भूम -परांडा तालुक्यातील भटकंती

 

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम आणि परांडा या तालुक्यात काय आहे पाहण्यासारखे असे प्रश्न बरेच जण विचारतील.कारण हा भागही तसेच दर्शवितो.मुळात हा सारा परिसरच दुष्काळाच्या दाहकतेने कमी अधिक प्रमाणात होरपळून निघालेला आहे.पण तरीही या जिल्ह्यात भूम आणि परांडा तालुक्यातील दोन ठिकाणे नेहमीच खुणावत असतात.रखरखीत भूमीत वास्तू स्थापत्याने नटलेली दोन ठिकाणे उभी आहेत. अप्रतिम माणकेश्वर मंदिर आणि भुईकोट किल्ला  परांडा हि ती दोन ठिकाणे .आपण ब-याच वेळा देवदर्शनासाठी तुळजापूरला जात असतो.या भक्तिमार्गावरूनच थोडी वाट वाकडी केली की या दोन्ही ठिकाणांचे दर्शन होऊ शकते.  कमी श्रमात पाहून होणारी  आणि येण्या-जाण्याच्या दृष्टीने सोयीस्कर असलेली  हि ठिकाणे  सर्व वयोगटातील भटक्यांसाठी उत्कृष्ट ठिकाने  आहेत .त्यांचीच सफर आपण करणार आहोत.

परांड्याचा भक्कम  भुईकोट

परांडा प्रवेशद्वार 

परंडा किल्ल्याचे प्रवेशद्वार आतील बाजूने 

गड किल्ले म्हणाले कि आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातले,कोकण किंवा नाशिक भागातल्याच ठिकाणांची यादी समोर येते.पण मराठवाड्यातहि काही असे सुंदर किल्ले डोळ्यांचे पारणे फेडताना दिसतात.या भागात डोंगर रांगा नाही कि रौद्रसुंदर सह्याद्रीचे दर्शन नाही तरीही हा भाग मात्र पाहण्यासारखा आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुकाही याला अपवाद नाही.याच तालुक्यातला परांडा किल्ला सुद्धा डोळ्यांचे पारणे फेडतो.

सह्याद्रीच्या मुख्य धारेवर असणा-या गिरीदुर्गाना विशिष्ट असे कवच लाभले आहे. म्हणजे या किल्ल्यांचं स्थान, सभोवतालचं दाट जंगल, उंची, समोर डोंगरांचं सुरक्षाकवच, सह्याद्रीत पडणारा पाऊस अशा सा-या भौगोलिक गुणवैशिष्टय़ामुळे येथले दुर्ग हे बलदंड, दणकट व अजिंक्य राहिले होते. उदाहरणच द्यायचे झाले तर तोरणा, रायगड, प्रतापगड, सिंहगड इत्यादी या सा-या गड-किल्ल्यांना सह्याद्रीचं नैसर्गिक सुरक्षा कवच होते. शत्रूला असे किल्ले जिंकण्यास महिनोन् महिने लागायचे. त्यामुळे या गिरीदुर्ग प्रकारातल्या किल्ल्यांची शत्रुपक्षाला प्रचंड दहशत असायची.परंतु जसं जसं आपण सह्याद्रीच्या मुख्य डोंगररांगांपासून बाजूला सरकू लागलो की या उंच डोंगरावर असणा-या किल्ल्यांचं रूप बदलताना दिसते. यांचं स्थापत्य बदलतं. यांची रचना, संरक्षण सिद्धता या सा-याच गोष्टी बदलताना दिसतात. म्हणजेच यांचं डोंगरी रूप जाऊन बैठे स्वरूप येते. या प्रकारालाच भुईकोटअसं नाव! त्यामुळेच मराठवाडा, विदर्भ आणि देशावरील ब-याच सपाट प्रदेशात असे भुईकोट आणि गढी मोठय़ा प्रमाणात दिसू लागतात.किल्ल्यांचं हेही रूप तेवढंच आव्हानात्मक असतं. उलटपक्षी डोंगरी किल्ल्यांना स्थापत्याबाबत आलेली शिथिलता येथे दिसून येत नाही. कारण भुईकोट हे जमिनीवरचे असल्यामुळे शत्रूही सहजपणे आक्रमण करण्यासाठी येऊ शकतो. हे विचारात घेऊनच अशा किल्ल्यांची आखणी, बांधणी ही जास्त हुशारपणे आणि कल्पकतेने करावी लागत असे.या किल्ल्यांचं रूप लढाऊ बनविण्यासाठी तत्कालीन कारागिरांचा, निर्मात्याचा कस लागत असे यात शंका नाही. असे उत्कृष्ट भुईकोट आपल्याला नळदुर्ग, सोलापूर, लातूर आदी ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे हे सारे संदर्भ घेऊन जर आपण भुईकोट पाहायला आत शिरलो की मग किल्ले आणखीनच उलगडत जातात.परांडाही याच पंक्तीत अग्रभागी असलेला भुईकोट प्रकाराचा किल्ला. परांडा याच नावाच्या गावातच हा कोट मोठय़ा दिमाखात उभा आहे. परांडा हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या तालुक्याचे ठिकाण, त्यामुळे येथे जेणे हे खूपच सोयीस्कर ठरते. त्यातल्या त्यात एसटी ही जास्तच सोयीस्कर आहे. कारण परांडा एस.टी. स्थानकापासून आपण पाचच मिनिटांत चालत या कल्पकतेने ठासून भरलेल्या किल्ल्यासमोर उभे असतो. हा किल्ला बहामनी राजवटीत मुहम्मद शहा बहामनीचा वजीर महमूद गवान याने १४ व्या शतकात बांधला. बहामनी सत्तेनंतर हा निजामशाहीच्या ताब्यात आला. इ. स. १६०९-१०पर्यंत हे राजधानीचे ठिकाण म्हणून ओळखले जाई. एवढा इतिहास डोक्यात घोळवून मगच किल्ल्यात निघायचे.


परंडा किल्ल्यातील मशीद 

किल्ल्याच्या ईशान्य बाजूस आत जाण्यास एक पूल रस्ता आहे. हा पूल आहे किल्ल्याभवतालच्या खंदकावर! हा खंदक संपूर्ण किल्ल्याला वळसा घालून आलेला आहे. हा खंदक म्हणजे शत्रू सैन्यापासून बचावासाठीच पहिलं संरक्षक कवच. याच खंदकावरून आत-बाहेर करण्यासाठी हा पूल तयार करण्यात आला. हा पूल त्याकाळी काढूनही ठेवता येईल, अशा पद्धतीने बसवला जाई.त्यामुळे हा पूल नसेल तर किल्ल्यांत प्रवेश करणे केवळ अशक्यच! या पुलावरून आपण पहिल्या दरवाजापाशी येतो. यातून प्रवेश केल्यानंतर वळण घेतल्यावर दुसरा दरवाजा लागतो. येथे आल्यानंतर आपल्या लक्षात येते की, आपण चहुबाजूंनी बुरुजांनी वेढले गेलो आहोत. अंगावर शहारा आणणारा क्षण! या अशा स्थितीमुळे शत्रूची सहजच चाळण होत असे. येथून शत्रू वाचलाच तर पुढे पुन्हा तिसरा व चौथा दरवाजा आणि त्यांचे बुरूज आहेतच. या चारही दरवाजातून आत शिरल्यानंतर आपण मशिदीसमोर येतो. येथून डाव्या बाजूला एक वाट दुहेरी तटबंदीवरून थेट महादेवाच्या मंदिरापाशी येते.दुहेरी तटबंदी ही या किल्ल्याच्या स्थापत्याच्या आणखी एक अजोड नमुना. 

किल्ल्यातील तटबंदी आणि बुरुज 

किल्ल्याचे अंतरंग 

परांडा किल्ल्याचा खंदक आणि तटबंदी 

खूप कमी ठिकाणी पाहायला मिळणारी ही दुहेरी तटबंदी परांडय़ात मात्र दिसते. ही तटबंदी खरोखरच पाहण्यासारखी आहे. खंदकानंतर बांधलेल्या एकेरी तटबंदीनंतर साधारण ४० फूट अंतर ठेवून दुसरी उंच तटबंदी बांधली गेली आहे. या दोन तटबंदीमधून आपणाला फेरफटकासुद्धा मारता येतो.ही अप्रतिम दुहेरी तटबंदी म्हणजे या किल्ल्याचे एक आभूषणच आहे. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मशिदीच्या उजव्या बाजूने एक वाट पहारेक-यांच्या देवडय़ांवरून जाते. या देवडय़ांशेजारच्या खोलीत तोफेने डागले जाणारे असंख्य गोळे दिसतात. हे तोफगोळे पाहून आपण अक्षरश: विस्मयचकीत होतो. याच्याच पुढे बांधकामाचे पडके अवशेष आपल्याला जागोजागी दिसतात.परांडा किल्ल्याचे वैशिष्टय़ म्हणजे येथील बुरुजांवर अजूनही शाबूत असणा-या तोफा. त्यातील बहुतेक पंचधातूंच्या! मुख्य दरवाजावर एक मोठी तोफ आहे. तिचे नाव मलीक-ए-मैदान’. फारसी शिलालेख अंगावर गोंदवून घेतलेली ही महाकाय तोफ पाहून हिची कारकीर्द नावाप्रमाणेच राहिली असेल याची कल्पना येते. याव्यतिरिक्त इतर तोफा आपल्याला किल्ला पाहताना दिसतात. या तोफा म्हणजे भुईकोट किल्ल्यांच्या संरक्षण साधनसामग्रीचा आत्माच म्हणता येईल. परांडा किल्ला हा सर्वदृष्टीने अभेद्य बनला होता. किल्ल्याभोवतीचा खंदक, त्यानंतरची दुहेरी तटबंदी, अभेद्य असे २६ बुरूज आणि धडकी भरविणा-या तोफा अशा एकापेक्षा एक सरस गोष्टींमुळे हा किल्ला जिंकणे केवळ अशक्यच होते. असा हा परांडा म्हणजे महाराष्ट्रातल्या भुईकोट प्रकारातील दुर्गपरंपरेतील माळेचा अनमोल मणीच आहे याची खात्री पटल्याशिवाय राहत नाही.


परांडा किल्ल्यातील सुंदर तोफ 


जाण्याचा मार्ग 
उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा या तालुक्याच्याच ठिकाणी 

माणकेश्वराचे पाषाणपुष्प

परांड्यापासून साधारण ३०किमि अंतरावर भूम रस्त्यावर माणकेश्वर येथे भगवान शिवाचे हेमाडपंथी धाटणीचे अप्रतिम मंदिर उभे आहे.नंदीमंडप,सभामंडप,अंतराळकक्ष आणि गाभारा अशी आकर्षक रचना असलेले हे मंदिर कैक शतकांपासून येथील पंचक्रोशीतल्या नागरिकांना भक्तीचा आणि कलेचा प्रसाद देत उभे आहे.

माणकेश्वर चे कातळी सौंदर्य 

माणकेश्वर मंदिराचे स्थापत्य 

माणकेश्वर गावाच्या पूर्वेस आणि विश्वरूपा नदीच्या तीरावर हे मंदिर उभं आहे.याच शिवमंदिराच्या शेजारी सटवाई मातेचं देखील स्थान आहे.त्यामुळेच या पंचक्रोशीतले नागरिक या दोन्ही देवस्थानांना "शिव-सटवाई"या नावाने देखील ओळखतात.या दोन मंदिराच्या बाबतीत या गावात आख्यायिका देखील सांगितल्या जातात.त्या म्हणजे,चालुक्य काळातील राजा दक्ष याने माणिक नावाच्या लिंगाची स्थापना केली होती.म्हणून या गावाचे नाव माणकेश्वर असे झाले.हि एक आख्यायिका. तर काही ग्रामस्थ असेही सांगतात कि माणकेश्वर येथील शिवमंदिर असुरी शक्तीद्वारे एका रात्रीत बांधले गेले आणि दिवस उगवण्याच्या आधी असुर नाहीसे झाले.याचप्रमाणे सटवाई देवी मंदिराबाबतही अंक आख्यायिका येथे ऐकविल्या जातात.या मंदिरात मात्र जावळ काढण्यासाठी आणि नवस करण्यासाठी अनेक भाविक गर्दी करत असतात.त्यामुळे येथे आलो कि दोन्हीमंदिराचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.यातील शिवमंदिर हे जणू काही लेणेच वाटते.पण सध्या हे मंदिर भग्नावस्थेत आहे.कारण शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी अफजलखान महाराष्ट्रावर चाल करून आला त्यावेळी त्याने अनेक हिंदू मंदिरे उध्वस्त केली माणकेश्वराचे मंदिर हे त्यापैकीच एक होते. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात उतरला तेव्हा त्यानेही  या मंदिराचं नुकसान केल्याचे सांगितले जाते. असे काही इतिहासकारांचे मत होते.हा सारा इतिहास मनात साठवायचा अन या मंदिराच्या स्थापत्यात भिजण्यास सज्ज व्हायचे.

माणकेश्वरमंदिरातील दगडी खांब 

माणकेश्वर मंदिर सभामंडप 

नाग प्रतिमा 

मंदिराच्या सुरुवातीला नंदीमंडप लागतो.सध्या या मंडपाचा फक्त चौथराच शिल्लक आहे.हा नंदीमंडप मुख्य मंदिरापासून काहीसा विलग आहे.चौथऱ्यावरील नक्षीकाम पाहून मंदिराच्या गतवैभवाची कल्पना येते.भिंतीत असलेले बारा खांब आणि मध्यभागी उभे असलेल्या पूर्णकृती चार खांबांवर सभामंडपाचा डोलारा उभा आहे.यापैकी मध्यभागी उभे असलेले पूर्णाकृती चार खांब हे जास्त कलात्मक आहे.यावरील फुले आणि घुंगरावरची नक्षी पाहण्यासारखी आहे.खांबावरचा प्रत्येक इंचन इंच हा अलंकारांनी सजलेला वाटतो.वरच दगडी छतदेखील तितकाच देखणं आहे.सौंदर्याचं दालन पार करून आपण अंतराळकक्षात येतो.द्वारपाल जय-विजय ओलांडले कि गर्भगृहाची खोली समोर दिसते.गाभाऱ्यात सुंदर शिवपिंडी दिसते.मंदिराचे बाह्यरुपही तितकंच दिलखेचक आहे.तळाच्या पट्टीवर गजथरांची साखळी दिसते.पाहणाऱ्याला असे वाटते जणू काही मंदिराचा सारा भारच ह्या हत्तींनी उचलून धरला आहे कि काय.बाह्यभिंतींवर विविध देवतांच्या ,नर्तकांच्या,अप्सरांच्या मुर्त्या देखील कोरलेल्या आहेत.मंदिराच्या मागील बाजूस पंचमुखी नागाचे शिल्पही पाहायला मिळते.आता त्याचंही छोट्या देवळात रूपांतर झालंय.माणकेश्वराचे हे देवालय अनेकशतकांपासून विविध आघात सहन करीत आलंय मुघल आक्रमणांनी  यावरील अनेक शिल्पे भग्न केली .नक्षीकाम खराब केले पण तरीही यातली कला मात्र अजूनही जिवंतच आहे...कलेला मरण नसत हेच खरे.त्यामुळेच हे मंदिर कलेसाठी पाहावे असेच आहे.अश्या या मंदिराची सफर केलीच पाहिजे...

 

भिंतींवरील नक्षी 


जाण्याचा मार्ग 

परांडा-भूम रस्ता -- साधारण ३०किमि अंतरावर माणकेश्वर गाव 

जाण्याचा कालावधी

वर्षभर कधीही 

सूचना
  • निसर्गाची हानी टाळून  आणि त्याचे पावित्र्य राखूनच भटकंती करावी.                                                                          


पूर्वप्रकाशित साप्ताहिक लोकप्रभा   






Comments

  1. Ek number... Khup bhari mahiti... 👌👌

    ReplyDelete
  2. ओंकारजी नेहमी प्रमाणे आपला ब्लॉग सुंदर आहे .परांडा दोनदा तर बघीतल आहे पण माणकेश्वर मंदिर बघायचे राहिले👌💐

    ReplyDelete
  3. 1 no saheb khup Chan varnan

    ReplyDelete
  4. Duheri Tatbandi @Paranda and Best Architectural work @ Mandir..Very good information

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कऱ्हे पठारावरचा भक्तीचा मळा !!

पळशी ...एक सुंदर गाव !!

गौताळा अभयारण्याचे अंतरंग