लेण्यांचा
समोर दीपमाळही दिसते.लेणीच दालन प्रशस्त असून यामध्ये दोन भव्य पूर्णाकृती आणि दोन अर्धाकृती स्तंभ आपल्याला दिसतात.मुख्य
लेण्याच्या बाहेर डाव्या हाताला कासवावर उभी राहिलेली यमुनेची मूर्ती आहे.या
मूर्तीच्या डाव्या हातात कमळाचा गुच्छ असून उजवा हात हा जमिनीच्या दिशेने खाली
सोडलेला दिसतो.या मूर्तीसारखीच दुसरी मूर्ती हि मुख्य लेण्यांच्या बाजूला उभी असलेली दिसते. हि मूर्ती गंगेची असून ती
मकरावर उभी आहे.या दोन्हीही मुर्त्या आकर्षक असून त्या नद्यांचं प्रतिनिधित्व
करतात.या दालनानंतर आपल्याला ढोकेश्वराचं
गुहा मंदिर दिसते.या समोर दोन नंदीही दिसतात.या गुहा मंदिरात जाणेसाठी पूर्वेकडे
आणि उत्तरेकडे असे दोन दरवाजे आहेत.गाभार्याच्या बाहेर असलेलं गजलक्ष्मीचं शिल्पही
सुंदर आहे.तसेच गाभार्याच्या बाह्यभिंतीवरील व प्रवेशदाराच्या दोन्हीही बाजूस
असणाऱ्या द्वारपालांची उभी शिल्पे आपले लक्ष वेधून घेतात.गाभाऱ्याच्या डाव्या
बाजूस अनेक शिल्पे ठेवलेली दिसतात.तसेच
उजव्या बाजूस दोन खांब व त्यामध्ये तांडव करणारी शिवमूर्तीही खासच.दर्शन घेऊन
बाहेर आलोकी लेण्यांच्या दक्षिण बाजूस असणाऱ्या भिंतीवरील सप्तमातृकांचे शिल्प
मात्र आपल्याला थांबवते.खूप कमि ठिकाणी आढळणारे हे शिल्प येथे चांगल्या अवस्थेत
टिकून आहे.या सप्तमातृका ब्रह्म,विष्णू,शिव,स्कंद,यम ,वराह,इंद्र,व रुद्र यांच्या क्रियाशक्ती मानल्या जातात.
अशी हि टाकळी
ढोकेश्वर ची लेणी पुरातत्व खात्याने संरक्षित केलेली दिसते.या ठिकाणी स्वच्छताही
आढळते.ऐक आडवाटेवरची लेणी पाहिल्याचे समाधान तुम्हाला निश्चितच मिळते....
पूर्व-प्रकाशित साप्ताहिक लोकप्रभा:-
Comments
Post a Comment