सोनोरीचे वैभव !!

महाराष्ट्राला संपन्न असे गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग, स्थळदुर्ग किंवा भुईकोट,अभयारण्ये,प्राचीन मंदिरे  असा वारसा लाभला आहे. जगभरात कुठेही नसतील एवढे आणि तेवढेच वैविध्यपूर्ण  प्रकारचे गड-किल्ले   आपल्याकडे पाहायला मिळतात.पूर्वजांचा पराक्रम आणि स्मृतींना उजाळा देणाऱ्या, आपल्या वास्तुपरंपरेचे समृद्ध दर्शन घडवणाऱ्या, आजही मूकपणे इतिहासाचे कथन करत असलेल्या इमारती  म्हणजे  आपल्यासाठी सोनेरी  पानेच.असच एक पान पुणे जेजुरी  रस्त्यावर असणाऱ्या दिवेघाटाच्या  तोंडावरच वसले आहे सोनोरी नावाचे.सोनोरी हे सासवडजवळचे सुंदर गाव.दुर्गप्रेमींमध्ये किंवा पर्यटकांमध्ये  सोनोरीचा गड किंवा मल्हारगडाचा पायथा म्हणून हे गाव प्रसिद्ध. वेशीच्या आत वसलेले हे टुमदार गाव ‘मंदिरांचे गाव’ म्हणून आपली वेगळी ओळख जपून आहे. पेशव्यांचे तोफखाना प्रमुख भिवराव पानसे यांचे हे गाव. त्यामुळे या  गावात  इतिहासाने भारलेली आणि  वास्तुस्थापत्याने नटलेली काही  पाने नक्कीच वाचायला मिळतात.या गावात मराठेशाहीतील बांधला गेलेला सर्वात शेवटचा किल्ला आणि सरदार पानसे यांचा अप्रतिम  वाडा पाहायला मिळतो. या गावात  अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत इथे सिनेमा आणि मालिकांचे शूटिंगही झाल्याचेही इथे ऐकायला मिळते.त्यामुळेच हमरस्त्याला खेटून असलेल्या या गावात पर्यटकांनी आपली पावले वळवायालाच हवीत....


पानसेंचा ऐतिहासिक वाडा

वाडा म्हणजे एक गृह-वास्तुप्रकार. मोठ्या धनाड्य व्यक्तीसाठी  बांधण्यात आलेल्या आणि  आकाराने बऱ्याच मोठ्या असलेल्या निवासस्थानास मराठीत ‘वाडा’ असे म्हटले जाते . या वाड्यात  आवश्यक अशी आतिथ्यगृह, विश्रामस्थान, भोजनगृह, दालने मोठ्या आकाराच्या उघड्या चौकांभोवती बांधण्यात येत. असे वाडे हे पाहण्यासारखे असत.महाराष्ट्रात पेशवेकाळात अनेक वाडे उभे राहिले.बहुतांशी सरदारांनी असे वाडे बांधून काढले.त्यात शिल्पकला ओतली.वाड्यांमध्ये मंदिरे,विहिरी यांचीही उभारणी आकर्षक पद्धतीने करण्यात अली.उत्तर पेशवाईच्या काळात  वाड्याभोवती तट बांधून मोठाले कमानदार दरवाजे व त्यांवर नगारखाने बांधण्यात येऊ लागले. वाड्याचे रूपांतर गढीत झाले. सर्वसामान्यांना तर अश्या गढी म्हणजे छोटे किल्लेच वाटू लागले. असाच एक सुंदर  वाडा सरदार पानसेंच्या नावाने ओळखला जातो.अश्याच वाड्याची सफर हि केवळ दुर्गप्रेमीनाच आनंद देत नाही तर ऐतिहासिक वास्तू-स्थापत्याची आवड असणाऱ्यांना देखील मोहून टाकते.असे वाडे हे कालौघात टिकून राहिले हे आपले भाग्यच म्हणायचे. भलेही यांना गतवैभवाची सर येणार नाही पण यांच्या उरलेल्या अवशेषांमधून मात्र आपल्याला इतिहासाचे कान नक्कीच वेचता येतील यात शंका नाही.

सरदार पानसे यांच्या वाड्याचे प्रवेशद्वार 
वाड्याचे लाकडी दार 

वाड्याची संरक्षक भिंत 

भिवराव पानसे हे पेशवाईतले बडे सरदार.तोफखानाप्रमुख असलेल्या पानसेंनी इंग्रज-मराठे या  वडगावजवळच्या  प्रसिद्ध अश्या पहिल्या लढाईत मोठी कर्तबगारी दाखवली.त्यांच्या तोफखान्याने इंग्रजांना जेरीस आणली व पर्यायाने इंग्रजांचा मोठा पराभव झाला.पेशव्यानंतरही भोर संस्थानातं पानसे घराण्याचे योगदान राहिले.त्यामुळेच त्यांची स्मृती जागवण्यासाठी हा वाडा पाहणार गरजेचे आहे. गडाकडे जाण्याआधी सोनोरी गावात असणारा पानसे यांचा ६ बुरुजांचा वाडा पाहण्यासारखा आहे.वाडा एखाद्या गढी अथवा भुईकोटासारखा वाटतो.वाड्याला पूर्वेकडे असणारा एक मुख्य म्हणजे महादरवाजा दिसतो.यातून प्रवेश केला कि तीन मजली इमारतींचे अवशेष दिसतात.यातला दिवाणखाना सुस्थितीत दिसतो याचे लाकडी खांब पाहून आश्चर्यच वाटते.  या च्या बाजूलाच  गणपतीचे  व लक्ष्मी-नारायणाचे सुंदर मंदिर आहे.याच्या जवळच  सूर्यमंदिरही दिसते. वाड्यात दोन सुस्थितीत असणाऱ्या विहिरीही पाहण्यासारख्या आहेत. येथे  चुकवून चालणार नाही असे ठिकाण म्हणजे मुरलीधराचे सुबक मंदिर व मंदिरातील अत्यंत देखणी अशी काळ्या पाषाणात घडवलेली श्रीकृष्णाची मूर्ती.हि संगमरवरी मूर्ती भान हरपून टाकणारी आहे.

वाड्यामधील मंदिरे 
वाड्यातील विहीर 

दुर्गबांधणीचं अखेरचं पान

महाराष्ट्रात बांधला गेलेला सर्वात पहिला किल्ला कोणता? या प्रश्नाचं उत्तर देणं जसं महाकठीण काम आहे, त्यापेक्षाही शेवटचा बांधला गेलेला किल्ला कोणता? या प्रश्नाचं उत्तर मात्र इतिहास आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. केवळ इतिहासच नाही तर कोणताही अस्सल दुर्गप्रेमी याचं उत्तर देऊन मोकळा होईल. मल्हारगड ऊर्फ सोनोरीचा किल्ला हे या प्रश्नाचं सोप्पं उत्तर!

पायथ्याच्या गावातून मल्हारगड चे दर्शन 


  पुणे शहराच्या जवळच दिवेघाटाच्या तोंडावर वसलेला पेशवेकाळात हा किल्ला बांधला गेला. तसं पाहिलं तर अगदी शिलाहार, सातवाहन काळापासून सुरू झालेली दुर्गबांधणीची परंपरा या मल्हारगडावर संपली आणि महाराष्ट्रातील दुर्गबांधणीच्या इतिहासाचा अस्त झाला. त्यामुळेच शिलाहार सातवाहन काळातील जीवधन, हरीश्चंद्रगड असो वा, शिवकाळात बांधले गेलेले राजगड, सिंधुदुर्ग असो वा पेशवेकाळात बांधलेला गेलेला हा मल्हारगड असो, या सर्व काळातील गड-दुर्गाचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल, की हे गड त्या-त्या काळातील दुर्ग वैशिष्टय जपणारे होते. तसंच त्यांची बांधणीही त्या काळातील युद्धतंत्राच्या गरजेनुसार होती. त्यामुळेच हा छोटेखानी किल्ला पाहताना आपण कळत न कळत याची तुलना इतर गडांशी न केली तरच नवल! म्हणूनच या कुतुहलापोटी या मल्हारगडाचं दर्शन एकदा तरी घ्यावं असंच आहे.

   पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातून निघालेली सह्याद्रीची एक उपरांग सासवडच्या दिशेने गेलेली दिसते. ही रांग भुलेश्वर या नावाने ओळखली जाते. जसजशी ही रांग मुख्य प्रवाहापासून दूर जाते, तसतशी आसपासची गर्द हिरवाई कमी होऊन कोरडेपणा वाढत जातो. त्यामुळेच या उपरांगेवर असलेल्या मल्हारगडावर सुद्धा हाच शुष्कपणा आपल्या नजरेत ठळकपणे भरतो. अशी विरळच दिसणारी भौगोलिक स्थिती आणि इतिहासकालीन संदर्भ असल्याने याबाबतचे पुरावेही सहज उपलब्ध होतात.सरदार कृष्णराव पानसे हे पेशव्यांचे तोफखान्याचे प्रमुख होते. त्यांनीच सन १७५७ ते १७६० या काळात दिवेघाटावर देखरेखीसाठी या गडाची उभारणी केली. या निर्मितीनंतर माधवराव पेशवे यांनी देखील सन १७७१ या सालात गडाला भेट दिल्याची नोंद सापडते.असो, मल्हारगडावर येण्यासाठी सर्वप्रथम पुणे मार्गे  दिवेघाट गाठायचा. हा घाट ओलांडला की सासवडकडे जाणा-या रस्त्यावरून डाव्या बाजूला एक फाटा लागतो. येथून चार-पाच कि. मी. दूर असणा-या सोनोरी गावात दाखल व्हायचं. 

मल्हार गडाची अद्भुत प्रवेशरचना 

मल्हारगडाचा खणखणीत बुरुज 

गावातून पानसेंच्या वाड्यापासून  अवघ्या अर्ध्या तासातच आपण गडाच्या मुख्य दरवाजापाशी हजर असतो. हा दरवाजा पार केल्यानंतर लगेचच पहारेकऱ्यांच्या देवडय़ा आपल्याला दिसतात. मग काही पाय-या चढून आपण गडाच्या मोकळ्या जागेत प्रवेश करतो. या जागेला लागूनच काहीशा उंचवटय़ावर बालेकिल्ल्याचा चौकोनी आकार दिसतो. तसं पाहिलं तर या जागेला बालेकिल्ला म्हणावं इतकी याची उंचीही नाही. फक्त काहीशा उंचवटय़ामुळेच हा फरक! गडाच्या तटबंदीवरून बालेकिल्ल्याला प्रदक्षिणा घातल्यावर एकूण तीन बुरूज लागतात. हे तीनही बुरूज अगदी तीन कोनांत बसले आहेत. आकाशातून जर पाहिले तर त्रिकोणच जणू..यापैकी उत्तर बुरुजापाशी एक चोर दरवाजा आहे. या दरवाजातून खाली गेलं, की एक वाट आपल्याला गवसते. ही वाट झेंडेवाडी गावाकडे जाते. गडावर येण्यासाठी आणखी एक चोरवाट! हे सगळं पाहून पुन्हा तटबंदीपाशी यायचं. येथेच बालेकिल्ल्याचा दरवाजा आहे. या दरवाज्यातून आत प्रवेश केला की, गडाचे पडके अवशेष आणि दोन देवळांची शिखरं समोर येतात. यातील एक मंदिर महादेवाचं आणि दुसरं खंडोबा अर्थात मल्हारी मरतडाचं ! या मल्हारदेवामुळेच याचं नाव ‘मल्हारगड’! या मंदिरात नतमस्तक होऊनच आपली दुर्गयात्रा संपवायची.

गडावरील मंदिरे 
बालेकिल्ल्याचा दरवाजा 

तसं पाहिलं तर मल्हारगड हा छोटेखानी आटोपशीर किल्ला आहे. अवघ्या एका दिवसात पाहून होणारा, मराठेशाहीच्या अस्तापूर्वी बांधला गेलेला शेवटचा किल्ला. त्यामुळेच इतर किल्ल्यांवर दिसणारी वैशिष्टयं म्हणजेच माचीचं बांधकाम, बालेकिल्ल्याची भक्कम तटबंदी, चौक्या, दारूगोळ्याचं कोठार आदी इथे आढळत नाही. बहुधा या सर्व गोष्टी कालौघात महत्त्वाच्या नसतीलही. त्यामुळेच हा गड इतरांच्या तुलनेत काहीसा डावा ठरतो. पण तरीही हा गड म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या दुर्गबांधणीचं लिहिलेलं अखेरचं पान आहे. त्यामुळेच हे पान दुर्गप्रेमींनी एकदा तरी अवश्य वाचावं असंच आहे.


जाण्याचा मार्ग 

पुणे-सासवड रस्ता --दिवेघाट -- सोनोरी गाव 

जाण्याचा कालावधी

वर्षभर कधीही 

सूचना
  •  जाताना पिण्याचे पाणी सोबत घेणे.
  • निसर्गाची हानी टाळून  आणि त्याचे पावित्र्य राखूनच भटकंती करावी.
पूर्व-प्रकाशित साप्ताहिक लोकप्रभा 





Comments

  1. तुमचे लेख खुपच सुंदर असतात आम्ही आवर्जून वाचतो

    ReplyDelete
  2. इतिहास आणि वास्तुरचना सांगणारा परिपुर्ण Blog

    ReplyDelete
  3. Both Sites..i.e.Panse Vada and Malhargad Likhan are Written very creatively...Happy and interesting while reading ..Panse Vada feel kela

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कऱ्हे पठारावरचा भक्तीचा मळा !!

पळशी ...एक सुंदर गाव !!

गौताळा अभयारण्याचे अंतरंग