कऱ्हे पठारावरचा भक्तीचा मळा !!
सासवड हे नाव आपण बऱ्याच वेळा ऐकलं आहे किंवा या गावावरून पुढे गेलेलोदेखील असू . संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरच हे महत्त्वाचं गाव . पौराणिक कालापासून देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी कऱ्हामाई व भोगावती ( चांबळी ) यांच्या पवित्र संगमाच्या उत्तर तीरावर वसलेली आहे . पुण्याच्या शेजारीच उभी असलेली सासवडचे भूमी एक वेगळाच आब राखून उभी आहे . पुणे जिल्ह्यातून विविध मार्गाने या सासवडला येता येते . या विविध मार्गाने आपल्याला साबगरखिंड , पांगारखिंड , पानवडीचीखिंड , बोपदेव घाट , पुरंदर घाट , भुलेश्वरघाट , दिवे घाट , शिंदवणेघाट हे घाट लागतात . बापदेव घाटाजवळ एक दक्षिणोत्तर जाणारी डोंगररांग दिसते . पण पुढे हीच डोंगर रंग दोन भागात विभागली जाते ती म्हणजे सिंहगड रांग व पुरंदर रांग . ह्या तिन्हीही रांगामुळे एक मोठे विस्तृत पठार तयार झाले आहे , या पठाराला कऱ्हे पठार म्हणतात . याच कऱ्हे पठारावर सासवड हि पुण्यभूमी वसलेली आ...