मावळच्या खोऱ्यातील “तासुबाई”

 महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर ‘कळसुबाई’ देवीचे छोटेसे मंदिर आहे. हे सर्वानांच माहित आहे. सह्याद्रीच्या सर्वोच्च माथ्यावर वसलेले लाल रंगाचे मंदिर तिथे येणाऱ्या प्रत्येकालाच मोहित करत. केवळ हेच मंदिर नव्हे तर सह्याद्रीच्या इतरही शिखरावर किंवा गड किल्ल्यावर देव- देवतांची विविध रूपे आपल्याला भटकंतीदरम्यान दिसत असतात. किंवा त्याबद्दल आपण वाचत तरी असतो. एवढेच नव्हे तर कित्येक गड- किल्ले तर अशा देव- देवतांच्या नावानेच ओळखले जातात. त्यामुळे एखाद्या खेड्यात आपण जरी गेलो, तरी गावातल्याच टेकडीवर छोटस मंदिर हमखास दिसतच दिसत. इतक घट्ट नाते डोंगरांशी येथल्या देवतांच आहे. यातली काही ठिकाणे प्रसिद्ध पावली तर काही मात्र तेवढ्या भागापुरतीच मर्यादित राहील. या अशा अप्रकाशित अपरिचित ठिकाणांमध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात डोंगराच्या कपारीत असलेले तासुबाई मंदीर हे वेगळे पण अनवट ठिकाण आहे. निसर्गाच भरभरून दान असलेल्या मावळ तालुक्यात पर्यटनासाठी बरीच ठिकाणे उभी आहेत. लोहगड- विसापूर- तुंग- तिकोना- मोरगिरी- कार्ला- भाजे अशी नावाची भलीमोठी जंत्रीच समोर येते. गड- किल्ले- लेण्या मंदीरे आदींबाबत मावळ भाग अगदी समृद्ध आहे. शिवाय येथील भूमीही इतिहासात तावून- सुखावून गेली आहे. येथल्या डोंगररांगावरून कोसळणारे धबधबे तर पुण्या- मुंबईच्या शहरी पर्यटकांना कायमच आकर्षित करीत असतात. पण याच तालुक्यातील काही अनवट व अप्रकाशित ठिकाणे बऱ्याच जणांना माहित देखील नाही. तासुबाई देवीच मंदीरही याच जातकुळीतील. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मंदिर भक्ती आणि पर्यटनाच एक सुंदर ठिकाण बनलय यात काही शंका नाही. त्यामुळे निसर्गाची आवड असणाऱ्यांनी एकदा तरी तासुबाईच्या राउळात माथा टेकवलाच पाहिजे.

डोंगराच्या कुशीतलं तासुबाईचं मंदिर
डोंगराच्या कुशीतलं तासुबाईचं मंदिर

                ... तर या तासुबाई मंदीराला भेट देण्यासाठी सर्वप्रथम मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी वरून आंबळे व नंतर कल्हाट नावाचे गाव गाठायचे. कल्हाटला येण्यासाठी जुन्या मुंबई- पुणे रस्ते महामार्गावरून कान्हे -भोयरेवरून येता येते. एकदा का महामार्गावरून आपण आत शिरलो की,





आमच्या बरोबर आलेले ज्युनिअर ट्रेकर्स 


अस्सल मावळी सौंदर्याचा सारीपाट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. जसजसं आपण आतमध्ये शिरत जातो, तसतसं डोंगररांगाचे विळखे आपल्याभोवती घट्ट होत जातात. मावळी ग्रामजीवन डोळ्यांना सुखावू लागते. इंद्रायणी नदी वाट आडवी करून वाहत असते. 


आंदर मावळच सौंदर्य आपल्याला मोहित करीत असतं

यासाऱ्या लयबद्ध खेळात जेव्हा आपण कल्हाटपाशी येवून पोहचतो, तेव्हा निसर्गाच्या शब्दशः कुशीत बसलेल्या या गावाचा आपल्याला हेवाच वाटून जातो. गावही टुमदार आणि ऐसपैस. सह्याद्री सारखा पाठीराखा असेल तर गावही ऐटीतच असतं म्हणा. या  कल्हाट  गावाला बहुधा प्राचीन इतिहास असावा असे वाटते. कारण उजव्या बाजूच्या डोंगरात एक लेणी कोरलेली अस्पष्टपणे दिसते. या लेणीला कल्हाटची लेणी असे म्हणतात. ही लेणी देखील दुर्लक्षितच. अस्सल भटकेच तिथे जाऊ शकतात एवढी तिची वाट बिकट आहे. त्यामुळे गावच कुतूहल आपल्या मनात आणखीच वाढत जाते. अशा या गावात तासुबाईच मंदीर कुठे आहे अस विचारलं तर अगदी लहान मुल सुद्धा वाट दाखवतील. गावातच आपल्या गाड्या लावायच्या. अन मंदीराकडे निघायचे.

कल्हाटगावातून मंदिराकडे जाणारी वाट 

                दोन डोंगराच्या घळीतून वर जाणारी पायवाट अगदी ठसठशीत आहे. जागोजागी खुणाही केलेल्या दिसतात. त्यामुळे चुकण्याची शक्यता कमीच. पावसाळ्यात तर ही वाट अधिकच बहरते. 


वाटेवर जागोजागी अश्या खुणा पाहायला मिळतात

डोंगराच्या घळीच्या वर आलो कि खाली गावाचं मोठ विहंगम दृश्य दिसते.


चालताना एखाद्या पोझचा मोह टाळता येताच नाही...

साधारण तासाभराच्या चालीनंतर उजव्या बाजूला वळलो की, आपण एका पठारावर येतो. या पठारावर छोटीशी वस्तीदेखील आहे. या पठारावर उभ राहुन मावळच निसर्गसौंदर्य पाहण्यासारखा दुसरा आनंद नाही. छोटी-छोटी कौलारु घर, भातखाचरे, वळणावळणाचे रस्ते, डोंगररांगा हे सार काही निसर्गाच्या कॅनव्हासवर उमटलेल दिसत. कितीही वेळ पाहिलं तरी मात्र आपल मन काही भरत नाही हे नक्की. मग आपोआपच कॅमेऱ्याकडे हात न गेला तरच नवल! असो. पठारावरून पुढची वाट मात्र सपाट चालीची असून वीस मिनिटांतच आपण मंदीरापुढे हजर होतो. 

डोंगराच्या बेचक्यातील हेच ते अप्रतिम मंदिर 

दोन डोंगराच्या बेचक्यातल हे मंदीर पाहून आपण अक्षरशः हर्षोल्हीत होतो. मंदिराच्याच मागे तासुबाई नावाचाच डोंगराचा उंच सुळका भव्यतेची जाणीव करून देतो. तसेच मंदीरासमोर असलेली दरी पाहून छातीही दडपून जाते. मंदीराच्या भौगोलिक विविधतेचे हे सारे खेळ पाहून झाले की, मग मंदीराच्या आवारातून शिरायचे. पूर्वाभिमूख असलेल हे मंदीर गाभारा व सभामंडप पत्रा व खाली फरशी यांचा मिळून बनला आहे. गाभारा मात्र दगडांचा आहे. गाभाऱ्यातील देवीचा तांदळा हा स्वयंभू असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. तसेच ही देवी मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करते असे देखील गावकरी सांगतात. अतिशय प्रसन्न वातावरणात आपणही माथा टेकवून मोकळे व्हायचे. मंदिराचा जिर्णोद्धार गावकऱ्यांनी नुकताच केलेला दिसतो. तसेच मंदीराभोवती पडलेले वीरगळीचे दगड, पाहता मंदीर बरेच जुने असल्याचे जाणवते. 


मंदिरातील देवीचा तांदळा 


मंदिराच्या परिसरातील अशी प्राचीन शिल्पे प्राचीनतेची साक्ष पटवितात


मंदिरातील घंटा

पंचक्रोशीतल्या नागरिकांचा मंदीरात मोठा राबता असून नवरात्रात महिलाही मोठ्या प्रमाणात येथे दर्शनासाठी येत असतात. पंचक्रोशीतले अत्यंत जागरूक श्रद्धास्थान म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते.

                असो मंदीर पाहून आपल्या मनात वेगळेच समाधान उमटते. खरतरं आठवड्याभराच्या ताणतणावातून एक दिवस जरी आपण या ठिकाणी आलो की, मनाला एक वेगळीच उर्जा मिळून जाईल. भक्त म्हणून किंवा निसर्गाचा रसिक म्हणून येथे या. हि वाट मात्र निराश करणार नाही एवढं मात्र नक्की!

सोबतीला जिवाभावाचा ट्रेकर तर हवाच


 जाण्याचा मार्ग 

 तळेगाव एमआयडीसी वरून आंबळे व नंतर कल्हाट नावाचे गाव गाठायचे.किंवा 

 कल्हाटला येण्यासाठी जुन्या मुंबई- पुणे रस्ते महामार्गावरून कान्हे -भोयरेवरून येता येते. 

कल्हाट गावात मंदिराच्या वाटेविषयी चौकशी करावी.


भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी

वर्षभर  कधीही 


सूचना
  • निसर्गाची हानी टाळून  आणि त्याचे पावित्र्य राखूनच भटकंती करावी.



 



Comments

  1. Maval Taluka ani Tasubai device atishay sundar sopya bhashet mahiti...Lekhaka che vishesh kautuk kaeavase vat te

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गौताळा अभयारण्याचे अंतरंग

पळशी ...एक सुंदर गाव !!

जल-व्यवस्थापनाचा आविष्कार असलेली "मंचरची बारव"