निसर्गरम्य “पाटगाव”

               कोल्हापूरचा दक्षिणेकडचा भाग तसा भटक्यांसाठी नंदनवनच पण सर्वसामान्यांसाठी कायमच अपरिचित राहिला आहे.निसर्गाची मुक्तहस्ते उधळण लाभलेला हा परिसर डोळ्यांचे पारणेच फेडतो. भुदरगड तालुका हा या भागातच मोडतो. खणखणीत रांगणा,भुदरगड हे किल्ले या भागातलेच. या तालुक्यात गड-किल्ले-जंगलें-मंदिरे यांची अक्षरश रेलचेल आहे.या तालुक्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली कित्येक ठिकाणे हि पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहे. "पाटगाव" हे त्यापैकीच एक.इतिहासात मन रमविणाऱ्यांना हे नाव नवीन नाही. कारण याच गावात शिवकाळात एक योगीपुरुष होऊन गेले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदरस्थानी आणि गुरुस्थानी असलेल्या मौनी महाराजांचे नितांतसुंदर समाधी मंदिर वेदगंगा नदीच्या काठावर पाटगावात उभे आहे.ते पाहण्यासाठी एकदा तरी वाट वाकडी करायला काहीच हरकत नाही.

                कोल्हापूरपासून साधारण ९० किमी अंतरावर असलेल्या पाटगाव येथे येण्यासाठी कागल-गारगोटी मार्गे जाता येते.कागल सोडलं कि मग अस्सल कोल्हापुरी निसर्गाची झलक पाहायला मिळते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची  गर्द झाडी आपला प्रवास प्रेक्षणीय तर करतेच पण मनाला देखील प्रचंड ऊर्जा देते.पाटगाव जसं-जसे जवळ येऊ लागते तसं-तसा आजूबाजूंच्या झाडांचा विळखा आणखीनच घट्ट विळखा पडू लागतो. लालमाती-नारळ-आंब्याची  झाडे,चिऱ्याची घरं पाहून आपण क्षणभर कोकणातच आलो कि काय असे वाटून जाते.पाटगाव आहे छोटंसं.आखीव आणि रेखीव.सुखद शांतता हे इथलं वैशिष्ट्य.

मौनीमहाराज मठ


मौनी महाराज मठातील समाधी मंदिर 

                मौनी महाराजांमुळे हे गाव इतिहासात आणि पर्यटकांच्या हृदयात घर करून बसलंय. गावातच मौनी महाराजांचा आश्रम गर्द झाडीत लपलाय.अनेक इतिहासकारांनी मौनीमहाराजांविषयी लिहून ठेवलंय. ते म्हणतात कि राज्याभिषेकानंतर शिवरायांनी कर्नाटक स्वारीवर जायचे ठरवले.या स्वारीवर  जाताना जेव्हा महाराज पाटगाव येथे मुक्कामी आले तेव्हा त्यांनी मौनी महाराजांचे आशीर्वाद घेतले.हि घटना साधारण १६७६सालाची .यानंतर शिवराय दक्षिण दिग्विजय करून पुन्हा पाटगांवला आले तेव्हा मात्र मौनीमहाराजांनी अवतारकार्य संपवून  समाधी घेतल्याचे त्यांना समजले.शिवरायांनी लगेचच मौनीमहाराजांच्या मठाच्या बांधकामाचा व समाधी मंदिराचा प्रारंभ स्व-हस्ताने केला.याविषयीचे वर्णन ९१कलमी बखरीतील ७६व्या  कलमात आहे. महाराजांच्या नंतरच्या कोल्हापूरच्या छत्रपतींनीदेखील पाटगावच्या मठाला देणग्या दिल्या आहेत. असे हे योगीपुरुष.पण यांचा पूर्वेइतिहास जगाला माहित नाही पण ते नाथसंप्रदायात योगपुरुष मानले जातात. आत्मज्ञानाच्या अंतिम स्थितीत त्यांनी मौनव्रत धारण केले म्हणून त्यांना मौनी महाराज असं म्हटलं जात.

मठातील वास्तू स्थापत्य 

गर्द झाडीत लपलेला आश्रम 


मौनी महाराज मठाचे प्रवेशद्वार  

आश्रमातील लाकडी स्थापत्य 

                


मंदिराचा सभामंडप 

अशा भावपूर्ण आणि महत्वाच्या प्रसंगाचा साक्षीदार राहिलेला मठ पाहण्याची इच्छा आपल्यासारख्या सर्वसामान्य पर्यटकांची न झाली तरच नवल.कारण हा मठ वर्णनापेक्षा खूपच सुंदर  आहे.हा मठ तटबंदीने बंदिस्त केलेला आहे.मठाचे भव्य प्रवेशदार पहिले कि एखाद्या गढीची  किंवा भुईकोटाची आठवण येते.भव्य लाकडी प्रवेशद्वार,त्यावर नगारखाना,देवड्या हे सारे पाहून आत आलो कि मठाचे अंतरंग आपल्या समोर येत.नारळाची झाडे,समाधी मंदिर ,भक्तनिवासाच्या खोल्या,तहान भागवणारी  विहीर हे सारं काही एका नजरेत येत.सगळंच आखीव-रेखीव आणि ऐसपैस. .चिरे,दगड आणि लाकडात घडवलेलं समाधीमंदिर तर वास्तुस्थापत्यात चिंब भिजलेलं वाटत.भव्य मुखमंडप,सभामंडप,गाभारा अशी याची रचना आहे सुरुवातीचा सभामंडप दगडी भिंतीचा असून आतमध्ये लाकडी खांब उभे करून त्यावर लाकडाचेच केलेले  नक्षीकाम आवर्जून पाहावे असेच आहे.या सभामंडपाला वरती सज्जेही दिसून येतात .बहुधा हा सभामंडप नंतरच्या काळात  बांधला असावा.यानंतर  आपण दगडी प्रवेशदारातुन मुख्य मंडपात येतो.संपूर्ण दगडात कोरलेला नक्षीदार खांबाचा हा सभामंडप देखणा आहे.वास्तू-स्थापत्याचा सुंदर दर्शन या मंडपात घडतं.याला लागूनच गाभारा आहे.आतमध्ये मौनी महाराजांची समाधी आहे.नतमस्तक होऊनच बाहेर पडायचं.

आतमध्ये छत्रपती शिवराय आणि मौनी महाराज यांचे काढलेले शिल्प 

समाधी मंदिराच्या बाहेरील बाजूस संपूर्ण लाकडात बांधलेल्या दुमजली खोल्याही दिसतात.वर जाणेसाठी लाकडी जिनेही दिसतात.बहुधा यांचा वापर पूर्वी भाविकांना राहण्यासाठी होत असावा.मंदिर परिसर मोठा असून या ठिकाणी स्वछताही दिसते.या सर्व ठिकाणाला कोकणी टच लाभलेला दिसून येतो.कौटुंबिक सहलीसाठी हे उत्तम ठिकाण आहे. जेवणाची सोयही गावात होते.


पाटगाव धरण

मठापासून जवळच दोन-तीन किलोमीटरवर पाटगाव धारण आहे.यालाच मौनीसागर जलाशय असे नाव आहे.या काठी उभे राहून जलाशयाचा सुंदर नजाराच  पाहायला मिळतो. या ठिकाणावरून वेदगंगेचे हिरव्यागार वनश्रीने नटलेले खोरे दिसते.चहुबाजूनी जंगलाने वेढलेल्या या ठिकाणचे रुप डॊळ्यातसुद्धा मावत नाही.सूर्यास्तावेळी इथले दृश्य म्हणजे भटकंतीचं उत्कर्षबिंदूच. तासन-तास येथे बसले तरी मन भरणार नाही.

 


पाटगाव धरणाचा रम्य परिसर 

पाट गाव धरणाचा जलाशय 

 निसर्गाच्या सान्निध्यात सहकुटुंब भेट द्यायची म्हटली तर आपल्यासमोर येतात ती महाबळेश्वर-माथेरान-पाचगणी सारखी नेह्मीच्चीच  ठिकाणे .पण सह्याद्रीच्या कुशीतही पाटगाव सारखी नितांत सुंदर ठिकाणे  लपलेली आहेत.थोडं आडवाटेवर आहे पण अजिबात निराश न करणार आहे हे मात्र नक्की.


 जाण्याचा मार्ग 

कोल्हापूर - कागल - गारगोटी मार्गे पाटगाव 


सूचना 

वर्षभर कधीही जाता येते .

पावसाला इथला खास ऋतू

जेवणाची सोय घरगुती पद्धतीची पाटगावात होते.

                                                                                               

पूर्व-प्रकाशित दैनिक लोकसत्ता 

                         

Comments

  1. Its is Heritage site..the Math Architecture is really inspiring considering old days

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कऱ्हे पठारावरचा भक्तीचा मळा !!

पळशी ...एक सुंदर गाव !!

गौताळा अभयारण्याचे अंतरंग