“निरबावी” – एका नदीच्या मुळापर्यंतचा प्रवास
आपल्या मराठीत एक म्हण आहे, “ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये.” या म्हणीप्रमाणे आपण तसे वागतोही. पण तरीही काही भटक्यांची पाऊले ही नदीच्या मुळाकडे वळतातच. नदीचे मूळ असते कसे...? या प्रश्नाचे उत्तर अशा भटक्यांच्या शोधक बुद्धीला अस्वस्थ करत असते. आणि मग सुरु होते अनोखी भटकंती... नदीच्या मुळाच्या दिशेने. आजही सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत विविध नद्यांची ठिकाणे दडलेली आहेत, की त्याचं सौंदर्य आपल्याला अक्षरशः भुरळ पाडते. असच एक अनवट ठिकाण रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाटात दडलंय. वरंधा हा घाट तसा पर्यटकांना नवा नाही. सह्याद्रीच्या रांगड्या सौंदर्याचं दर्शन या घाटाच्या प्रत्येक फ्रेममधून पहायला मिळत. त्यामुळे या घाटात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. असो याच वाटेत घाटमाथ्यावर भोरच्या पुढे आणि वरंधा घाटाच्या अलीकडे शिरगाव लागते. याच शिरगावात निरा नदीचे उगमस्थान ‘निरबावी’ या नावाने उभे आहे. त्यामुळे अविस्मरणीय अनुभवासाठी निरबावीचा प्रवास एकदा तरी अनुभवायला हरकत नाही.
तसं
पाहिलं तर वरंधा घाटातून आपला प्रवास बऱ्याच वेळा कामानिमित्त होत असतो. या वरंधा
घाटातल्या सौंदर्याने आपण ब-याचवेळा थांबतोही. सह्याद्रीचं राकट सौंदर्य, धडकी भरविणाऱ्या
दऱ्या, टुमदार गावं, भरदार निसर्ग सौंदर्य यामुळे हा परीसर कायमच सुखावत असतो.
कोणत्याही ऋतूत या परिसरात आलो की, मन अगदी तरारून उठतं. या घाटाच्या परिसरातील बरीच
पर्यटनस्थळ पर्यटकांना आकर्षित करीत असतात. शिवथरघळ, कावळ्या किल्ला, दुर्गाडी
मंदिर वगैरे .. वगैरे. याच वरंधा घाटाच्या अलीकडे डाव्या बाजूला असणारा उंच डोंगर
म्हणजे ‘मोहनगड’ आणि याच्या जवळच असलेलं हे नीरबावीचं ठिकाण खरतर आवर्जून पहावं
याच श्रेणीतल आहे. सध्या आडवाटेवर असणाऱ्या ठिकाणाकडे पर्यटकांचा ओघ वाढतो आहे.
त्यामुळे या नीरबावीकडेही काही हौशी पर्यटकांची पाऊले वळत आहेत.
असो.
आपणही या निसर्गाच्या सौंदर्य सोहळ्यासाठी सज्ज व्हायचे. वरंधा घाटरस्त्यातल्या
शिरगावात आलो की, गावात शिरतानाच उजव्या बाजुला भलेमोठे घर लागते. श्री भेलके
आडनावाच्या या सद्गृहस्थाच्या घरासमोरच गाड्या लावायच्या आणि नीरबावेचा रस्ता
व्यवस्थित विचारून घ्यायचा. गावकरीही अत्यंत आपुलकीने दाखवितात आणि एवढ्या लांबून
हे ठिकाण बघायला आलात त्याबद्दल आश्चर्यही व्यक्त करतात. घरापासूनच एक मळलेली पायवाट
आता आपल्याला नीरबावीकडे घेऊन टेकडीवरून आणि नंतर ओढा पार करून हळूहळू खाली उतरते.
या वाटेबरोबर वरंधा डांबरी घाटरस्ताही आपल्याला समांतरपणे चालत असतो. निसर्गामधील
विविध प्राणीविश्वाच्या आवाजाबरोबरच गाड्यांचे हॉर्नही ऐकू येतात. आणि अचानक गर्द
झाडीतून आपल्याला एका चौकोनी बांधीव दगडी कुंडाचे दर्शन होते. हीच ती नीरबावी !
आखीव-बांधीव, चहुबाजूंच्या डोंगराच्या कुशीत अलगद बसलेली ही नीरा नदीच्या उगमाची
जागा म्हणजे सर्वार्थाने नदीचं सौंदर्य अधोरेखित करणारी आहे. या सुंदर कुडात खाली
उतरण्यासाठी पायऱ्याही बांधलेल्या आहेत. यावरून खाली उतरलो की नीरचं अमृतासमान
असलेलं काचेसारखं पाणी हातात घेण्याचा आपसूकच मोह होतो. हे पाणी बाराही महीने या
कुंडात असते. या इमारतीशेजारीच शंकराची पिंड आणि ताशीव दगडी दिसतात. बहुधा या
ठिकाणी येथे शिवमंदिर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथून दिसणारा नजारा
अवर्णनीयच. पण या सौंदर्यापेक्षाही येथील शांतता मात्र जास्त भावून जाते.
खरोखर
नदीचा उगम किती सुरेख आणि मोहक असतो. हे शहरात राहणाऱ्या आपल्यासारख्या अभाग्यांना
कधी कळणार नाही. सजीवसृष्टीसाठी जीवनदायीनी असलेल्या नद्यांबाबत आपण किती
निष्काळजी आणि संवेदनाहीन असतो. पण नीरा नदीचा हा उगम पाहिला की, मग आपोआपच आपण
खुजे वाटतो. निसर्गाने आपल्याला किती भरभरून दिलेले असते, पण आपण मात्र त्याचे
विद्रुपीकरण करण्यातच धन्य मानत असतो. नीरबावीचं हे सुंदर दर्शन मात्र या आपल्या अशा कृत्यांना छेद देणारे असले पाहिजे तरच या अशा ठिकाणाला
भेट देण्यात अर्थ आहे. अन्यथा या ठिकाणाचं पावित्र्य तुम्ही न गेलात तर जास्त
टिकेल यात शंका नाही.
जाण्याचा मार्ग
भोरच्या पुढे आणि वरंधा घाटाच्या अलीकडे शिरगाव -- निरबावी
(गावात चौकशी केली कि कोणीही रस्ता दाखवेल.)
भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी
पावसाळा सोडून कधीही
Really Great and amazing ...River base place finding and sharing 👍👍
ReplyDelete