गौताळा अभयारण्याचे अंतरंग
सह्याद्रीच्या कुशीत असलेली जंगले-अभयारण्ये हा डोंगरभटक्यांचा आवडता विषय असतो.केवळ डोंगर भटकेच जंगलाच्या वाटेवर येतात असे नाही तर अरण्य वाचनाची आवड असणारे,पशु पक्षी निरीक्षण करणारे ,जीवसृष्टीचा अभ्यास करणारे,जंगल वाटांवर चालताना आनंद वेचणारे, अनेक जण तुम्हाला येथे भेटतील.याला कारणच तसं आहे.सिमेंटच्या शहरांपेक्षा अभयारण्याला किंवा जंगलाला स्वतःचे असे वेगळे विश्व असते.डोंगरांनी वेढलेल्या या अश्या गर्द रानात माणसांची नेहमी होणारी घुसखोरी सोडली तर प्रत्येक सजीव घटक स्वतःच्या मर्यादेत आणि कक्षेत राहूनच इथल्या नियमांचे काटेकोर पालन करीत असतो.त्यामुळेच जंगल अतिशय शिस्तबद्ध अश्या चौकटीतच बांधलेले दिसते.जंगलाचा अविभाज्य भाग असणाऱ्या येथल्या प्रत्येक घटकाचे खास असे वैशिष्ट्य असते.आणि ते अनुभवताना मिळणार आनंद हा शब्दांचाही पलीकडे असतो.येथल्या नद्या-ओढे-धबधबे-रानवाटा-सरपटणारे जीव-पशु-पक्ष्यांचे विविध आवाज व त्यांचे ठसे-रानात दळवळणारा सुगंध...हे सारं काही जवळून आणि शांततेत अनुभवायचे असेल तर जंगलाशिवाय पर्याय नाही.
एकदा का तुमचे पाऊल या
अरण्यात पडलं कि मग नेहमीच्या शहरातल्या कृत्रिम श्वासांच्या कुबड्या भिरकावून
रानातला-जंगलातला तो अरण्यगंध मनात साठविण्यासाठी तुमची कायमच धडपड होत राहील इतकी ऊर्जा येथल्या निसर्गात ठासून भरलेली आहे. ऑफिस मधल्या चकचकीत टाईल्स किंवा मऊ कार्पेटवर चालण्यापेक्षा
रानवाटांवर पडलेला पालापाचोळा तुडवण्याची मजा शब्दात नाही सांगता येणार.यासाठी एक दिवस तरी उनाड हवाच.कोयनेचे,चांदोलीचे ,राधानगरी,भीमाशंकर,कळसुबाई-रतनगड
येथली अभयारण्ये हि अशीच दर्दी भटक्यांची आवडीची ठिकाणे.अंगाची लाही लाही करणारा
उन्हाळा असो व धो-धो बरसणारा पाऊस असो व कडाक्याच्या थंडीतले धुक्याचे दिवस
असो..प्रत्येक ऋतूत, प्रत्येक भेटीत
येथले निराळं रूप भासत आलंय.उन्हाळ्यात हि जंगले सूर्याची किरणेही जमिनीला
स्पर्शून देत नाही.याच दिवसातल्या पानझडीच्या काळात रानवांवर पडलेल्या-सुकलेल्या
पानांवर चालतानाच्या आवाजाला तर कशाचीही सर येणार नाही.पावसाळ्याच्या ऋतूत तर साऱ्याच रानवाटा भिजलेल्या असतात.हिरवेगार
झालेलं जंगलाचं रूप मात्र वेड लावणारे असते.या काळात प्रत्येक घटक आणि घटक जागृत
झालेला असतो.यांचं जीवनचक्र या काळात आवर्जून अभ्यासावं .झाडावर पडलेल्या
पावसाच्या थेंबांचा आवाज हा संगीतासारखाच भासतो.हिवाळ्याची बातच और !गुलाबी थंडीत
जंगलाच्या वाटा तुडविणे म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभूतीच.एकंदरीत काय ऋतू कुठलाही
असो.जंगलाचं हे गूढ विश्व तुम्हाला कायमच खुणावत असत...
| गौताळा अभयारण्य |
...तर सांगायचा मुद्दा हा कि जंगल भटकंतीच्या यादीत आणखी एक
पान जोडलं गेलंय.ते म्हणजे गौताळा अभयारण्याचे ! खरं तर हे अभयारण्य म्हणजे आपल्या
महाराष्ट्राचा अनमोल ठेवाच आहे.महाराष्ट्राची अजिंठा -वेरूळ नावाची कलेची सौंदर्य पीठे ज्या
जिल्ह्यात निर्मिली त्याच जिल्ह्यात या गौताळा अभयारण्याचा काही भाग येतो .तसं
पाहिलं तर हे अभयारण्य औरंगाबाद-जळगाव-नाशिक अश्या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसले
आहे.विविध प्रजातींचे वृक्षे , प्राणी आणि
पक्ष्यांचा अधिवास असलेले २६१ चौ. किमीचे हे क्षेत्र महाराष्ट्र सरकारने २५
फेब्रुवारी १९८६ रोजी अभयारण्य म्हणून घोषित केले. हे अभयारण्य औरंगाबाद
जिल्ह्यातील कन्नड गावापासून १५ किलोमीटरवर तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावपासून
साधारण २० किलोमीटरवर आहे. सह्याद्रीच्या मुख्य धारेपासून अजिंठा नावाची उपरांग
नाशिक-जळगाव-औरंगाबाद असा प्रवास करते.याच रांगेच्या कुशीत हे अभयारण्य
वसलंय.पर्यटक वनविभागाच्या चेकपोस्टवरून
आत प्रवेश करू शकतात.गौताळा अभयारण्यात बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या
आहेत.त्यांचीच ओळख करून घेऊ यात.
पाटणादेवीचे मंदिर
| पाटणादेवीच्या मंदिराचे अवशेष |
| पाटणा देवीचे मंदिर |
| पाटणादेवीच्या मंदिराचे अवशेष |
पाटणादेवीचे प्राचीन मंदिर स्थानिकांमध्ये विशेष प्रसिद्ध
आहे.या मंदिराच्या दर्शनासाठी अनेक भाविक येथे येताना दिसतात.किंबहुना येथे येणारी
बहुतांश पाऊले हि देवींच्या भक्तांचीच असतात.हिला भगवती देवी किंवा चंडिकादेवी
असेही म्हणतात. मंदिर 12 व्या शतकात
उभारले गेल्याचे सांगण्यात येते.मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची भव्य मूर्ती आहे. देवळासमोर दोन
भल्यामोठ्या दगडी दीपमाळा आहेत. मंदिरपरिसरात असलेल्या अनेक प्राचीन शिल्पाकृती
पहाण्यासारख्या आहेत. अप्रतिम मंदिर आणि
त्या पाठीशी असणारा प्रचंड मोठा डोंगर मनाचा ठाव घेतो. पावसाळ्याच्या दिवसात मागच्या डोंगरातून खळाळत वाहणारी नदी त्यावर
असलेला धवलतीर्थ धबधबा हि ठिकाणे पाहण्यासारखी असतात.
| मंदिराशेजारी असणारे पात्र |
गणितज्ज्ञ भास्कराचार्यांची भूमी
![]() |
| थोर गणितज्ज्ञ भास्कराचार्य (फोटो सौजन्य गुगल) |
शून्याचा आविष्कार करणारे आणि थोर गणितज्ज्ञ
भास्कराचार्यांनी आपला लीलावती नामक ग्रंथ येथेच बसून लिहिला होता असा एक शिलालेख भारतीय पुरातत्त्वखात्याला
मिळाला आहे.भास्कराचार्य हे विज्जलबीड गावचे
म्हणजे पाटणा हेच असावे, असा तर्क येथील एका शिलालेखावरून इतिहासकार
लावतात.वनखात्याने पाटणादेवी मंदिराजवळच भास्कराचार्य निसर्ग केंद्र उभारले आहे.
हे केंद्र पर्यटकांसाठी काही विशिष्ट
कालावधीसाठी खुले असते.
हेमाडपंथी महादेव मंदिर
| महादेव मंदिर |
| महादेव मंदिर |
हेमाडपंती महादेवाचे मंदिर म्हणजे गौताळाचा अनमोल ठेवा
आहे.हे मंदिर चाळीसगाव-पाटणादेवी रस्त्यावर असून पाटणादेवीपासून पंधरा मिनिटांच्या
अंतरावर आहे.शब्दानेही थिटे पडावं असं दगडात कोरलेलं हे लावण्य भान हरपून टाकणारे
आहे.दगडी चौथऱ्यावर उभ्या असणाऱ्या या मंदिराची रचना सभामंडप ,अंतराळ कक्ष आणि
गाभारा अशी असून आतमध्ये शिवपिंडी आहे.मंदिराच्या आतील आणि बाहेरील भिंतींवर
असलेली कलाकुसर पाहण्यासारखी आहे.मंदिर ७५ फूट लांब ३६ फूट रुंद व १८ फूट उंच
आहे.मंदिर पूर्वाभिमुख असून
सभामंडपातील भिंतीवर दगडी शिलालेख कोरलेला
दिसून येतो.विशेष म्हणजे मंदिरातील शांतता अनुभवण्यासारखी आहे.
कन्हेरगडाच्या पोटातील लेण्या
| जैन लेणी |
| शृंगार चावडी लेणी |
| लेणी |
प्राचीन संस्कृतीची ओळख सांगणाऱ्या लेण्या येथल्या
डोंगराच्या म्हणजेच हेमाडपंथी महादेव मंदिराच्या मागील बाजूस पोटात दडल्या आहेत.हे बऱ्याच जणांना माहित
देखील नाही.आज भग्नावस्थेत असलेल्या या गुंफा पाहताना त्यांच्या उभारणीसाठी
घडलेल्या इतिहासाची आठवण नक्कीच होते. अश्या या लेण्यांकडे जनतेसाठी आपल्याला
अभयारण्यातील हेमाडपंथी महादेव मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या पायवाटेने जावे
लागते.हीच वाट पुढे कन्हेरगडावर जाते.या वाटेवर नागार्जुन गुंफा(नागार्जुन कोठी) ,सीतेची न्हाणी
लेणी ,शृंगारचौरी(शृंगारचावडी)
लेणी या लेण्या पाहायला मिळतात. आज भग्नावस्थेत असलेल्या या गुंफा पाहताना त्यांच्या
उभारणीसाठी घडलेल्या इतिहासाची आठवण नक्कीच होते. या लेण्या
काहीश्या आडवाटेवर असल्यामुळे शक्यतो वाटाड्या बरोबर घेऊनच पाहाव्यात अन्यथा वाट
चुकण्याची शक्यताच अधिक आहे.
कन्हेरगड
| कण्हेरगडाचा महादरवाजा |
तीन लेण्यांचा पलीकडेच
कन्हेरगड नावाचा एक पुरातन किल्ला उभा आहे हे बऱ्याच जणांना माहीतही नाही
एव्हढेच कशाला याच्या अस्तित्वाची नोंद
खुद्द येथील ग्रामस्थांनादेखील नाही.यावरून या गडाच्या अपरिचिततेची कल्पना
यावी.प्राचीन महादेव मंदिराच्याच शेजारून या किल्ल्यावर वाट जाते. अप्रतिम
असे प्रवेशद्वार, तटबंदी, बुरूज, कातळकोरीव
पाण्याची टाकी आदी अवशेषांची सजलेला हा
किल्ला दर्दी भटक्यांनी तर आवर्जून पाहावा याच पंक्तीतला आहे.कन्हेरगड
किल्ल्याच्या परिसरात असलेली प्राचीन मंदिरे व लेणी पाहाता हा गाद साधारण आठव्या शतकात उभारला गेला असावा असे
इतिहासकारांचे मत आहे.गड फिरायला साधारण अर्धा दिवस तरी लागतो.गडाच्या माथ्यावरून
गौताळा अभयारण्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.या गडावर जाण्यापूर्वी माहिती
घेतल्याशिवाय आणि वाटाड्या बरोबर घेतल्याशिवाय शक्यतो जाऊ नये.
समृद्ध जैव विविधता
निसर्गाचा मोठा खजिनागौताळा अभयारण्यात पाहायला
मिळतो.अभ्यासकांच्या मते जवळपास आठशे औषधी
वनस्पतींच्या प्रजाती येथे आहेत. त्याचप्रमाणे २३२ प्रकारच्या पक्ष्यांच्या
नोंदीदेखील या अभयारण्यात पक्षी अभ्यासकांकडून करण्यात आल्या आहेत. ससा, बिबटे, लांडगा, तरस, साप,बिबटय़ा, लांडगे, चितळ, तरस, कोल्हे, काळवीट, रानडुकरे, सांबर, गवे, भेकर अशा अनेक वन्यजीवांचा मुक्त संचार या परिसरात आढळतो.याव्यतिरिक्त
साग, चंदन, खैर, सिरस, शिसे, धावडा,पिंपळ , पळस, करवंद, बोर, सीताफळ, अंजन,आदी वृक्ष
संपदासुद्धा आपल्याला पाहायला मिळते. निसर्गरम्य धबधबे, नदी-नाल्यांसह
वनौषधींच्या निसर्गसमृद्धीमुळेच महाराष्ट्र शासनाकडून या संपूर्ण परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्यात
आला आहे. पावसाळ्यात धवलतीर्थ, केदारकुंड हे उंचावरून कोसळणारे धबधबे
परिसरातील सौंदर्यात अधिकच भर टाकतात.
राहण्याची सोय
या ठिकाणी
मुक्कामासाठी वन विभागाची कॉटेजेस उपलब्ध
आहेत, तसेच चहा व नाष्ट्यासाठीसुद्धा छोटी हॉटेल्स उपलब्ध आहेत.
हे अभयारण्य नेहमीच्या रुळलेल्या पर्यटनाच्या यादीत नसल्यामुळे अगदी मोजकेच पर्यटक
येतात. तसेच पाटणादेवी भक्तनिवासाची खोल्याही उपलब्ध आहेत.कमीत कमी हि सारी ठिकाणे
फिरण्यासाठी दोन दिवस हाताशी हवेतच.
जंगलात घालविलेले असे
दिवस आपल्या जगण्यातले पुढचे दिवस
नक्कीच वाढवतात.गौताळा अभयारण्याचा परिसर
व्यवस्थित अनुभवल्यावर या ठिकाणी फिरण्या- राहाण्यातून पर्यटकांना समृद्ध भटकंतीचा नक्कीच आनंद मिळेल यात कोणतीच शंका नाही.याशिवाय या अभयारण्याला
जोड म्हणून औरंगाबाद, खुलताबाद. दौलताबाद, अजिंठा वेरुळ, भद्रामारुती, औरंगाबाद लेणी, अशी ठिकाणे सुद्धा पाहू शकता.




खुप कमी लोकांना महिती.
ReplyDeleteअसलेलं ठिाणांपैकी हे ठिकाण माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Atishay surekh likhan...aranyagandh cha feel nakki yeto
ReplyDeleteविकास ब.चिथडे
ReplyDeleteओंकारजी खुपच छान लिहिलेले आहे (नेहमी प्रमाणे) धन्यवाद💐💐