ऐतिहासिक तळेगावच्या पाऊलखुणा
पेन्शनरांच शहर , पुणे-मुंबई या दोन शहरांमधलं एक महत्वाचं मध्यवर्ती ठिकाण, पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांना इनामात मिळालेलं गाव. अशी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असणाऱ्या तळेगावची ओळख बहुसंख्यांना आहे. नव्याने विकसित होऊ घातलेली औद्योगिक वसाहत, शैक्षणिक संकुले. यामुळे जुन्या तळेगावच रूप झपाट्याने पालटू लागलं आहे. एकेकाळी इतिहासात प्रसिद्ध असलेलं हे गाव आता शहरीकरणाकडे वेगाने वाटचाल करू लागले आहे. तरीपण येथील काही ठिकाणे आणि स्थान मात्र अजूनही जुन्या काळाची साक्ष देत उभी आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने अथवा मुंबई-बेंगळूरु जुन्या रस्ते महामार्गाने तळेगाव हे गाव लागते. पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर तळेगाव स्थानक आहे.
देखणा “बामणडोह”
तळेगावात काही ऐतिहासिक वस्तू आपल्याला दिसतात.
यातलीच एक सुंदर आणि सुरेख वस्तू म्हणजे एक अदभूत विहीर. हिलाच स्थानिक भाषेत
“बामणडोह” म्हटलं जात. पुर्वी विशिष्ट
समुदायांना सरदारांकडून अथवा राजांकडून
विहिरी बांधून दिल्या जात असत. अशीच एक विहीर तळेगावात स्मशान भूमी शेजारी बांधून
दिली गेली. ब्राम्हण समुदायाला अथवा वस्तीला
बांधून दिलेल्या या विहिरीला “बामणडोह” असे नाव पडले, असे अनेक इतिहास
अभ्यासक सांगतात. तर अशा विहिरी या राजस्रीयांच्या स्नानासाठी बांधल्या जात असत
असही काही अभ्यासकांच मत आहे. कारण काहीही असो, पण अशा विहिरी असतात मात्र सुरेख !
| शिवलिंगाच्या आकाराची विहीर-- बामणडोह |
गोल-गोल
किंवा चौकांनी अशा आकाराच्या या विहिरींभोवती इतिहासच वलय तर असतच पण या विहिरींना
स्थापत्याच अनोख कोंदणही लाभलेलं असत. तर कधी-कधी या विहिरींना गूढरम्य आश्चर्याची
किनारही चिकटलेली असते. खाली विहिरींच्या पोटात गारवाही सुखाने नांदत असतो. अशा गारव्याचा निवांत अनुभव
घेण्यासाठी खास बसण्यासाठी जागाही बांधलेली
असते, त्यामुळेच या अशा विहिरी जणूकाही “ जालवास्तुच” भासतात. एखाद्या निवांत
क्षणी याव अन ही जलवास्तू अनुभवाव असंच काही. अगदी याच प्रकारात ही “बामणडोह”
मोडते.
साधारण
शिवलिंगाच्या आकाराची ही विहीर संपूर्ण दगडातच बांधलेली दिसते. पूर्वेकडून या
विहिरीत खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आपल्याला विहिरीच्या अंतरंगात घेऊन जातात.
साधारण मध्यभागी गेलो की, मग आश्चर्याचा आणखी एक धक्का आपल्याला बसतो. तो म्हणजे
या विहिरीभोवती आतमध्ये फिरण्यासाठी
गावाक्षांचा सुंदर अर्धवर्तुळाकार मार्ग
म्हणजे हॅटस ऑफ! दगडात घडवलेल्या पाच कमानींचा
असलेल्या हा मार्ग विहिरींच अंतरंग सुरेख
उलगडून दाखवतो .येथे बराच वेळ रेंगाळल तरी मन भरत नाही. करण अशी सुंदर
कलाकृतीने घडवलेली विहीर बघायची सवय आपल्याला नसते आणि येथे तर स्थापत्याचाही
अविष्कार जोडलेला आहे. विहिरीतुंन बाहेर
आलो की मग वरच्या बाजूस मोटेच्या धक्क्यापाशी यायचे. विहिरीतले पाणी उपसण्यासाठी
अशी बांधकामे ही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी विहिरीकाठी आढळतात. शेतीसाठी लागणारे
पाणीसुद्धा या मोटेतून पुरवले जाई. हे सारे बारीक-सारीक तपशील पाहिले पाहिजे तरच
अशा वास्तू बघण्यात मजा आहे. कारण अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनच विहीरीच सौंदर्य अनुभवण्यात जास्त
आनंद आहे.
| विहिरीचे गवाक्ष |
घुमटाची विहीर :-
पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडेंच्या काळात निर्मिली गेलेली आणि वास्तुस्थापत्याचा सुंदर अविष्कार असलेली हि विहीर खरतर पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित का राहिली याच आश्चर्यच वाटत.विहिरीजवळच असणाऱ्या घुमटासारख्या वास्तुमुळे ह्या विहिरीचं नाव "घुमटाची विहीर" असं झालं असं अभ्यासकांचे मत आहे.विहिरीचं बांधकाम घडीव दगडातच झालेलं आहे.विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग दिसतो.या विहिरीच्या आतील बाजूस मध्यभागी एक धक्का बांधलेला दिसतो.या विहिरीतच मध्यभागी दोन कमानी बांधलेल्या दिसतात. यावर शिलालेखही कोरलेला आहे.या विहिरीवर दोन मोटी चालायच्या. त्यांचे धक्केही दिसतात. इतिहासकारांच्या मते या मोटीद्वारे पाणी शेतीला पुरवले जाई. विहिरीच्या आत छोटे शिवमंदिर देखील आहे. एका विहिरीच्या बांधणीत किती मुद्दे विचारात घेतले आहेत हे पाहून आपण स्तंभित होतो.हि विहीर पाहण्यासाठी तळेगावमधील जोशीवाडी कवळील विठ्ठल मंदिराजवळ गाड्या लावायच्या आणि चालत या विहिरीपाशी जायचे. रेल्वे ट्रॅकजवळच हि विहीर आहे.
| घुमटाची विहीर |
| विहिरीच्या भिंतीवर असणारा शिलालेख |
| जमिनीच्या समतल असणारी विहीर |
| विहिरीच्या बाजूस असणाऱ्या मंदिरातील शिल्प |
“बनेश्वर मंदिर”
बनेश्वर
या नावाच आणखी एक मंदिर मुंबई-बेंगरूळ महामार्गावर नसरापूर (जि.पुणे) येथे पहायला मिळते. पण
प्रस्तुत लेखातलं बनेश्वर मंदिर म्हणजे सरदार दाभाडे यांच्या काळात अठराव्या शतकात
उभारले गेलेलं. त्यामुळेच या मंदिराला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहे.
मंदिराच्या अगोदरच उजव्या बाजूस इतिहासाची सोनेरी पाने दिसायला सुरुवात होते. यातलंच एक सोनेरी पान म्हणजे पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांची समाधी. पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांच्या पत्नी असलेल्या याच उमाबाईनी १७३२ साली खान ए खान जोरावर खान बाबी याचा गुजरातेत जाऊन पराभव केला. एका महिला योद्ध्याची ही अतुलनीय कामगिरी पाहून छत्रपती शाहू महाराजांनी उमाबाईना सोन्याचे तोडे, रत्नजडीत तलवार व मानाची वस्त्रे देऊन सन्मानित केले. या अशा योद्ध्याची समाधी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच दिसते. या समाधीला वंदन करून आपण बनेश्वरच्या आवारात पाउल टाकायचे. गर्द झाडीत असलेल्या बनेश्वराच राउळ आता उलगडायला लागते.
| सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे यांची समाधी |
छोटे
बांधीव तळे (काही अभ्यासक याला पुष्कर्णी देखील म्हणतात ) नंदिमंडप, सभामंडप व
गाभारा अशी या मंदिराची ढोबळ रचना आहे. या तळ्यावर पाणी उपसणाऱ्या मोटीसाठीची जागाही दिसून येते.
या तळ्यातील पाणी शेतीसाठी बहुधा वापरले जात असण्याची शक्यता आहे. परंतु नंतरच्या
काळात यातलं पाणी वापरण्याजोगे नसल्यामुळे या तळ्याला ‘नासके तळे’ असही म्हटलं
जायचं. या तळ्यात उतरण्यासाठी चहूबाजूंनी पायऱ्या देखील बांधलेल्या दिसतात. हे तळे पाहून झाले की मग येतो नदीमंडप.
चार खांबांवर उभा असलेला हा संपूर्ण दगडात उभारला आहे. हा नंदिमंडप मुख्य मंदिराला
न जोडता तो काहीसा अंतरावर उभारला आहे. यातील नंदीची मूर्ती तर त्याहूनही देखणी.
रिवाजाप्रमाणे नंदीवर माथा टेकवून पूर्वाभिमुख असलेल्या बनेश्वर
मंदिराच्या सभा मंडपात प्रवेश करायचा. संपूर्ण
दगडात उभारल्या गेलेल्या या मंदिराची स्थापत्य रचना खूपच आकर्षक आहे.
सभामंडपात एकूण १६ खांब असून यातील १२ खांब हे दगडी भिंतीत आणि प्रवेशदार यांच्या
बांधणीत सामावलेले दिसतातव उरलेले ४ खांब हे मधोमध पूर्णाकृती आहे. खांबावर विशेष
नक्षीकाम जरी नसले तरी या खांबांना दिलेले चौकोनी आणि गोलाकार आकार मात्र
पाहण्यासारखे आहे. सभा मंडपातील गाभाऱ्याच्या साठी असलेल्या प्रवेशदाराशेजारी दोन
कोनाडी दिसतात. यामध्ये गणेश आणि हनुमानाच्या मुर्त्या ठेवलेल्या दिसतात.
सभामंडपांपासून छोट्याशा प्रवेशदारातून आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो. आतमध्ये खूपच
सुंदर शिवपिंडी आहे. गाभाऱ्यातील धीरगंभीर वातावरण व थंडावा आवर्जून अनुभवावा असाच
आहे. शिवपिंडीवर माथा टेकवूनमग फेरीसाठी बाहेर यायचे. मंदिराच्या सभोवताली खूप
झाडी असुन मंदिराशेजारीच सरदार खंडेराव दाभाडे यांची समाधीही दिसते. मंदिराच्या
गाभाऱ्यावर कळस अजूनही सुस्थितीत दिसतो. एकंदरीतच मंदिराच्या बांधकामावर मराठेशाही
वास्तूस्थापत्याचा पगडा दिसून येतो. महाशिवरात्री आणि श्रावणात येथील पंचक्रोशीतून
अनेक भाविक दर्शनासाठी येथे येत असतात.
| सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची समाधी |
| मंदिरासमोरील तळे |
| दगडी बांधणीचे मंदिर |
आगळ-वेगळ “पाच
पांडव मंदिर”
“पाच पांडव मंदिर”! हे नाव ऐकून आपण दचकतो. कारण गणपती, मारुती,
विठोबा, रामराया, भवानी माता अशा मंदिरांची नाव ऐकायची सवय आपल्याला असते आणि त्यातच असं कधीही
न ऐकलेल्या मंदिराच नाव समोर येते. तेही पाच पांडवांच्या मंदिराच. या
मंदिराच्या उल्लेखाने डोळे चमकतात. पण खरतरं या पाच पांडव मंदिरांच वैशिष्ट्य
येथेच संपत नाही. कारण हे मंदिर संपूर्ण
भारतातील दुसरे आणि महाराष्ट्रातील एकमेव मंदिर
असल्याची माहिती मिळते अन आपण आणखीनच सर्द होतो. सभोवतालचीअनेक बुजुर्ग
किंवा ऐंशीपार असलेली वृद्ध मंडळी पांडवांच्या काळात पांडवांनीच निर्माण केलेल्या
मंदिरांची, लेण्यांची आख्यायिका आपल्याला
सांगत असतात आणि बहुतेक वेळा अशी ठिकाणे आपण
पाहून देखील आलेली असतो. पण येथे मात्र
गोष्ट अगदी उलट दिसते. ती म्हणजे खुद्द पांडवांचच मंदिर बांधलं गेलंय.
त्यामुळेच ते मंदिर कधी एकदा पाहतो असं होतं. आणि याच ओढीने आपला मोर्चा या
मंदिराकडे वळला जातो.
तळेगावला
येण्यासाठी लोहमार्ग आणि रस्ते महामार्ग असे दोन्हीही पर्याय उपलब्ध आहे. या
दोन्हीपैकी कुठल्याही मार्गाने तळेगावला आलो की. थेट चावडी चौक गाठायचा. या
चावडीच्या मागेच नागरीवस्तीत सामावलेलं छोटेखानी मंदिर नजरेस पडत. एका दगडी
चौथ्यावर उभं असलेलं मंदिर जेव्हा आपण पाहतो तेव्हा मंदिराची उत्सुकता आणखीनच
ताणून धरली जाते. मंदिराच्या पाच-सहा पायऱ्या
चढून आपण आतमध्ये प्रवेश करायचा अन समोर दिसणाऱ्या पाच पांडवांच्या
मुर्त्या पाहून स्तब्धच व्हायचे. साधारण साडेचार फुट उंचीच्या बैठ्या अवस्थेत
असलेल्या पाच पांडवांच्या मुर्त्या एकाशेजारी एक अशा एका ओळीत आहेत. डाव्या बाजूने
सुरुवात केल्यास धर्मराज युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकूल,सहदेव अशा या मुर्त्या
पहिल्या खोलीत आहे. धर्मराज युधिष्ठिर आणि भीम या दोन मूर्त्यांच्या मधोमध भिंतीला
एक छोटीशी खिडकी दिसते. याच खिडकीतून आपल्याला द्रौपदीचे दर्शन होते. पण ही मूर्ती
पूर्णपणे पाहण्यासाठी आपल्याला आतल्या खोलीत जावे लागते. आत गेलो की, एका छोट्याशा
चौथऱ्यावर द्रोपदी एका कुशीवर नीजलेल्या अवस्थेत दिसून येते. पुर्वी या द्रौपदी
विषयी आख्यायिका अशी सांगितली जायची की, ही दर सहा महिन्यांनी कूस बदलते
वैगेरे...वैगेरे... पण शेवटी ही
आख्यायिकाच! पण अशा आख्यायिकाच या आगळ्यावेगळ्या मंदिराच वेगळेपण जपत रचल्या
गेलेल्या असतं. याच नव्हे तर यासारख्या अनेक आख्यायिका येथे ऐकविल्या जातात. त्या
म्हणजे पाच पांडव वनवासात असताना तळेगावी आले.
तेव्हा द्रौपदी ही दमल्यामुळे तिने काही काळ विश्रांती घेतली. ते ठिकाण
म्हणजेच हे मंदिर. तर काही जण असेही सांगतात की. खुद्द पांडवांनीच हे मंदिर
बांधले. आपणही अशा आख्यायिका मनापासूनच ऐकायच्या. अन या आगळ्यावेगळ्या मंदिराच्या
दर्शना नंतर माघारी वळायचे.
| पाच पांडवांच्या मुर्त्या |
| पाच पांडव मंदिर |




छान
ReplyDeleteखुप छान माहिती मिळाली👍👍👍👌👌👌
ReplyDeleteसंपुर्ण तळेगांव दाभाडे फिरण्याचं आनंद लाभला.... वाचुन...
ReplyDeleteअप्रतिम 👍👍
खूप छान वाटले....after 30years...
ReplyDeleteखूप छान दिसते आहे, लवकरच भेट देईन
ReplyDeleteछान 👌
ReplyDelete