निसर्गवारी !!


काही स्थळांना ट्रेकर्स मध्ये मानाचे स्थान आहे.यापैकीच एक अग्रणी ठिकाण म्हणजे भीमाशंकर.भीमाशंकरचा ट्रेक करणारे अनेक ग्रुप नेहमीच वेगवेगळ्या वाटांच्या शोधात असतात. त्यातलीच एक विलोभनीय वाट आहे ती भोरगिरी ते भीमाशंकरची. निसर्गरम्य अशा या वाटेवरून भीमाशंकरला पोहोचण्याचा अनुभव काही वेगळाच आहे.

‘भोरगिरी ते भीमाशंकर’ हा कित्येक पट्टीच्या टेकर्स आणि भटक्यांचा पायी चालण्याचा राजमार्ग आहे. वारकरी ज्या भावनेने विठुरायाकडे पंढरीच्या वारीसोबत पायी चालत जातात, अगदी त्याच भावनेने अनेक जण ‘भोरगिरी ते भीमाशंकर’ यासारखा भन्नाट ट्रेकरूट निवडतात. या दोन्ही भावनेत फरक इतकाच की वारक-यांना पायी चालण्याची ओढ विठुरायाच्या दर्शनासाठी म्हणजेच भक्तीची असते तशीच आपल्यासारख्या ट्रेकर्सना असते ती ओढ निसर्गाच्या प्रेमाची अन् त्याला कवेत घेण्याची. त्यामुळेच डोक्यावर धो-धो पाऊस कोसळत असताना, चिखलवाट तुडवत जाताना, निसर्गाला जवळून अनुभवताना चालत राहणं किती आनंददायी असतं हे इथं आल्याशिवाय बहुधा कधीच कळणार नाही. म्हणूनच अनेक टेकर्स दरवर्षी  अगदी न चुकता भोरगिरी ते भीमाशंकर निसर्गवारी करतात.
भोरगिरी परिसरातील पावसाळ्यातील सुंदर दृश्य 

भोरगिरी येथील धबधबा 
भोरगिरी किल्ल्यावरील लेणे 

हा आनंद एकदा तरी घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातील  राजगुरूनगर गाठायचं. येथूनच एसटीने अथवा स्वत:च्या वाहनाने वाडामार्गे भोरगिरीला डेरेदाखल व्हायचे.गाव तसं अगदी छोटेसे आणि सह्याद्रीच्या कुशीत लशब्दाशः लपलेले आहे. गावातूनच एक वाटाडया घ्यायचा अन् भीमाशंकरकडे कुच करायची.तसा वाटाड्याची गरज अशी  नाही. तरीपण नवख्या पर्यटकांनी घेतला तर उत्तमच. या गावातूनच मळलेली एक वाट भीमाशंकरकडे जाते. या वाटेनेच येथल्या पंचक्रोशीतले ग्रामस्थ पायी भीमाशंकरच्या प्रसिद्ध ज्योतिर्लिग दर्शनासाठी पायी जात असतात. या पायी जाण्याला त्यांच्या आर्थिक  परिस्थितीची किनार असते. डोंगरवस्त्यांवर राहणारे हे गरीब ग्रामस्थ एसटीऐवजी ही बिनखर्चाची पाऊलवाट निवडतात. त्यामुळेच या मळलेल्या वाटेवर अनेक भाविकसुद्धा भेटतात. काही जण भक्तिमार्गासाठी तर काही निसर्गभ्रमंतीसाठी.. कोणतेही कारण निवडले तरी ही वाट निराश मात्र करत नाही एवढं नक्की..!

भोरगिरीवरून निघाल्यानंतर काही मिनिटांतच आपल्याला पहिल्या टेकडीवर पाय-यांची वाट लागते. याच वाटेने छोटी टेकडी पार केल्यावर आपण पुन्हा सपाटीवर येतो. या सपाटीवरून पुढे चालत राहिल्यास तीन मोठे ओढे आपल्याला पार करावे लागतात. ओढे कसले जणू काही छोटय़ा नदय़ाच म्हणा! ऐन पावसाळयात चहुबाजूंच्या डोंगरद-यातून वाहत येणा-या या ओढयांचे रूपांतर जणू काही नदीतच झालेले दिसते. हे ओढे अगदी जीवाच्या आकांताने आपली वाट अडवून धावत असतात. त्यामुळेच हे ओढे थोडे साहस आणि तेवढीच सावधानता बाळगून पार करावे लागतात. यांच्यामधून कमरे एवढया पाण्यातून चालताना पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाचा अंदाज जेव्हा पायाला जाणवतो तेव्हा नवख्या व्यक्तीच्या हृदयात धस्स झाल्याशिवाय राहत नाही. ओढे पार करत असताना स्थानिक वाटाडयाच्या सूचना दुर्लक्षित करण्याची चूक मात्र आपल्या हातून होता कामा नये म्हणजे मिळवले.शक्यतो आपल्याबरोबर दोरी बाळगावी.
हि वाट धुक्याची 
पावसाळ्यात ओढ्यांना नद्यानाचेच रूप येते 



खळाळून वाहणारे ओढे, धबधबे हे जणू या वाटेवरचे सखेसोबतीच. कधी आपली वाट आडवी करून वाहणारे, कधी रस्त्याच्या कडेनेच आपल्यासोबत बोट धरून चालणारे, कधी आपली नजर जाईल तेथे दिसणारे हे पाण्याचे प्रवाह म्हणजे चालणा-या जीवाला विलक्षण आनंद देणारे.. यांच्याबरोबरच डोक्यावर कोसळणारी पावसाची संततधार, धुक्याने ओढलेली चादर हे केवळ अवर्णनीय. हया सा-यांना सोबत घेऊनच दोन तासांत जेव्हा आपण भीमाशंकरच्या घनदाट अरण्यात प्रवेश करतो तेव्हा जवळपास निम्म अंतर पार झालेलं असतं. या अरण्यातून चालताना धीरगंभीर पावसाचा आवाज आणि दूरवर कोसळणा-या धबधब्यांच्या आवाजाचं तांडव आपल्या कानात घुमू लागतं. हे ऐकतच आपल्या चालण्याचा वेग मात्र वाढत असतो.

हे ओढे सावधगिरीने पार करावे लागतात 

आतापर्यंतच्या पायी प्रवासात आपल्या नजरेला फेसाळ, दुधी रंगाच्या पाण्याची सवय झालेली असते. अन् अचानक आपल्या अवतीभवती वाहणा-या पाण्याचा प्रवाहाचा रंग हा हळूहळू बदलत असल्याचं लक्षात येतं. आतापर्यंत पांढरं शुभ्र असणारं हे पाणी त्याच्यासोबत प्लॅस्टिकचा कचरा, फुलं, मैलामिश्रित घेऊन गढूळ रंग परिधान करत धावताना दिसायला लागतं. अन् आपण ओळखायचं की, भीमाशंकर अगदी हाकेच्या अंतरावर आलंय. आतापर्यंत ऐश्वर्यसंपन्न असलेली पायवाट आता मात्र नकोशी वाटायला लागते. हे देणं केवळ आपल्यासारख्या कृतघ्न माणसाचंच. ही उरलेली थोडीशी वाट कशीबशी पार करून भीमाशंकरच्या मंदिरासमोर यायचं. धुक्यात लपलेलं मंदिराचं शिखर बघून धन्य वाटतं. ही पायी निसर्गवारी पूर्ण झाल्याचं समाधानही वाटतं.
अशी गर्द झाडीची वाट आहे 

भीमाशंकर स्थानाची महती ही येथल्या निसर्गातच दडलेली आहे. यासारख्याच अनेक ठिकाणी भगवान शंकराचं वास्तव्य असल्याचं आपण मानत असतो. तीन तासांच्या पायपिटीनंतर जेव्हा आपण मंदिराच्या भवतालच्या व्यावसायिक कोलाहलात येतो तेव्हा मात्र मनाला विषण्ण वाटतं. दर्शनाला आलेल्या बव्हुतांशी भक्तांच्या बेजबाबदार वागण्यामुळे परिसरातल्या निसर्गाचं विद्रुपीकरण झाल्याचं वाईट वाटतं. येथली असलेली गर्दी ही शंकराच्या पिडी दर्शनासाठी धडपडत असल्याचं दिसतं..परंतु आपल्यासारखे भटके मात्र निसर्गातच शंकराचं दर्शन घेऊन आलेले असतात....
















Comments

  1. “Nice info!”
    “Great share!”
    आपल्या लेखनीतून उत्कृष्ट लेखन।

    ReplyDelete
  2. khup avismarniya varavan
    ..konalahi trek karavasa vatel ase

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मित्रा. आपण दोन वर्षांपुर्वी जाऊन आलो होतो.ती आठवण झाली

      Delete
  3. अप्रतिम लिखाण....
    मी स्वत पाच ते सहा वेळा हा भिमाशंकर ट्रेक पूर्ण केला आहे....
    पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य काय आहे हे हा ट्रेक केल्यावर नक्कीच जाणवतो....!!

    ReplyDelete
  4. निसर्गवारी भन्नाटच....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कऱ्हे पठारावरचा भक्तीचा मळा !!

पळशी ...एक सुंदर गाव !!

गौताळा अभयारण्याचे अंतरंग