अध्यात्म आणि पर्यटनाचा गोदावरी -प्रवरा संगम

 

मुळात नद्यांचा संगम पाहणे हाच मुळी आनंदयोग ठरावा. आपल्या संस्कृतीत  तर नदीला  जीवन वाहिनी असे म्हटले आहे. दोन वेगवेगळ्या प्रदेशातून वाहत आलेल्या नद्या या त्या-त्या खोऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात. तिथली संस्कृती हि त्या प्रवाहात सामावलेली असते. हे सारे अभ्यासून गेलो कि मग ह्या नद्यांचा संगम हा आणखीनच देखणा होतो.असंच काहीसे चित्र   मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या  सीमेवर असलेल्या कायगाव व टोका या दोन गावात पाहायला मिळते. या दोन्ही गावांचं वैशिष्ट्य म्हणजे या गावाजवळ असलेला अनोखा आणि अभूतपूर्व असा दोन नद्यांचा संगम. अहमदनगर जिल्ह्यातून वाहत येणारी व जिला अमृतवाहिनी असे नाव आहे ती प्रवरा व नाशिकहून येणारी व जिला  दक्षिणगंगा  असे नाव आहे ती गोदावरी अश्या दोन नद्या यांचा संगम झाला आहे किंवा ज्या ठिकाणी एकत्र येतात ते कायगाव टोका हि  गावे. अद्भुत असे दृश्य टोका गावाजवळील घाटावरून आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः सूर्योदयाचा देखावा अपूर्व असाच असतो. पुर्व दिशेच्या किरणांनी झाकोळलेला नदी काठ पाहणे यासारखे दुसरे स्वर्गीय सुख दुसरे नाही.आणि इथे तर दोन नद्यांचा मिलापच...मग काय विचारूच नका.


याच दोन  गावाजवळून अहमदनगर ते औरंगाबाद हा प्रशस्त असा रस्ते महामार्ग गेला आहे.हि दोन्हीही गावे एकमेकांशी अगदी जवळ आहेत म्हणूनच भिन्न असूनही यांना एकत्रितच नावाने हाक मारली जातात.याच परिसरात  असलेली  रामेश्वर, सिद्धेश्वर, मुक्तेश्वर व घटेश्वर ही शिल्पकलेचा उत्कृष्ट अविष्कार असलेली  मंदिरे विराजमान आहेत.  धार्मिक क्षेत्र असलेली ही मंदिरे आणि संगमाच्या  आसपास असलेल्या विपुल निसर्ग सौंदर्यामुळे हा भाग पर्यटनस्थळे म्हणून देखील ओळखला जातो.  यापैकी  सिद्धेश्वर, घटेश्वर व मुक्तेश्वर ही मंदिरे  संगमाच्या आसपास आणि टोका गावाच्या हद्दीत मोडली जातात.आणि रामेश्वर हे मंदिर कायगावजवळ आहे.

या ठिकाणाबाबतचा धार्मिक संदर्भही अनेक भाविक आपल्याला  सांगत असतात.तो म्हणजे रामायणकालीन.  त्यात भगवान रामाने नाशिकच्या पंचवटीपासून गंगापूरपर्यंत सीतेच्या हट्टापायी सुवर्णमृगाचा  पाठलाग केला, त्या वेळी प्रभूरामाने स्थापन केलेली ही मंदिरे आहेत. रामाने कार्य सिद्ध होऊन स्थापन केलेले सिद्धेश्वर मंदिर, मारीच नावाच्या राक्षसाने सुवर्णमृगाचे रूप धारण केले होते त्याचा देह म्हणजे काया जेथे पडली ते कायगाव,  मारीच राक्षसाला ज्या ठिकाणी मुक्ती मिळाली ते मुक्तेश्वर असे विविध संदर्भ अनेक ग्रंथांत आढळतात. संत एकनाथांच्या भावार्थ रामायण या ग्रंथात या सर्व मंदिरांना रामायणकालीन संदर्भ असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे या ठिकाणी येताना पुरेसा वेळ हाताशी असणे आवश्यक आहे. कारण इथली मंदिरे हि वास्तू स्थापत्याच्या दृष्टीने देखणी तर आहेतच शिवाय यावरील कला मात्र आपल्याला अक्षरशः मंत्रमुग्ध करून सोडते.

 कातळकलेची श्रीमती लाभलेलं- सिद्धेश्वर मंदिर समूह

टोका  गावाजवळ नदीकाठी बांधलेला सिद्धेश्वर मंदिर समूह हा येथल्या सर्व मंदिरांमध्ये उजवा ठरतो. यावरचे शिल्पकाम आणि कला यामुळे या मंदिराचे सौंदर्य हे वादातीत आहे.केवळ हे मंदिरच नव्हे तर या मंदिराजवळ असलेला  चिरेबंदी घाट हाही पाहण्यासारखाच आहे.या घाटावर उभे राहून सूर्योदय पाहण्याची मजा काही औरच. सिद्धेश्वर मंदिर समूहात एकूण तीन मंदिरे असून मध्यवर्ती आणि मोठे देऊळ आहे श्रीसिद्धेश्वराचे.भगवान शंकराचे.या मंदिराची बांधणी  दगडी असून यावरील कोरलेली असंख्य शिल्पे हि पाहण्यासारखी आहे. तसेच वसई विजयाचं प्रतीक असणारी पोर्तुगीज घंटा याठिकाणी मंदिराच्या आवारात आहे. विशेष म्हणजे  हे सारं पाहायला स्थानिकांशिवाय अन्य फारशी माणसं इथे येत नाहीत, कारण हे ठिकाण फारसं परिचितच नाही. त्यामुळे एकदा का मंदिराच्या आवारात आलो कि मग मंदिर उलगडायला सुरुवात करायची.तटबंदीतील पश्चिमाभिमुख असलेल्या लहान दरवाजातून या कलेच्या प्रसादात आपला प्रवेश होतो.



तीन मंदिरांच्या या समूहातील मध्यवर्ती आणि मोठे देऊळ आहे श्रीसिद्धेश्वराचे. पूर्वाभिमुख असलेल्या मंदिराची रचना नंदीमंडप,सभामंडप आणि गाभारा अशी आहे.यापैकी नंदीमंडप हा वेगळा दिसतो.चार खांबावर तोललेल्या या नंदीमंडपाचे जितके कौतुक कराल तितके थोडे आहे. यातला नंदी आणि त्यावर घातलेले दागिने हे तर पाहतच राहावेसे वाटतात. इतका आकर्षक कोरीव कामांनी नटलेला नंदी पाहायला मिळणे मुश्कीलच.नंदीमंडपनंतर आपण सभामंडपात प्रवेश करतो.मंदिराच्या प्रवेशद्वारातील जय विजय द्वारपाल आपले स्वागत करतात. एकूण १२ स्तंभांनी तोललेला हा मंडप आणि त्यावरील अंतर्गोल भव्य घुमटकाकृती छत म्हणजे एक आश्चर्यच आहे. स्तंभांदरम्यान असलेली कक्षासने म्हणजेबसण्याचे कट्टेहि आकर्षक आहेत.यानंतर आपले लक्ष जाते ते वर अंतर्गोल घुमटावरच्या अष्टदिकपालांकडे.हे सारे पाहताच राहावेसे वाटते.सभामंडपातून आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो.आतमध्ये शिवपिंडी सुरेख असून आणि  त्यावरचा पितळी नागहि लक्ष वेधून घेतो.धीर गंभीर वातावरणात आपण पिंडीवर माथा टेकवायचा .पिंडीच्या मागेच पाठभिंतीतील पार्वतीमातेची  मूर्ती हि सुरेख आहे. दर्शन आटोपले कि मग मंदिराच्या बाह्य भिंतीकडे आपला मोर्चा वळवायचा.

या मंदिराच्या बाह्य़ भिंतीवर पौराणिक कथां कोरलेल्या दिसतात.या कथांमधील  देखणी शिल्पांवरचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. श्री गणेशाचं पादप्रक्षालन करणारी भक्त स्त्री, हत्तीवर अंबारीत बसून सिद्धेश्वर मंदिराकडे आलेले नानासाहेब पेशवे, मत्स्य- कूर्म- वराह- नृसिंह- परशुराम रामकृष्ण आदींची  शिल्प, कृष्णाच्या गोपिकांसोबतच्या लीला,अर्जुनाचे गर्वहरण, तसेच मारुतीने  केलेलं भीमाचं गर्वहरण हा भाग रेखाटलेला  आहे. याव्यतिरिक्त स्त्रियांच्या विविध भावमुद्रा, नृत्यमुद्रा कोरलेल्या आहेत.मंदिरांच्या सर्व बाजूंच्या भिंतींवर रामायण, महाभारत आणि इतर पुराणांमधील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिराच्या पूर्वेकडील  बाजूस दशावतार पट्टिका कोरलेली आहे.या दशावतार पट्टिकेवरची शिल्पे अतिशय देखणी आहेत. विष्णूचे मत्स्यावतारापासून कल्की अवतारांपर्यंतचे दहा अवतार या पट्टीत पाहायला  मिळतात. हे पाहून झाले कि मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला असणाऱ्या विष्णू मंदिराकडे आपला मोर्चा वळवायचा.

हे मंदिर सुद्धा अतिशय देखणे असून  लहान लहान शिखरांच्या रचनेने बनलेले आहे.हे मंदिर लहान आहे. या मंदिराच्या समोर हात जोडलेल्या अवस्थेत गरूडाची मूर्ती स्थापन केलेली आहे.गरुड मूर्ती अतिशय देखणी आहे.तिच्या पाठीशी एक  हनुमान मूर्तीही दिसते. मंदिराची रचना आकर्षक असून  सभामंडपाच्या तीन देखण्या कमानी आणि तेथील छतावरचं नाजूक कोरीव काम लक्ष देऊन पाहण्याजोगे आहे. गाभाऱ्यात मध्यभागी  विष्णूची काळ्या दगडातील मूर्ती  आणि तिच्या बाजूलाच  पांढऱ्या संगमरवरी दगडातील आयुधज्ममाची अधोक्षज विष्णू प्रतिमा अशी जोडी आहे. विष्णू मंदिराच्या भिंतीवरही शिल्पांचा खजिनाच पाहायला मिळतो. यातील वैशिष्ट्यपूर्ण असलेलं शिल्प मागील भिंतीवर आहे. यावर हत्ती आणि मर्कटांचे अनोखे शिल्प कोरलेले आहे. मर्कट तर इतके खुबीने कोरलेले आहेत की त्यांच्या जबड्यातील दातही अगदी स्पष्टपणे दिसतात.

यानंतर आपला मोर्चा  वळवायचा तो मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला असणाऱ्या गजरादेवीच्या मंदिराकडे.या मंदिराचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचा खालील भाग पाचकोनी चांदणीसारखा आहे.स्टार आकाराच्या धर्तीवर बांधलेलं हे दुर्मिळ मंदिर आहे.या मंदिराचे खांब पाहण्यासारखे आहेत  तसेच  देवकोष्टके (कोनाडे) व त्यावरील छोटी शिल्पे हि आकर्षक आहेत. तारकाकृती आकाराच्या चार पाकळ्यांवर बाहेरच्या बाजूने काही शिल्पे सप्तमातृकांमधील मूर्तीची आठवण करून देतात. त्याच्या कळसाकडील भागांवर वेगवेगळ्या अवस्थेतील गजशिल्पे आवर्जून पाहण्याजोगी आहेत. गाभाऱ्यात गजरादेवीची मूर्ती आकर्षक आहे.


पूर्व-प्रकाशित -- साप्ताहिक लोकप्रभा 








Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गौताळा अभयारण्याचे अंतरंग

पळशी ...एक सुंदर गाव !!

जल-व्यवस्थापनाचा आविष्कार असलेली "मंचरची बारव"