आंदर मावळातलं कातळसौंदर्य "कांब्रे लेणी" !


मानवी मनाची सुंदर निर्मिती म्हणजे या लेण्या! हजारो वर्षापूर्वी कोरलेल्या या लेण्या डोंगराच्या कडे-कपा-यांत दिसून येतात. यातल्या बहुतेक पुरातन घाट-वाटांवर खोदलेल्या दिसून येतात. लेण्या म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ती नेहमीची आणि सरावाची नावं! भाजे, कार्ला, एलिफंटा, अजंठा-वेरूळ अशीच; पण या लेण्यांपलीकडेही बरीच नावं आजही उपेक्षित आहेत.आपण ठरावीक लेण्यांनाच प्रसिद्धी दिली. तिथे गर्दी केली. याला कारण या लेण्यांना असलेली सोयीसुविधा! ज्या लेण्यांसाठी रस्ते तयार झाले, त्याच लेण्या पसंतीस उतरल्या गेल्या. म्हणूनच या लेण्या लोकमान्यता पावल्या आणि सुरक्षित फिरण्यासाठी एक हॉट-स्पॉटच ठरल्या, परंतु पर्यटकांचं असं भाग्य इतर अपरिचित लेण्यांना मिळालं नाही. कारण अशा लेण्या आपल्या सोयी-सुविधांपासून ब-याच दूर आणि सह्याद्रीच्या कडेकपा-यात उभ्या आहेत.त्यामुळे अशा लेण्यांवर यायचं म्हटलं तर मनात कुतूहल आणि सह्याद्रीवर प्रेम असणं हे जास्त गरजेचं ठरतं! एकदा का हे मनोमन ठरवलं की मग काय अशा दुर्लक्षित लेण्यांची सौंदर्यकवाडे सदैव तुमच्या स्वागतास सज्ज दिसतील. अशीच एक सुंदर, दुर्लक्षित आणि तितकीच अपरिचित लेणी पुणे जिल्ह्यातील मावळच्या भूमीत सह्याद्रीच्या कुशीत उभी आहे. कांब्रे असं त्या लेणीचं नाव! खूप थोड्या ठिकाणी या लेण्यांच्या माहितीचा संदर्भ मिळतो. याच माहितीचा संदर्भ घेऊन ही लेणी पाहायची असं मनोमन ठरवलं अन् आमच्या ग्रुपने रविवारी भल्या सकाळी या लेणीकडे कूच केलं.

कांब्रे गावातून कांब्रे लेणीचे दृश्य 

            पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला असणारं मावळ हे भटक्यांसाठी ओळखीचं नाव आहे. या तालुक्यात तुंग, तिकोणा, लोहगड, विसापूर, राजमाची असे दमदार गड-किल्ले मोठय़ा दिमाखात उभे आहेत. याशिवाय कार्ला, भाजे, बेडसे अशा नजाकतदार लेण्यादेखील भटक्यांना मोहवीत असतात. या मावळात पवन, नाणे आणि आंदर अशी तीन मावळं वसली आहेत. यापैकीच आंदर मावळात कांब्रे नावाचे गाव आहे. या गावात येण्यासाठी पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील कान्हे गावावरून टाकवेवरून कांब्रे गाव जवळ करायचे किंवा लोकमार्गाने कान्हे रेल्वे स्थानकावरून देखील टाकवेला जाता येते. परंतु रेल्वेपेक्षा स्वत:ची गाडी असणं जास्त सोयीस्कर ठरतं. कांब्रेत गेल्यानंतर एका उंच डोंगराच्या पोटात आडवी खाच दिसते. याच आडव्या दगडाच्या खाचेत खोदलेली लेणी अस्पष्टशी दिसायला लागते. गावातूनच एक पायवाट या लेणीकडे जाते. लेणीच्या खाली दाट झाडी आहे. ही झाडी पार करून आपण थेट लेणीच्या खाली येतो.

कांब्रे लेणीत जाणेसाठी लागणारा पहिला अवघड असा कातळ-टप्पा 

कांब्रे लेणीत जाणेसाठी लागणारा पहिला अवघड असा कातळ-टप्पा 

या लेणीच्या खाली आलो की मग आपली परीक्षा सुरू होते. कारण लेणीकडे जाण्यासाठी कातळातली पायवाट पूर्णपणे नष्ट झालेली दिसून येते. म्हणूनच सुरुवातीचा टप्पा पार करण्यासाठी प्रस्तरारोहण करण्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक नाही. हे प्रस्तरारोहण दोराशिवाय शक्य आहे. हाताच्या आधाराने वर जावे लागते. फक्त हा टप्पा काळजीपूर्वक पार करावा लागतो. हा अवघड टप्पा पार केला की मग तुम्ही या लेणीदर्शनाच्या परीक्षेत उत्तीर्ण! पुढे दगडातील खाचांमुळे प्रवास जलद होतो, अन् आपण थेट लेणीसमोर हजर होतो. मान वर करून उंच पाहिले की लेणीचा हा कातळ अक्षरश: आपल्या अंगावरच आल्यासारखा वाटतो. अर्धवर्तुळाकार असलेल्या या कातळात कांब्रे लेणी एका रेषेत खोदलेली आहे.

आडवी खोदलेली कांब्रे लेणी

कांब्रे लेणीपासून दिसणारे खालील दृश्य 

कांब्रे लेणीपासून दिसणारे दृश्य 

लेणीत जाण्यासाठी आणखी एक अद्भुत स्थापत्याचं आश्चर्य आपली वाट पाहात असतं. हे आश्चर्य म्हणजे लेणीत जाण्यासाठी दगडाच्या आरपार खोदलेला दगडी बोगदा! हा बोगदा आणि त्यातल्या पाय-या यांना मनापासून हॅट्स ऑफ! अचंबित करणारं लेणीचं हे स्थापत्य मात्र भटकंतीची सफारी व्याजासहित वसूल करणारं आहे. हा दगडी बोगदा पार केला की आपण विहाराच्या किंवा विश्रामाच्या खोलीसमोर हजर होतो. दगडात कोरलेल्या खोलीसमोरच धान्याचे उखळ दिसते. याच्या शेजारीच पाण्याची टाकीदेखील आहे. याच्या जवळच सारीपाटाचा खेळ एका दगडावर कोरलेला दिसून येतो. हा खेळ मात्र पाहण्यासारखा! त्या काळातही असे मनोरंजनात्मक आणि विरंगुळ्यासाठी असे खेळ खेळले जायचे याचे हे उदाहरण.

कांब्रे लेणीत जाणेसाठी लागणारा अद्भुत कातळी बोगदा 

बोगद्यातील कातळ कोरीव पायऱ्या 

जमिनीवर कोरलेला सारीपाटाचा खेळ 


उखळ 

सध्या या लेण्यांच्या समोरचा भाग हा विटांनी बांधला आहे. हे बांधकाम मात्र नंतरच्या काळात झाल्याचे दिसून येतं. लेणीसमोर उभं राहिलो की आंदर मावळाचे विहंगम निसर्गचित्र कॅनव्हासवर उमटल्यासारखं वाटतं. समोर दिसणारा ठोकळवाडी धरणाचा विस्तीर्ण जलाशय आणि त्याच्याच शेजारी बोट धरून बसलेली छोटी गावं.. हे ग्रामीण ढंगाचं रूप खूपच लोभस वाटतं. असो, डोळ्यांना सुखावणारी ही डोंगराची रूपे पाहतच आपली लेणीसफारी संपवायची.

कांब्रे लेणीपासून दिसणारे आंद्रा खोरे 

डोंगराच्या पोटात खोदलेल्या लेण्या हे ब-याचदा बौद्ध भिक्षूंच निवासाचं किंवा विश्रामाचं स्थान असायचं. पूर्वी कोकण ते देश असा प्रवास सह्याद्रीच्या खडतर, बिकट आणि डोंगराळ घाटवाटांतून होत असायचा. अशा घाटवाटा पार करताना विश्रामाची, निवासाची गरज लागायची. म्हणूनच अशा लेण्यांची निर्मिती झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे ब-याचशा लेण्या तुम्हाला घाटवाटांवर दिसतील. ही कांब्रे लेणीसुद्धा त्याला अपवाद नाही. कारण या लेणीच्या पलीकडे कुसुर हा प्राचीन घाटरस्ता त्या काळात अस्तित्वात होता. या मार्गाने ब-याचदा दळणवळण आणि ये-जा चालू असल्यामुळे कांब्रे लेणी याच विश्रामाच्या कारणासाठी खोदली गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.

असो. सह्याद्रीच्या द-याखो-यांत आजही अद्भुतता ठासून भरलेली आहे. त्यामुळे अशा ठिकाणांची भटकंती आपल्या मनात आनंद तर देऊन जातेच; परंतु त्याहीपेक्षा फिरण्याची नवी दिशाही देऊन जाते..


जाण्याचा मार्ग 

कांब्रे गावात येण्यासाठी पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील कान्हे गावावरून टाकवेवरून कांब्रे गाव जवळ करायचे किंवा लोकमार्गाने कान्हे रेल्वे स्थानकावरून देखील टाकवेला जाता येते. परंतु रेल्वेपेक्षा स्वत:ची गाडी असणं जास्त सोयीस्कर ठरतं.

भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी

पावसाळा सोडून कधीही 


सूचना
  • काम्ब्रे  गावात या लेण्याकडे जाण्याची वाट विचारून घ्यावी.
  • या लेणीकडे जाण्याची वाट काहीशी अवघड आहे.विशेषतः पहिलाच कातळ टप्पा.गिर्यारोहणाचे तंत्र माहित असल्याशिवाय येथे जाणे धोक्याचे आहे. 
  • शक्यतो जाताना पिण्याचे पाणी सोबत घेणे.
  • निसर्गाची हानी टाळून  आणि त्याचे पावित्र्य राखूनच भटकंती करावी.

लेणीतून



Comments

  1. वर... अप्रतिम लेणी... अप्रतिम वर्णन आणि अप्रतिम मावळ...

    ReplyDelete
  2. वर... अप्रतिम लेणी... अप्रतिम वर्णन आणि अप्रतिम मावळ...

    ReplyDelete
  3. ओंकारजी नेहमी प्रमाणे छान व माहिती पूर्ण

    ReplyDelete
  4. या बौद्ध लेणी आहेत का? स्तूप वगैरे आहे का? म्हणजे हीनयान आहेत की महायान?

    ReplyDelete
    Replies
    1. या बौद्ध लेणीच असाव्यात. बहुधा हिनयान पंथाच्या. आतमध्ये स्तुप, शिलालेख नाहीत.

      Delete
  5. लेण्या मधे बाकी काही मूर्ती, स्तूप इत्यादी इत्यादी काही आहे का?

    ReplyDelete
    Replies
    1. स्तुप आणि शिलालेख नाहीत.

      Delete
  6. Katal vat ani Kambre leni...yanche surekh varnan

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कऱ्हे पठारावरचा भक्तीचा मळा !!

पळशी ...एक सुंदर गाव !!

गौताळा अभयारण्याचे अंतरंग