मानमोडी डोंगरातली "अंबा-अंबिका लेणी"


 

पुणे जिल्हयातील जुन्नर तालुका म्हणजे लेण्यांचे आगारच . कारण याच तालुक्यात   जवळपास दीडशे पेक्षा अधिक  लेण्या पाहायला मिळतात. या साऱ्या लेण्या आजूबाजूंच्या डोंगराच्या पोटात खोदलेल्या दिसतात.  यातल्या बहुतांश लेण्या या हिनयान या बौद्ध पंथाच्या असून त्या तिस-या शतकातील असल्याचं इतिकारांचं मत आहे. असाच एक लेणीसमूह मानमोडी डोंगराच्या पोटात खोदलेला आहे.तसं पाहिलं तर या मानमोडी डोंगरात तीन लेणी समूह आहेत.तीनही लेणी समूह अतिशय देखणे आहेत. अंबा-अंबिका , भूतलेणी आणि भीमाशंकर लेणी अश्या नावाची हि खोदकाम म्हणजे मानवी कलाकृतीचा सर्वोत्कृष्ट आविष्कारच ! या तीनही लेण्या एकाच वेळी पाहून होतात. याच मानमोडी डोंगरातील लेण्यांची सफर आपण करणार आहोत.

   पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराच्या जवळच साधारण 1.5 कि.मी अंतरावर घोडेगाव रस्त्यावर  असलेल्या डोंगराला मनमोडीचा डोंगर असे म्हटले जाते. अगदी रस्त्यावरून सुद्धा या लेण्या डोळ्यांना सहजपणे दिसून येतात.  या डोंगरावर जाण्याचा मार्ग खोरे वस्ती मधुन  जातो किंवा या डोंगराच्या पायथ्याशी काही पोल्टर फार्म आपल्याला दिसतात.यांच्या शेजारूनच आपल्याला लेण्यांकडे जाण्याचा मार्ग आहे.वनविभागाने या साऱ्या डोंगरावर मोठी वृक्ष लागवड केली आहे. या गर्द वृक्षराईतूनच  लेण्यांकडे वर जाण्यासाठी पायवाट आहे.हा मानमोडी डोंगर पूर्व-पश्चिम तीन किलोमीटर लांबीचा पसरलेला आहे.याच डोंगराच्या पूर्वेकडून आपल्याला अनुक्रमे भीमाशंकर, अंबा-अंबिका आणि अगदी शेवटी पश्चिमेला भूतलेणी हे तीन लेणी समूह दिसतात. यातले मधली लेणी हि अंबा अंबिका . या मानमोडी डोंगराला मानमोडी असे नाव  का पडले याचीही कथा आपल्याला स्थानिकांकडून ऐकायला मिळते. डोंगरावरील उंच जागी असलेली ती लेणी पाहताना मान मोडून जाते म्हणून हा मानमोडी डोंगर. या डोंगरात या तीनही लेण्या एकाच उंचीवर खोदलेल्या आढळतात.तसेच एकदा का या  उंचीवर आलो कि या तीनही लेण्यांना जोडणारी पायवाट हि आपल्याला दिसते. शक्यतो अंबा -अंबिका या लेण्यांमपाशी येऊनच तीनही लेण्या पहिल्या जातात. म्हणजे पायपीट कमी होते.








अर्धवट अवस्थेतला स्तूप


 असो.पोल्ट्री पासून साधारण अर्ध्या तासात आपण चढाईने अंबा-अंबिका लेण्यांसमोर हजर होतो. या लेण्यांकडे जातानाची वाटाही सोपी आहे तसेच काही पायऱ्याही बांधलेल्या दिसतात.इतर दोन लेण्यांच्या मानाने हि लेणी बऱ्यापैकी मोठी आणि ऐसपैस आहे.लेण्यांच्या समोर एक भले मोठे पटांगण आणि त्यामागे काताळातल्या भितीवरचा तो शिल्पखजिना आपल्याला अक्षरशः स्तंभितच करतो. या लेण्यांमध्ये आपल्याला सर्वप्रथम आढळते ती स्वच्छता आणि शांतता. मानमोडी डोंगराकडे फारच थोडे पर्यटक फिरकतात. मोजके अभ्यासक आणि लेणी प्रेमी सोडले तर या लेणीत सामसूम असते. या लेणीसमूहात  विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे अशी ही एकूण  ३३ लेणी खोदलेली आहेत.या लेण्यांना पुरातत्व विभागाने नंबरही दिलेलं आहेत. लेणी  क्र १८ ते ३४ असे क्रमांक दिलेले आढळतात.( भीमाशंकरगटाच्या सतरा लेण्यांनंतर पुढचे नंबर अंबा -अंबिका गटाला दिलेले आहेत).  हि लेणी हि बहुमजली आहेत.या साऱ्या लेण्या या उत्तरेकडे तोंड करून खोदलेल्या आहेत. बरीचशी लेणींची खोदकाम  जमिनीलगत  तर काही कातळावरच्या भागात.लेणींकडे तोंड केले कि आपल्या डाव्या हाताकडून किंवा  पूर्वेकडून ही लेणी पाहायला सुरुवात करायची.सुरुवातीची काही खोदकाम हि अपूर्ण दिसतात. यामध्ये  साध्या खोल्या आहेत. त्यांच्यासमोर पाण्याची टाक्याही  जमिनीलगत खोदलेल्या दिसतात.यातले २१ क्रमांकाचे लेणे म्हणजे एक मोठे विहित असून या   लेण्यात पाच खोल्या एकत्रित आहेत. याच्याच  बाहेर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस एक भग्न  शिलालेख दिसतो.हा बहुधा  दानधर्मा बाबत असावा.या लेण्याच्या बाजूलाच  वरच्या मजल्यावर  जाण्यासाठी बाहेरच्या बाजूने एक जिना आहे.पुरातत्व विभागाने  हा जिना व्यवस्थित केलेला दिसतो. या जिन्याने वर गेलो कि   उजव्या बाजूला  

 सलग पाच खोल्यां दिसतात. हेही विहाराचा असावेत. या लेण्यांना ३० क्रमांक दिला गेला आहे. या खोल्यांसमोर पूर्वी व्हरांडा अथवा बाल्कनी  असावी. आज मात्र तिचा बराचसा भाग तुटला आहे. चौथ्या खोलीत जैन शिल्पकाम दिसते.इतिहास अभ्यासकांच्या मते हि शिल्पे  जैनांचे प्रथम र्तीथकर, बावीसावे र्तीथकर नेमिनाथ आणि जैन देवता अंबिकेची मूर्ती यांची आहे. यातील अंबिका देवी आंब्याच्या झाडाखाली बसलेली दाखवली आहे.  अंदाजे इ.स.च्या ६ ते ८ व्या शतकात जैनांनी आपल्या देवता या लेण्यात कोरलेल्या दिसतात. बहुधा या देवीच्या नावावरूनच या गटाला अंबा-अंबिका असे नाव मिळाले असे म्हणतात. पण काही इतिहासकार या शिल्पांना थेट महाभारतातील अंबा-अंबिका या पात्रापर्यंत आपल्याला पोहोचवतात. पण हे लेणे आहे मात्र  बौद्धकालीनच . अभ्यासकांच्या मते साधारण दोन हजार वर्षांपूर्वी खोदलेले.पण कालांतराने या लेण्यांमध्ये  हि  जैन शिल्पे कुना अनामिक शिल्पकाराने साकारली असावी. असो यांनतर पुन्हा खाली यायचे अन मुख्य लेण्यांकडे यायचे.

येथेच आपल्याला  चैत्यगृह एका लेण्यात खोदलेले दिसते.या लेण्याच्या दारातील   दर्शनी चार दगडी खांब पाहून आपण आश्चर्यचकितच होतो.यातले मधले  दोन खांब पूर्ण  तर बाजूचे दोन अर्धे भिंतीत गेलेले! यांची उंची सात मीटर . एका चौथऱ्यावर घट, त्यातून बाहेर आलेले हे अष्टकोनी खांब, त्यावर पुन्हा उपडा कलश अशी यांची रचना आहे.हेही खांब नंतर संवर्धित केलेले दिसतात. या खांबानंतर   ओसरी, त्यानंतर चैत्यगवाक्षाची भिंत आणि त्यापुढे प्रत्यक्ष चैत्यगृह दिसते. यातले चैत्यगवाक्ष अतिशय आखीव आणि रेखीव आहे.आतील स्तूप मात्र अर्धवट दिसतो.बहुधा या गृहातील दगड हा ठिसूळ झाला असावा म्हणून हे काम अर्धवट सोडून दिले असावे.पण या अर्धवट स्तूपाची भरपाई मात्र याच चैत्यगृहाशेजारच्या लेण्यात कालांतराने केलेली दिसते.या मुख्य लेण्याच्या डाव्या हाताला एका छोट्याश्या लेण्यात  आत एक सुंदर स्तूप कोरलेला दिसतो. या स्तूपाच्या निर्मितीचे कारण हे असे आहे.एव्हढेच नव्हे तर मुख्य चैत्यगृहाच्या भिंतींवर , गवाक्ष कमान, खांब या साऱ्यांवर दहा मोठे ब्राह्मी लिपीतील लेख कोरलेले होते असे अभ्यासक सांगतात. पण कालौघात आणि संवर्धनाच्या कामात आता फक्त आठच लेख शिल्लक आहेत. या साऱ्या लेखातून लेण्याच्या निर्मितीबाबत तसेच  दानधर्म बाबत माहिती मिळते.यांनतर काही विहार आणि पाण्याची टाकी लागतात.उजव्या बाजूच्या लेण्यांवरही   एक मजला खोदला आहे. तिथेहि विहार आहेत.

लेण्यांचा  परिसर हा अतिशय शांत आणि सुखद आहे.लेण्याच्या परिसरातून पश्चिमेस उभ्या असलेल्या किल्ले शिवनेरीचे  दर्शन आपल्याला सुखावते तर जुन्नर शहराचेही विहंगम दृश्य भटकंतीला आणखीनच नयनरम्य करते. हा संपूर्ण लेणी समूह पाहण्यासाठी एक तास पुरेसा ठरतो. पाण्याची एक बाटली सोबत ठेवावी. मध्यम चढाई असल्याने दमछाक होत नाही.पण निसर्गाचे पावित्र्य राखूनच आपण आपली भटकंती पूर्ण करावी तरच येथे येण्याला अर्थ आहे.

शिलालेख वाचन

ठिकाण                                     वाचन                                                अर्थ                                                         

लेणे क्र २१         महावेजे गामे जभबती उदेसेण निवतणानि      महावेज गावातील २६ निवर्तने शेत जांबू

चैत्य कमानीच्या     षाणूविस सिध अपराजित असतानी            वृक्षाची लागवड करण्यासाठी माणकूकड़

डाव्या बाजूस        मानमुकदस पुरतो तलकवाडके निवत         टेकडीजवळ  दुसरे एक शेत ताडवृक्ष

                  नि तिनी नगरसे...की...सेलउदे सैण            लागवडीसाठी लावण्यासाठी तसेच

                  निवतनणानि’                             गावाच्या सीमेच्या आतील तिसरे एक शेत

                                                                                                                         शाल वृक्षाच्या लागवडीसाठी अपराजित

                                                      संघाच्या सिद्धगणांच्या स्वाधीन केले.

(याचा अर्थ यावरून त्या काळात लोकांना वृक्षसंवर्धनाचे आणि वनीकरणाचे महत्त्व ज्ञात होते असे दिसून येते)

 

 

 

ठिकाण                                     वाचन                                                अर्थ                                                         

लेणे क्र २७           भारुकछकानं लंकुडियानं भातूणं            भरुकच्छ हे गावाचे नाव म्हणजे गुजरात

दोन्ही विहारांच्या            अससमस पुताण                    मधील भडोच हे असावे. येथील अससमचे

मधोमध भिंतीवर       बुधमितस बुधरखितस च बिगभं देयधंमं      पुत्र बुधमित व  बुधरखित या बंधूंनी या         

                                                        शैलगृहासाठी देणगी दिली आहे.

(सुरुवातीस स्वस्तिक, तर शेवटी श्रीवत्स ही शुभचिन्हे असलेला हा शिलालेख आहे)

 

सूचना

या लेणीकडे सहसा पर्यटक फिरकत नसल्यामुळे शक्यतो वाटाड्या बरोबर घ्यावा.

तसेच पिण्याचे पाणीही बरोबर घ्यावे.

 

 

Comments

  1. खूप सुंदर वर्णन... छुपा खगीना 👌👌

    ReplyDelete
  2. ओंकारजी खुपच सुंदर व माहिती पूर्ण -विकास चिथडे बदलापुर💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पळशी ...एक सुंदर गाव !!

कऱ्हे पठारावरचा भक्तीचा मळा !!

गौताळा अभयारण्याचे अंतरंग