सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील "गणेशरूपे"
महाराष्ट्राचे
लाडके आराध्यदैवत असणाऱ्या गणेशाचा उत्सव भाद्रपद महिन्यात सुरु होत असतो. अनेकजण
आपल्या लाडक्या बापाच्या दर्शनासाठी उत्सुक असतात .आजूबाजूला असणाऱ्या मंदिरातून
बाप्पांचे दर्शन आपण घेत असतो. यात आपली सह्याद्रीची कूस मागे कशी राहील. आडवाटेवर
असणाऱ्या जंगलात ,गडकोटांची वाट तुडविताना, दुर्गयात्रींना - पर्यटकांना तसेच फिरस्त्यांना
गणेशाच्या विविध रूपांचे दर्शन होतच असते.तसं पाहिलं तर संघर्षाच्या -युद्धाच्या
काळात बहुतांशी गडकिल्ल्यांवर तसेच पायथ्याच्या गावात गणेशाच्या रूपानं एक
अधिष्ठान गरजेचे असायचेच.विघ्न दूर करणाऱ्या गणेशाचे दर्शन अनेक जण संकटात घेतंच
असतात.अश्याच आडवाटेवरच्या तसेच दुर्गम भागातल्या काही गणेशाची तसेच त्यांच्या
प्रतिमांचीही सफर करून घेऊ यात....
गणपती गडद
ठाणे
जिल्ह्याच्या पूर्वेला आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला खेटून असणाऱ्या सह्याद्रीच्या
डोंगर-रांगांतील दुर्ग धाकोबा किल्ल्याच्या कुशीत गणपती गडद नावाची लेणी कोरलेली
आहे.नावातच गणेशाचं अस्तित्व घेऊन असलेली हि लेणी आपली उत्सुकता चाळविल्याशिवाय
राहत नाही.नाणे आणि दाऱ्या अश्या दोन प्राचीन घाटवाटा,जीवधन किल्ला आणि दुर्ग धाकोबा अश्या इतिहासाने नटलेल्या भूगोलाच्या परिघात
गणपती गदाडाचे सौंदर्य आणखी फुललेले आहे.माळशेज घाटाच्या ठाणे जिल्ह्याच्या बाजूने
एक फाटा मुबाद तालुक्याच्या पळू-सोनावणे गावात जातो.या गावातूनच वाटाड्या घेऊन या
लेणीकडे कूच करायचे.साधारण दोन तासांची खड्या
चढाईनंतर आपण या लेण्यांपाशी येतो.आडव्या कोरलेल्या या समूहात एकूण सात
लेणी आहेत.यातली मुख्य लेणी हि दुमजली असून तीव्र जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या
आहेत.या लेणीच्या प्रवेशद्वारपट्टीवर मधोमध गणेशाची अतिशय सुरेख प्रतिमा कोरलेली
आहे.या प्रतिमेवरूनच या लेण्यांना गणपती गडद असे नाव पडले आहे.लेण्यांमध्ये अतिशय
दुर्मिळ असलेली गणेशाची हि प्रतिमा आवर्जून पाहावी अशीच आहे.
बागलाणच्या
मुल्हेर किल्ल्यावरील गणेश मंदिर
महाराष्ट्र-गुजरात
सीमेवर असणा-या नाशिकमधील बागलाण प्रांतातला ‘मुल्हेर’ किल्ला माहीत नाही असा अस्सल दुर्गप्रेमी अथवा इतिहासप्रेमी सापडणं तसं
दुर्मीळचं! मुल्हेर त्याच्या दुर्गमतेने आणि प्राचीन इतिहासाने जेवढा ओळखला जातो, तेवढाच तो त्याच्यावर असणा-या सोमेश्वर आणि गणेश मंदिरानेसुद्धा ओळखला जातो.
ही गोष्ट फारच कमी जणांना माहीत आहे.एव्हढेच नव्हे तर एखाद्या गड-किल्ल्यावरील
गणेशाचं हे मोठ्या मंदिरापैकी एक असावं हे
निश्चितच. पायथ्याच्या धनगरवाड्यापासून साधारण पाऊण तासातच गडाचे तीन दरवाजे पार
करून आपण मुल्हेर माचीवर हजर होतो . अन्
समोर पाहिलं कि बांधीव तलावातल्या पाण्यात
उमटलेलं स्वत:चंच रूप पाहत दंग असलेलं गणेश मंदिर मोठय़ा दिमाखात दिसत. मंदिराच्या
सभामंडपात तीन कमानीची तीन दालनं आणि त्यावर नक्षीकाम केलेलं दिसतं. साधारण
मध्ययुगात उभारलेलं हे मंदिर पाहणं हा आपल्यासाठी
खरोखरच आनंदाचा क्षण तसं पाहिलं तर गड-किल्ल्यांवर गणेश मंदिरं तशी
फारशी दिसत नाही. कित्येक मंदिरांची पडझड, दुरवस्था झालेली आहे.
यातील बहुतांशी ही दुर्लक्षामुळे जास्तच
मोडकळीला आली आहे. त्यामानाने इथले गणेश
मंदिर हे तत्कालीन स्थापत्यशास्त्राने
चिंब भिजलेले आहे.
पेबचा कड्यावरील
गणपती
माथेरान हे नाव
महाराष्ट्रातील लोकांना माहित नाही असे होणार नाही.याच माथेरान मध्ये पेबचा प्रसिद्ध
किल्ला आहे.याच पेबच्या जवळ प्रसिद्ध असा कड्यावरचा गणपती आवर्जून पाहावा असाच
आहे.पेबला येण्यासाठी सर्वप्रथम नेरळला यावे लागते.येथे आलो की थेट माथेरानचा
रास्ता पकडायचा.घाट रास्ता चढून गेलो कि आपल्याला वॉटर पाईप नावाचे स्टेशन
लागते.माथेरानच्या प्रसिद्ध अश्या मिनी ट्रेनचे हे मिनी स्टेशन.या ठिकाणापासूनच
पेब किल्ल्याकडे एक पायवाट जाते.हे ठिकाण समजण्यासाठी आणखी एक मोठी खूण म्हणजे
"कड्यावरचा गणपती कडे" हि स्थल दर्शविणारी पाटी.एकदा का हि वाट समजली कि
मग रेल्वे ट्रकच्या कडेकडेनेच चालत निघायचे.उजव्या बाजूला दरी,डाव्या बाजूला डोंगराची भिंत आणि यामधूनच
गेलेला रेल्वे ट्रॅक अश्या आकर्षक
पायवाटेवरून आपली वाटचाल चालू असते.तासाभरातच आपण एक कमानीपाशी पोहोचतो.या
कमानीपासून आणखी थोडे पुढे जायचे आणि दुसऱ्या कमानीपाशी येऊन थांबायचे आणि उजव्या
बाजूला असणाऱ्या आश्चर्याकडे पाहायचे.या बाजूला डोंगराच्या सुळक्याला गणपतीचा आकार
प्राप्त झालाय. दगडाच्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण आकाराला अगदी आकर्षकपणे रंगवलं
सुद्धा आहे.येथून फार सुंदर दर्शन होते या आकाराचे. अगदीच या कड्यावरचा गणपतीच्या
पायापाशी जायचे असेल तर पहिल्या कमानीपासून खाली एक वाट खाली गेली आहे.
दातेगडावरील
महागणपती
सातारा
जिल्ह्यातील पाटण तालुक्यात पाटण जवळ दातेगड
किल्ला वसलेला आहे. यालाच सुंदरगड असे दुसरे नाव .पाटणपासून केवळ सहा
किलोमीटर अंतरावर हा गड आहे. गडापर्यंत पोहोचण्यासाठी कराड-कोयनानगर मार्गावरील
पाटण गाठावं लागतं.गावातून चाफोली रोड जातो, त्या रस्त्यानं १५ मिनिटं चालल्यानंतर डाव्या बाजूलाच लाल
मातीची मळलेली पायवाट दिसते. या पायवाटेनं थोडं पुढं गेल्यावर दातेगडावरून उतरत
आलेल्या डोंगरधारेस भिडायचं.येथूनच गडावर पंधरा मिनिटेच पोहोचतो. या गडावर
तलवारीचा आकार असलेली भव्य विहीर आहे. तलवार विहिरीपासून जवळच अखंड खडकात
खोदलेली गणपती आणि मारुतीच्या सुंदर
मुर्त्या आहेत.पाहताक्षणीच स्तब्ध व्हावं असं या मूर्तीचं शिल्पकाम आहे.गणपतीची तर
हि सर्व गड-किल्ल्यावर असणाऱ्या मुर्त्यांपैकी बहुधा सर्वात मोठी आणि सुस्थितीत
अशी मूर्ती असावी.. या मूर्तींपाशी जाण्यासाठी काही पायऱ्या उतरून जाव्या लागतात.
चौकोनी आकाराच्या खोदकामात दक्षिणाभिमुख गणपती ची
मूर्ती दिसते. नऊ फुटाच्या कमानींमध्ये साधारण सहा फूट उंच असलेल्या या
मूर्तीचे कान जास्वंदाच्या आकाराचे आहेत.हि मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड हि
उजव्या बाजूला आहे.मूर्ती चतुर्भुज असून मागील हातांमध्ये परशु आणि अंकुश आहेत.या
मूर्तीचे वैशिष्ट्य असं, की सूर्योदयाला सूर्यकिरणं थेट गणपतीच्या
मूर्तीवर पडतात.
धावडशीतला
गणेश
सातारा
जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील धावडशी हे
नाव देखील बऱ्याच लोकांना माहितीदेखील नाही. सातारवासी आणि काही मोजके पर्यटक सोडले तर हे नाव तसं
अपरिचितच.. पण इतिहास -धार्मिकते आणि वास्तुस्थापत्याच्या
चष्म्याने जर बघितलं तर या गावाचं महत्त्व कैकपटींनी जास्त आहे हे लक्षात
येईल. जावळी तालुक्यात असणार धावडशी
पर्यटकांच्या आणि भक्तांच्या मनात कितीतरी वर्षे घर करून राहील आहे.सोळाव्या शतकात
महाराष्ट्राच्या या महान भूमीत अनेक योगपुरुष आणि संत होऊन गेले.या सर्वांनी
महाराष्ट्राची सांस्कृतिक-धार्मिक आणि सामाजिक वैचारिक मशागत केली.त्यापैकीच एक
योगी म्हणजे ब्रम्हेन्द्रस्वामी धावडशीकर.महाराष्ट्राच्या विस्मृतीत गेलेले पण
त्यांच्या भक्तांनी हृदयात विराजमान केलेलें सिद्धयोगी पुरुष म्हणजे
ब्रम्हेन्द्रस्वामी.त्यांच्या
समाधीस्थानावर छत्रपती शाहूंनी अप्रतिम मंदिर बांधले.वास्तुस्थापत्यात उजवे
असलेले हे मंदिर पाहणे हा एक आनंदयोग ठराव इतकी यात कलाकुसर ओतली आहे. मंदिराची
रचना खूपच आकर्षक आहे.याच्या सभामंडपात
प्रवेश करायचा .हा सभामंडप लाकडी असून तो नंतरच्या काळात उभारलेला दिसतो.या
सभांडपातून आपण मूळ मंदिराच्या समोर येतो.येथून पुन्हा आतमध्ये शिरायचे.हा पूर्वीचा सभामंडप.यातील
प्रकाश येण्यासाठी दगडी जाळ्यांच्या खिडक्या ह्या पाहण्यासारख्या.यामध्येच गणेशाची
आणि डाव्या बाजूला अष्टभुजा देवीची मूर्ती दिसते.गणेशाची दगडी पाषाणात घडवलेली आणि
आता रंगरंगोटी केलेली मूर्ती जबरदस्तच.चतुर्भुज असलेली आणि कमरेभोवती नाग असलेली
हि सुस्थितीतली मूर्ती आवर्जून पाहावी.
पाटेश्वराच्या
शिवपिंडींमधील गणेशमूर्ती
भक्ती आणि निसर्ग यांचा सुरेख संगम जर कुठे
पाहायचा असेल, तर पाटेश्वरच्या
ठिकाणाशिवाय दुसरा पर्याय होऊच शकत नाही. अगदी कुटुंबासहित तुम्ही या ठिकाणी जाऊ
शकता. तसं पाहिलं तर साता-याजवळील हा सारा मुलुखच डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.साता-यावरूनच
रहीमतपूर फाटय़ामार्गे देगांव आणि थेट पाटेश्वर डोंगराकडेच निघायचे. स्वत:ची जर
गाडी असेल, तर आपण अर्ध्या
डोंगरापर्यंत जाऊ शकतो. जेथे डांबरी सडक संपते तेथेच आपल्या गाडय़ा लावायच्या.
येथूनच एक ठसठशीत पायवाट थेट डोंगरमाथ्याकडे जाते. पाय-यांच्या सुरुवातीलाच
गणेशाची फारच सुबक मूर्ती कोरलेली आहे. येथून आपण अध्र्या तासातच पाटेश्वरच्या
लेण्यांकडे जाते.मुळात पाटेश्वर प्रसिद्ध आहे ते आपण कधीही न पाहिलेलं, शिवपिंडींचं वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकाराच्या शिवपिंडींसाठी.हे शिवपिंडीचं साम्राज्य नवख्या
माणसाला अक्षरश: श्वास रोखून धरायला लावते. याच ठिकाणी आपल्याला वेगळीच गणेशमूर्ती
पाहायला मिळते.शेंदूर लावलेल्या या मूर्तीच्या शेजारी दोन्ही बाजूंस एक-एक स्त्री
कोरलेली दिसून येते.गणेशाच्या उजव्या बाजूच्या स्त्रीच्या हातात चवरी आणि चक्र
आहे.तर डाव्या बाजूच्या स्त्रीच्या हातात चवरी तर एक हात कमरेवर आहे.काहींच्या मते
या दोन स्त्रिया गणपतीच्या दासी आहेत तर काहींच्या मते या रिद्धी-सिद्धी
आहेत.विशेष म्हणजे गणपतीची मूर्तीही आराम करतानाच्या अवस्थेत आहे.
हडसर वरील
गणेशमूर्ती
हडसर जुन्नरपासून
१२ किलोमीटरवर! जुन्नरजवळ साकारलेल्या माणिकडोह धरणावरून नाणेघाटाच्या दिशेने
अंजनावळे, घाटघर गावाकडे एक रस्ता
जातो. या रस्त्यावरच हडसर गावाच्या डोक्यावर हा सुंदर किल्ला आहे. मुळात हडसर हा ओळखला जातो त्यावरील
कातळातच पायऱ्या खोदून तयार केलेला मार्ग,
कातळाचेच कठडे,
कातळात खोदून काढलेली दोन
अत्यंत रेखीव प्रवेशद्वारे, त्यावरच्या कमानी
, बुरुज, पहारेकऱ्यांच्या खोल्या हि दारी खोदकामातील कलांसाठी.याच ठिकाणी
गडमाथ्यावर तळय़ाच्या पुढेच पुढे काही
अंतरावरच महादेवाचे एक मंदिर आहे. या महादेवाच्या
मंदिरात आपल्याला एका बाजूला गणेशाची अतिशय रेखीव मूर्ती पाहायला मिळते.आजही
हि मूर्ती अतिशय सुस्थित असून हि मूर्ती चतुर्भुज आहे. मागील दोन हातात शस्त्रे
आहेत तसेच डोक्यावर नागाचे शिल्पही दिसते.आवर्जून पाहावी अशी हि मूर्ती आहे.
सिद्धेश्वर मंदिर
आहुपे
आहुपे घाट हे
अत्यंत रमणीय ठिकाण, निसर्गाची उधळण,
आजूबाजूला डोंगरदरी, जवळच गर्द अशी देवराई, आणि इतकं असूनही पर्यटक काय माणसांची पण वर्दळ अजिबात नाही
असं हे ठिकाण म्हणजे आहुपे. घाटमाथ्यावरून कोकणात उतरणारे जे अनेक प्राचीन
घाटरस्ते आहेत त्यातलाच आहुपे घाट हा
प्राचीन.पुणे जिल्ह्यातील
मंचर-घोडेगाव-डिंभे वरून आहुपे हे साधारण ५० कि. मी. अंतर आहे. रस्ता वळणावळणाचा. डावीकडे
डिंभे जलाशय कायम सोबतीला असतोच. या गावाच्या अगदी अलीकडे आहे वचपे गावचे प्राचीन
सिद्धेश्वर मंदिर महादेवाचे.असं म्हणतात कि हे मंदिर शिलाहारराजा झंझ याने नदीच्या
उगमस्थानी बांधले.कालौघात डिंभे धरणाखाली
हे मंदिर बुडाले.पण हे सिद्धेश्वराचे
शिल्पमंदिर गावक ऱ्यांनी मोठय़ा मेहनतीने जलाशयाच्या काठावर आणून वसविलेले आहे. याच मंदिरात गणेशाची अप्रतिम
मूर्ती ठेवलेली दिसते.मूर्तीला शेंदूर फासलेला दिसून येतो.तसेच कमरेला नागाचा
विळखाही पडलेला आहे.या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीचे कान हे
जास्वंदीसारखे दिसतात.
पिंगळसईतील
पेशवेकालीन गणेशमंदिर
रायगड जिल्हयातील
रोहा तालुक्यात असणारा अवचितगड हा तसा बऱ्यापैकी सर्व दुर्गयात्रींना परिचित
आहे.या अवचितगडावर जाणेसाठी पायथ्याच्या पिंगळसई गावातून एक वाट जाते.पिंगळसई या
गावाचे वैशिष्ट्य येथेच संपत नाही तर या गावात अतिशय देखणे आणि कलाकुसर यांनी
नटलेले पेशवेकालीन गणेश मंदिर आहे.मंदिराची बांधणी हि संपूर्ण दगडात झाली असून
मंदिराचा कळस तर अतिशय देखणा आहे.सभामंडप आणि गाभारा अशी याची रचना असून
गाभाऱ्यातील बैठ्या स्वरूपाची गणेश मूर्ती आपल्या डोळ्यांचे पारणेच फेडते.
पूर्व प्रकाशित साप्ताहिक लोकप्रभा









मस्तच
ReplyDeleteखुप छान माहिती
ReplyDelete