नांदेड जिल्ह्याचे अव्दितीय रत्न - कंधारचा भुईकोट !!

 भुईकोट हा दुर्ग भटकंतीमधील सोपा प्रकार.बऱ्याच जणांचा कुतुहलाचादेखील विषय.जमिनीवर बांधलेल्या किल्ल्यांना भुईकोट म्हणतात.त्यामुळे किल्ल्यांचा हा प्रकार पर्यटनाच्या दृष्टीने वृद्ध,स्त्रिया यांच्या सोयीचा.याच कारणामुळे बऱ्याच भुईकोटांवर कुटुंबकबिल्यासहीत पर्यटक फिरताना दिसतात.आता राहिला मुद्दा कि ..किती भुईकोट चांगल्या अवस्थेत आहेत..??हा.तर याचे उत्तर "हातावर मोजण्याइतकेच थोडे भुईकोट अस्तित्वात आहेत.हे वास्तव जरी जळजळीत आणि कटू असले तरी सत्य आहे.कारण अवघड ,अतिउंच असलेल्या डोंगरीकिल्ल्यांपेक्षा या अशा जमिनीवर बांधलेल्या किल्ल्यांवर मनुष्याचे अतिक्रमण अतिशय जलदगतीने झाले.यांची तटबंदी घरांच्या आडोसे बनले. कितीतरी भुईकोटांच्या तटबंदीलगत झोपडपट्ट्या आश्रयाला आल्या.यांचे खंदक गावातल्या गटारी बनल्या.किल्ल्यांमधील वस्तूंचे,इमारतींचे दगड,चौकटी,दरवाजे नागरीकरणासाठी वापरले गेले.इतिहासाविषयी असलेली आपली प्रचंड अनास्था हेच आपल्या बहुकोटांच्या दुर्दशेचे कारण झाले आहे.अशा दुर्मिळ वस्तू  ह्याच आपला वैभवशाली  वारसा आहेत हेच आपण सोयीस्कररीत्या विसरलो आहे.त्यामुळेच झालंय  काय कितीतरी भुईकोट किल्ले अक्षरशः नामशेष झाले.तरीही त्यातल्या त्यात सोलापूरचा भुईकोट,मालेगावचा भुईकोट,परांडा,नळदुर्ग असे काही बलाढ्य आणि भक्कम भुईकोट तग धरून आहेत हेच आपले भाग्य.भुईकोट किल्ल्यांचं डोळे दिपवणारे वास्तू-स्थपत्य अश्या किल्ल्यांमधून आपल्याला दिसत असते.आजही आपण या भुईकोटानं भेट दिली कि विस्मयचकित होऊन जाल.इतकं वैविध्य आणि लष्करी सुसज्जता आपल्याला पाहता येईल.याच पंक्तीत आणखी एक भुईकोट आपल्याला खुणावतो.त्याच नाव म्हणजे कंधारचा भुईकोट.मराठवाड्यातील अद्वितीय रत्न म्हणून या किल्ल्याचा आवर्जून उल्लेख केला जातो.नांदेड जिल्ह्यातील  कंधार  या तालुक्याच्याच ठिकाणी असलेला हा भुईकोट तुम्हा आम्हासारख्या पर्यटकांना अजिबात निराश करीत नाही.त्यामुळे कंधारसाठी एकदा तरी वाट वाकडी करायला हरकत नाही.मुळात हा मराठवाड्यातील हा  सारा परिसरच दुष्काळाच्या दाहकतेने कमी अधिक प्रमाणात होरपळून निघालेला आहे.पण तरीही येथे पर्यटनाची जी काही थोडी फार ठिकाणे आहेत त्यात कंधारच नाव आवर्जून घ्यावंच लागेल.









 कंधारच्या किल्ल्याचा विस्तार हा २४ एकर असून संपूर्ण किल्ला १२ मीटर उंचीच्या दगडी तटबंदीने वेढलेला आहे.तटबंदीच्या बाहेरून खंदकही खोदलेला दिसतो.या खंदकावरून किल्ल्यामध्ये जाण्यासाठी पूर्वी काढता-घालता येणार पूल होता.जेव्हा गरज असेल तेव्हाच तो वापरला जाई.अन्यथा काढून ठेवला जाई.सध्या पुरातत्त्व खात्याने येथे कायम स्वरूपी रस्ता बनविला आहे.हा खंदक पार करून आपण उत्तराभिमुख असलेल्या लोहबंदी दरवाजासमोर येतो.पण हा दरवाजा लांबून दिसत नाही.कारण याच्या समोरच जीभीची (_म्हणजे दरवाजासमोरची )भिंत बांधलेली आहे.मुख्य दरवाजावर शत्रुसैन्याचा थेट मारा न होता  तो अश्या भिंतींवर होत असतो.यालाच जीभीची भिंत म्हणतात.लष्करी डावपेचाचा हा भाग स्थापत्यातून साकारलेला दिसतो. या दरवाज्याला लोखंडी खिळे मारल्यामुळेच या दरवाज्याचे नाव लोहबंदी पडले असावे असे अभ्यासकांचे मत आहे.

सध्या हा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून येथे  पहारेकऱ्यांचीही नेमणूक झालेली दिसते.असो.आतमध्ये शिरताक्षणीच भव्यतेची जाणीव व्हायला सुरुवात होते.हळूहळू अंतरंग उलगडू लागते.भक्कम अशी दुहेरी तटबंदी समोर येते . या दोन तटबंदीमध्ये अंतरही राखलेलं दिसते.दोन्ही तटबंदीवर चर्याही दिसतात.आपण जस-जसे आत जातो तसं-तशी सौंदर्याची उधळण आपल्यावर होत असते.मछली दरवाजा,महादरवाजा किंवा रंगीन दरवाजा अशी वेगवेगळी प्रवेशद्वारे समोर येतात.आतमध्ये बऱ्याच इमारती असून मछली दरवाज्यासमोरच्याच अंगणात असलेली अंबारखाना इमारत आवर्जून पाहावी अशीच आहे.याच प्रांगणात दरवाज्याच्या डाव्या बाजूला पहारेकऱ्यांच्या सहा देवड्या देखील दिसतात.अंबारखान्याच्या इमारतीच्या भिंतीत कोरलेले व्यालाचे दगडी शिल्पही वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे.यानंतर महाकाली इमारतीच्या प्रवेश द्वारापाशी उजव्या बाजूला देखणा महाकाली बुरुज आहे.यावरचा कोरलेला फारसी शिलालेखही आवर्जून पाहण्यासारखा आहे.डाव्या बाजूला इब्राहिमी बुरुजही आपले लक्ष वेधून घेतो.हे पाहून आपण थोडे पुढे गेलो कि आपली पावले एके ठिकाणी आपोआपच थबकली जातात.कारण येथे उजव्या बाजूला भव्य दगडी शिल्पाचे अवशेष आपले लक्ष वेधून घेतात.नाकापासून डोक्यापर्यंतचा भाग ,पावले,हात,हि मोठ्या आकाराची शिल्पे पाहून आपण आश्चर्यचकित होतो.अनेक अभ्यासकांच्या मते हि यक्ष पुरुषाची मूर्ती आहे.व ती किल्ल्यात जपून ठेवली आहे.






   किल्ल्याच्या आवारात इतरही मुर्त्या दिसतात.मशीद,महाल,शाही हमामखाना,चुन्याचा घाना,शिवमंदिर,कैदखाने,धान्यकोठारे,मकरमुख असलेली तोफाही पाहायला मिळते.

यातील राजवाड्याचे अवशेष मात्र आजही पाहण्यासारखे आहेत.सुलतानांच्या राजेशाही उपभोगी जीवनशैलीची साक्ष देणारे हे राजवाड्यांचे अवशेष पाहून तत्कालीन वैभव कसे असेल याचा अंदाज आपण बांधायचा.या राजवाड्यांचेच भाग म्हणजे लालमहाल आणि दरबारमहल पूर्वी एका मोठ्या चौथऱ्यावर बांधले होते.याच आवारात कारंज असणारं पाण्याचे सुंदर टाके हेही अप्रतिमच.विविध नक्षीकामाने सजलेले इमारतींचे कोनाडे आपले डोळे दिपवून टाकतात.नक्षीमहाल आणि त्यातल्या त्यात शीशमहालाची तर बातच न्यारी. नावाप्रमाणेच या महालात विविध रंगाच्या काचा तसेच आरसे वापरून हा महाल सुशोभित करण्यात आला होता.या अश्या सगळ्या महालांचं वास्तुस्थापत्य हे सुलतानशाह्यांचं  ऐषोरामी जीवनशैली तर सांगतातच शिवाय त्यांच्या रसिकतेच्या कथाही सांगतात.



खरतर  कंधारचा भुईकोट हा तासा-दोन तासासाठी नाहीच मुळी.हा पाहण्यासाठी तुमच्या हातात एक दिवस तरी हवाच.कारण याचा कोपरा अन कोपरा हा आवर्जून पाहण्यासारखा आहे.विविध भिंतींवर कोरलेले शिलालेख हे तर अभ्यासकांसाठी महत्वपूर्ण तर आहेतच शिवाय वेगवेगळ्या नावांच्या इमारती,कमानदार वाटा यामध्ये आपण रमून जातो.आणि किल्ला पाहताना आपण याच्या इतिहासाविषयी उत्सुकही होतो.आणि इथलाच स्थानिक गाईड मग आपल्याला याची माहितीहि  पुरवतो व सांगतो कि कंधारच्या किल्ल्याने अनेक राजवटी पाहिल्या.इ.स. चौथ्या शतकात काकतीय राजघराण्याने कंधारची निर्मिती केली व हेच ठिकाण राजधानी म्हणून निवडले.त्यानंतर राष्ट्रकूटांनी याच्या जोडीलाच कंधारपूर हि नागरी वसवली.याच काळात हा भुईकोट कृष्णदुर्ग म्हणूनही ओळखला जात असे.इ.स. बाराव्या शतकात यादवांच्या ताब्यात हा किल्ला गेला.यानंतर मलिक काफूर,बहामनी सत्ता,निजामशहा,मुघल अश्या विविध राजवटींच्या अमलाखाली हा किल्ला होता.त्यामुळे विविध राजवटीमध्ये या किल्ल्याची बांधकामे झाल्याचे सांगण्यात येते.यामध्ये अरेबिक,पर्शियन  यांच्या स्थापत्याचाही पगडा दिसून येतो.हा इतिहास वाचून-ऐकून हा किल्ला पहिला कि अजून समाधान वाटते.

हा भुईकोट दूर मराठवाड्यात असल्यामुळे दूर अंतराचे कारण सांगून  बरेच पर्यटक येथे येण्याचे टाळतात.पण केवळ "दूर अंतर " असणे हे किल्ला न पाहण्याचे चुकीचे कारण ठरेल.नांदेडच्या भेटीत हा किल्ला आपल्या भटकंतीच्या डायरीत पहिल्या स्थानावरच असायला हवा यात मात्र तिळमात्र शंका नाही.पण  या साठी आपणही अश्या ऐतिहासिक वास्तूंचे रसिक असायला हवे.ह्या साऱ्या गोष्टी जुळून आल्या कि मग मात्र कंधारची भेट  संस्मरणीय ठरते.

कसे जाल

नांदेडवरून लोहामार्गे कंधार हा किल्ला साधारण चाळीस किलोमीटरवर आहे.कंधार गावात येण्यासाठी खाजगी आणि एस टी हि वाहने उपलब्ध आहेत.


पूर्व-प्रकाशित साप्ताहिक लोकप्रभा 






Comments

Popular posts from this blog

कऱ्हे पठारावरचा भक्तीचा मळा !!

पळशी ...एक सुंदर गाव !!

गौताळा अभयारण्याचे अंतरंग