पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागालाअसणाऱ्या मावळ तालुक्याला परिसस्पर्श
झालाय पवना आणि इंद्रायणी या दोन मुख्य नद्यांचा.या दोन नद्या म्हणजे मावळच्या संस्कृतीची प्रतीकेच . या दोन नद्यांनी मावळ खऱ्या अर्थाने सुजलाम -सुफलाम केला. तसं पाहिलं तर माणूस आणि नदी यांचं नातेच मुळी अगदी घट्ट आहे. याच नद्यांच्या तीरावर आपली संस्कृती रुजली,टिकली आणि विस्तारली. मानवी संस्कृतीच्या विकासात या अशा नद्यांचं योगदान अतिशय मोलाचे आहे. प्राचीन काळी आर्य हे सिंधू नदीच्या काठावर राहिले आणि त्यातूनच पुढे सिंधू संस्कृतीचा उगम झाला हे सर्वानाच माहित आहे. हेच नव्हे तर कितीतरी समुदाय हे भारतातील विविध नद्यांच्या काठी स्थिरावले आणि नदीच्या काठावरच त्यांची प्रगती झाली. मानवी व्यवहारही याच नद्यांनी पाहिले. अशा रीतीने नदी हि आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनली. म्हणूनच या नद्या आपल्यासाठी देवत्त्व म्हणूनच ओळखल्या जाऊ लागल्या. सह्याद्रीच्या घाट माथ्यावरील डोंगरातून उगम पावलेल्या नद्या या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. दोन डोंगराच्या मधून वाहत गेलेल्या नदीच्या प्रदेशाला/भागाला "खोरं" म्हणण्याची पद्धतही प्राचीन. उदा. पवना नदीचा
परिसर म्हणजे "पवना खोरं". इंद्रायणी नदीचा परिसर म्हणजे "इंद्रायणीचं खोरं". तर अशी हि मावळ तालुक्याची दोनसमृद्ध खोरी. या दोन नद्यांनी मावळची संस्कृती, कला विकसित केली. तसेच या खोऱ्यातूनच स्वराज्य रक्षणाचाही नाद घुमला. या दोन खोऱ्यात उभे असलेले गड-किल्ले, लेण्या , मंदिरे हि त्याची द्योतके.
यातली पहिली नदी म्हणजे पवना. या नदीच्या परिसराला पवनेचे खोरं किंवा पवनमावळ असं नाव. हे नाव शिवकाळात मोठं आब राखून होत. सह्याद्रीच्या घाट-माथ्याजवळ असलेल्या मुख्य डोंगरातून हि नदी उगम पावते. आतवण हे तीच उगमस्थान. सहारा-लोणावळा या रस्त्याला खेटूनच हे गाव आहे. छोट्या झऱ्याचं रूपांतर नदीत होऊन ती घेवंडे-आपटी-आंबेगाव अशी पुढे वाहत जाते. तिच्या एका बाजूला तुंग तर दुसऱ्या बाजूला लोहगड. सध्या येथे धरण बांधल्यामुळे तिचाडोळ्यांना दिसणारा प्रवाह काळे कॉलनीपासूनच सुरु होतो. याच धरणात पवना नदीच्या काठी बांधलेलं हेमाडपंथी धाटणीचं वाघेश्वराचं अप्रतिम शिवालय पाण्याखाली गेलं. हे मंदिर पाहण्यासाठी तुम्हाला पावन मावळातील वाघेश्वर गावात यावे लागते.साधारण फेब्रुवारी ते जून पर्यंतच या मंदिरात जात येते. नंतर हे मंदिर पाण्याखाली जाते. वाघेश्वर गावातच मंदिरातील जुनी भलीमोठी घंटाही आवर्जून पाहावी अशीच. यावरून या नदीच्या काठी धार्मिक बीजेही रोवली गेलेली दिसून येते.या खोऱ्याचा "कॅनव्हास" पाहायचा असेल तर तिकोना-ब्राम्हणोली या रस्त्यावर कुठेही उभे राहा. या भागात रस्त्याला तीव्र चढ आहे. स्थानिक भाषेत या जागेला वारदांडा म्हणतात. येथून समोरच पवनेच समृद्ध खोरं पहा. या पवनेने हा काठ शब्दशः सुफलाम केलाय. कालेगावावरून हा प्रवाह कोथुर्णेगावाला स्पर्शून जातो. कोथुर्णेला तर नदीवर घाट बांधलाय. गो नि दांडेकर म्हणतात," घाट म्हणजे नदीचा अलंकारच. नदी येथे फार शोभून दिसते. गावाचं गावपण याच घाटांवर अनुभवायला मिळते." इथला घाट आणि पूल हा पाहण्यासारखा.नंतर हा प्रवाह शिवली-भडवली-आर्डव मार्गे थुगावला जाते. मधल्या
कडधेच्या पुलावरून पवना भारीच दिसते.थुगाव येथला पवनेचा प्रवाह जास्त उताराचा. या उतारावरून पाणी मोठं खट्याळ बनते. येथल्या खडकावरून पाण्याचा वेग पहाणे रोमहर्षक वाटते. नंतर बौर-थुगाव-शिवने-आढे-ओझर्डे-परंडवाडी-सोमाटणे-गोडुंब्रे मार्गे हि नदी पुण्याकडे मार्गस्थ होते. या दरम्याननदीची वळणे हि जवळ जाऊन पाहण्यासारखी. उसाची शेत तुडवीत , भातखाचरांच्या कडेकडेनेसळसळत वाहत गेलेली पवना नदी पाहण्यासारखा आनंद नाही. पवनेच्या खोऱ्यानेतुंग-तिकोना-विसापूर-लोहगड सारख्या किल्ल्यांचा पराक्रम पाहिला.याच खोऱ्याने शिव-छत्रपतींनी सुरतेहून आणलेली लूट बघितली. तसेच शिवछत्रपतींनि कारतलबखान विरुद्ध गाजवलेला पराक्रमही उंबरखिंडीत पाहिला. बेडसे-येलघोल-तिकोना लेण्यांसारखी कातळकलाही याच खोऱ्याने जन्माला घातली. अश्या या "पवनामाईचा" अनोखा प्रवास थक्क करणारा आहे.
 |
| पवना नदीच्या खोऱ्यातील तुंग किल्ला |
 |
| बेडसे लेणी |
 |
| वाघेश्वर मंदिर |
 |
| पवनेचे खोरे |
 |
| पवना नदीच्या खोऱ्यातील मोरगिरी किल्ला व जवळील डोंगर रांग |
दुसरी नदी आहे इंद्रायणी. इंद्रायणी या शब्दातील सामर्थ्य तर अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. या नद्यांचं थोरपण एवढं कि संत तुकोबाराय आणि संत ज्ञानदेव या दोनमहान संतांचे चरण स्पर्शणारी हि नदी. संपूर्ण मानवजातीलाच शिकवण देणारी धार्मिक आणि विचारांची पीठे देहू आणि आळंदी हि याच नदीच्या काठावरची. हि नदी वाहत येते मावळातून. भौगोलिक दृष्ट्या या इंद्रायणीचा प्रवास अनुभवण्यासारखा. लोणावळ्याजवळ कुरवंडेच्या डोंगरात उगम पावणारी हि नदी पुढे टाटा धरणात लुप्त होते व धरणानंतर पुन्हा सुरु होते. लोणावळा शहरातून ती बाहेर पडते व मुंढावरे आणि ताजे दरम्यान दिसते. याच्याच पुढे लोहमार्ग आणि नदीचे पात्र समांतरच म्हणजेच एकमेकांना खेटूनच धावतात.हे दृश्य भारी वाटते. कामशेटच्या अलीकडे वडिवळेला कुंडलिका नदी इंद्रायणीला येऊन मिळते.याच संगमावरच शिवालय पाहण्यासारखे आहे. कामशेत आणि खामशेत या दोंघांमधील खिंडीतून हि नदी बघतच राहावीशी वाटते. नदीचं विशाल खोर डोळ्यात भरते.येथून हि नदी पारवडी-टाकवे-तळेगाव -इंदुरी-मार्गे देहूला मार्गस्थ होते. टाकवेवरून पुढे गेलेल्या या नदीला राजपुरीजवळ आंद्रा नदी येऊन मिळते. इंदुरीत हि नदी भुईकोट किल्ल्याला स्पर्शून जाते तर याच्याच पुढे असलेल्याकुंडमळा येथे या नदीच्या पात्रातले रांजण-खळगेही पाहण्यासारखे. प्रत्येक ऋतूत हि नदी वेगळी वाटते. पावसाळ्यात हि रौद्रावतार धारण करते. या नदीच्या खोऱ्यात कार्ला -भाजे सारख्या जागतिक दर्जाच्या लेण्या उदयास आल्या. या लेण्यांच्या बरोबरच पाटण-देवघर-शिलाटने या लहान लेण्यासुद्धा आकारास आल्या. एव्हढेच नव्हे तर याच लेण्यांच्या साक्षीने कोकणावरून दख्खनला जाणारा प्राचीन रस्ता याच खोऱ्यातून जात होता. एकविरा देवी -भंडारा -देहू सारखी तीर्थक्षेत्रेही याच खोऱ्यात वसली. याच खोऱ्याने इतिहासही घडवला. वडगाव येथे दोन लढाया झाल्या .सुरत लुटीच्या वेळी १७६४ साली नारो बापूजी आणि मुघलांची लढाई हि एक आणि इंग्रज-मराठे यांच्यातली लढाई हि दुसरी. या दोन्हीही लढायातला विजय याच खोऱ्याने अनुभवला. याच खोऱ्यातील मळवली येथील छापखान्यातुन चित्रकार राजा रवी वर्मा यांची अजरामर चित्रे जगभरात पोहोचली.
 |
इंद्रायणी नदीच्या खोऱ्यातील पाटण येथील तलाव
 | इंद्रायणी नदीच्या खोऱ्यातील पाटण येथील लेणी
 | इंद्रायणी नदीचे तळेगाव MIDC जवळून घेतलेले दृश्य
 | इंद्रायणी नदीचे इंदोरीच्या भुईकोट जवळील विलोभनीय दृश्य
|
|
|
|
मावळच्या
भागातील आणखी महत्वाचे
खोरे म्हणजे
आंद्रा नदीचे. आंद्रा खोरे.
आंद्रा नदीची लांबी इंद्रायणी आणि पवनेच्या
तुलनेत फारच कमी. पण या
नदीचा इतिहास अगदी सातवाहन
काळापर्यंत जातो.म्हणूनच इतिहासकार आणि अभ्यासकांच्या
दृष्टीने आंद्रा खोरे महत्वाचे.याला शिवकाळात
आणि अगदी
आजही
"आंदर मावळ"
म्हटले जाते.
आंदर हा
आंध्र शब्दाचा अपभ्रंश असावा.यासाठी आपल्याला हजारो वर्षे मागे जावे
लागेल. सातवाहन हे इ.स.पूर्व २३० ते
इ.स.२२० या
कालखंडात राज्य करीत होते. हे भारतातील
अत्यंत महत्वाचे राजघराणे होते.पैठण
(तेव्हाची प्रतिष्ठान) हि सातवाहनांची
राजधानी होती. पुराणात या सातवाहनांना
आंध्र असे म्हटले
आहे.आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राम्हण व महाभारतातही
यांचा उल्लेख औंड्र असा आला
आहे. तो हाच
वंश.हा भारतातील
पौंड्र, मुतीब, शबर इ
जमातींप्रमाणे अवैदिक वंश होता. हा औंड्र
समाज मूळचा
पशुपालक.हा समाज
पुरातन काळापासून दक्षिणेतच वावरत होता. आजची ओडिशा
,आंध्र प्रदेश हि नावे
याच नावावरून
म्हणजेच अपभ्रंश होऊन पडली
असावी. हे सारे
मुद्दे
"सह्याद्री"कार स. अ. जोगळेकर यांनी व्यवस्थितपणे मांडले आहेत.
याच मावळातल्या
"आंदर मावळाचेही" अपभ्रंश हे अश्याच
पद्धतीने झाल्याची दाट शक्यता
अभ्यासक मानतात. या भागातील
आंद्रा
नदी हि भिवपुरीच्या
डोंगरात (कर्जत आणि मावळ
तालुक्याच्या सीमेवर असलेल्या डोंगरात म्हणजेच खांडी गावाजवळ ) उगम पावून
राजपुरी गावाजवळ इंद्रायणी नदीला मिळते. या दरम्यान
या नदीवर
ठोकळवाडी आणि आंद्रा
हि दोन
धरणे बांधली
आहेत. पूर्वीच्या काळी नालासोपारा
हे कोकणातील
महत्वाचे व्यापारी बंदर होते. समुद्रमार्गे आलेला माल या
ठिकाणावरून घाटमाथ्यावरील प्रदेशात जात असे. हा व्यापार
नालासोपारा -भिवपुरी-मार्गे आंद्रा खोऱ्यातून
पुणे येथे जात
असे.हा व्यापार
आंद्रा खोऱ्याच्या तोंडालाच असणाऱ्या कुसूर घाटामार्फत होता असे. या घाटाच्या
खाणाखुणा आजही पाण्याच्या
टाक्यांच्या आणि मैलांच्या
दगडांच्या रूपाने
येथे पाहायला मिळतात. तसेच या
भागात तत्कालीन साधकांनी आणि तपस्वींनी
खोदलेल्या अतिशय दुर्गम भागातील कल्हाट आणि निगडे
येथील लेण्या याचीच द्योतके. या लेण्या
पाहायला स्थानिक माणसांचीच मदत घ्यावी
लागते.कल्हाटची लेणी जरा
उजवी. पण आहे
अतिशय कठीण. टाकवे-खांडी-कुसूर-पिंपरी-कुणे-इंगळून-किवळे-कशाळ
-भोयरे-फाळने-राजपुरी हि निसर्गसुंदर गावे याच
खोऱ्यातील. मावळचा हा प्राचीन भाग
आवर्जून पाहावा. ग्रामीण बाजाचे सौंदर्य तुम्हाला नक्कीच घायाळ करेल यात
शंकाच नाही.
तसं पाहिलं तर नद्या चांगल्या व स्वच्छ पाहायला मिळतात तरी कुठे..?? आपलं भाग्य थोर कि काही नद्या त्याला नक्कीच अपवाद आहेत. अश्यांपैकीच या तीन नद्या. वेगळ्या दृष्टीकोनातून हि सफर केली तर नक्कीच समृद्ध अनुभव पदरी पडतील यात शंकाच नाही....
 |
आंद्रा नदीच्या खोऱ्यातील टुमदार गाव
 | आंद्रा खोऱ्यातील भातलावणी
 | आंद्रा खोरे
 | आंद्रा नदीच्या खोऱ्याचे काम्ब्रे लेणी मधून घेतलेले सुंदर दृश्य
|
|
|
|
 |
| कुसूर घाट वाट |
पूर्वप्रकाशित साप्ताहिक लोकप्रभा




Wonderful writing.
ReplyDeleteअतिशय सुंदर , छान आणि आकर्षक वर्णन आहे
उत्कृष्ट वर्णन केलं आहे तिन्ही खोऱ्यांचं ! साक्षात चित्र उभं करणारं.सुंदर
ReplyDeleteअप्रतिम माहिती....
ReplyDelete