मी, पाऊस...... आणि सह्याद्री!!
रविवारचा
दिवस होता. बाहेर पाऊस बेभान होऊन धो-धो कोसळत होता. सारी सृष्टी हिरवीगार झाली
होती. या साऱ्या वातावरणाचा मान ठेवून
आम्ही पाच जण पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असलेल्या चाकण
मार्गे राजगुरुनगरहून भोरगिरीला चाललो होतो. सह्याद्रीच्या शब्दशः कुशीत असलेल्या
या भोरगिरीला पावसाळ्यात जायचच हा शिरस्ता खूप वर्षापासून आहे. या नियमाला कारणेही
बरीच आहेत म्हणा. गर्दीच्या गोंगाटापासून दूर आणि लोकांच्या पावसाळी उन्मादापासून हे
ठिकाण अजून तरी बचावलं आहे. आता तिथंही वर्दळ वाढत चालली आहे म्हणा. पण अजून तरी
पाहिजे तसा निसर्गाचा कॅनव्हास बऱ्यापैकी न्याहळता येतो. यामुळे तरी हे ठिकाण
माझ्या पसंतीस उतरलेलं आहे. त्यामुळे मजल-दरमजल करीत या भोरगिरीला सकाळी लवकर
पोहचलो. येथून भीमाशंकरला जायचा बेत होता. भोरगिरी ते भीमाशंकर हा पायी तीन तासांचा
प्रवास म्हणजे पावसाळ्यातला उत्कर्षबिंदूच! जेव्हा आम्ही भोरगिरीला पोहचलो तेव्हा चहूबाजूंनी वेढलेले डोंगर...
त्यावरून कोसळणारे धबधबे... लालसर पाण्याने तुडुंब भरलेली भातखाचरे... हे दृश्य समोर
आले अन अक्षरशः स्तब्धच होऊन गेलो. ज्या निसर्गसोहळ्यासाठी येथे आलो ते पाहून सार्थकी
झाल्यासारख वाटलं. पावसाळ्यात सह्याद्रीच्या कुशीत हमखास दिसणारे हे चित्र माझ्यासारख्या
भटक्याला कायमच वेड लावत आलय.भोरगिरी हे ठिकाण म्हणजे केवळ उदाहरणादाखल येथे दिलय.
सांगण्याचा उद्देश हाच की, पाऊस सुरु झाला की, सह्याद्रीचा कुठलाही कोपरा घ्या तिथे
तुम्हाला असंच डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य दिसेल.
सृष्टीला चेतावणाऱ्या या वरूणराजाचे समस्त
सजीव वर्ग स्वागत करतो. पाऊस आला की, जसा शेतकरी आनंदून जातो, साहित्यकाला नवे
शब्द सापडतात; तशी माझ्यासारख्या दऱ्या- खोऱ्यात फिरणाऱ्या भटक्याला एक अनामिक
उर्जा मिळते.त्यामुळेच पावसाळा सुरु झाला की, घराबाहेर पडायचं हा शिरस्ता कितीतरी वर्षापासून
पाळतोय. तस पाहिलं तर मी तीनही ऋतूत भटकत असतोच. प्रत्येक ऋतूला वेगळी ओळख आहे.
यातला हिवाळा हा रोमांटीक ऋतू म्हणावा लागेल. गुलाबी थंडी, धुक्यात हरवलेला निसर्ग
यात भटकंतीसाठी सार काही जुळून आलेलं असत. त्याउलट उन्हाळा ऋतू म्हणावा लागेल-
डोक्यावर आग ओकणारा सूर्य, अंगाची होणारी लाही-लाही, शरीराचा कस बघणारी
डोंगरभटकंती, जीर्ण झालेली सृष्टी, पानझडीच्या विळख्यात सापडलेलं जंगल यामुळे सारं वातावरणच
रुक्ष वाटत असते. तरीदेखील या ऋतूतील भटकंती बरंच काही देवून जाते.यानंतर येतो तो पावसाळा!
सृष्टीतल्या प्रत्येक घटकाला चिंब भिजवून टाकणारा हा पाऊस एकदा का आला की,
निसर्गाचं रुपडच पालटते. साऱ्या डोंगरदऱ्यात हिरवाईचा उत्सव सुरु होतो. आणि हा
उत्सवच मला अधिक भावतो. या हिरव्या उत्सवात कधी एकदा मी सामील होतो अस वाटत राहत.
यात एक अनामिक उर्जा दडलेली आहे याची मला खात्री वाटते.
पावसाळ्यात
वातावरण कस बहारदार असत. बघा ना, आपण घरात असलो की याचं धारासंगीतही ऐकायला छान
वाटत. घराच्या छतावर- पत्र्यावर- कौलावर आदळून तो आपल्याला बाहेर बोलावत असतो.
अंगाला शहारून टाकणारा गार वाऱ्याचा झोत आपल्या रेंगाळलेल्या पावलांना अगतिक करतो.
खिडकीबाहेरची चिंब-भिजलेली सृष्टी अनावृत्त करते. मी घरात असलो की, पावसाच्या या
अदाकारीने घायाळ होत जातो. मला हा पाऊस एखाद्या जीवाभावाचा मैतरासारखाच वाटत
राहतो. अगदी हक्काने पाठीवर थाप मारून गळ्यात हात घालून बाहेर चल असे म्हणत असतो
आणि आपसूकच मी मैतराच्या या आग्रहाला बळी पडतोच. हातात असलेलं काम क्षणार्धात दूर
करतो. अन घराच्या उंबऱ्याबाहेर पाउल ठेवून या मैत्रीच्या प्रवासाचाच एक भाग होऊन
जातो. येथे एक सांगू का..? सर्दी होईल, ताप येईल यांच्यासाठी हा पाऊस नव्हेच.
अशांनी याच्या वाटेलाही जाऊ नये. अभाग्यासारखा खिडकीतून पाऊस पहात रहावा किंवा
पाऊस पडू नये म्हणून करंट्यासारखी प्रार्थना करीत रहावं. मी अशा लोकांत मोडत नाही
हे माझे सुदैवच. अशा लोकांची किव करण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नसतो म्हणा.
| भातखाचरे |
| भातपिकाची लावणी करणारे शेतकरी बांधव |
| बंधारा |
असो, आताशा
पावसाबरोबर माझा प्रवास सुरु झालेला असतो. हा प्रवास घरापासून सह्याद्रीकडे असा
असतो. प्रत्येक पावसाळ्यात हा होतच असतो. महाराष्ट्राची सांस्कृतिक, भौगोलिक
जीवनरेखा म्हणजे सह्याद्री!! पावसाबरोबर हा सह्याद्रीही फुलतो, बहरतो अन अक्षरश:
पृथ्वीतलावरचा स्वर्गच बनतो. सह्याद्रीच्या कुशीत येवून तुम्हाला काय मिळते..? असा
प्रश्न मला अनेक जण विचारतात. काही जण असेही विचारतात की, येथे येवून काय
पहायचे..? खरोखर, चार भिंतीतच राहिलेल्यांना आणि ‘भटकंती’ हा शब्दही कधीतरी
वापरणाऱ्यांना काय सांगावे असा प्रश्न मला नेहमी पडत असतो. त्यामुळे या
प्रश्नविचारणाऱ्या बापुड्यांना सांगावेसे वाटते की, सह्याद्रीकडे पावसाळ्यात
जाण्यापूर्वी आधी प्रत्येकाने पाऊस ‘समजून’ घ्यायला पाहिजे. याचे ते धुवाधार- धोधो
बरसणे, याची रीमझीम-तांडव, उन-पावसात याचे चाललेले लपछपीचे खेळ, श्रावणातल्या शांत
धारा हे सारे राग तुम्हाला कळायला पाहिजे. याची कलात्मक बाजू तुम्ही ओळखली पाहिजे.
स्पर्शाने अनुभवायला पाहिजे. एकदा का तुम्हाला ‘पाऊसगाणे’ कळाले की, मग तुम्ही सह्याद्रीकडे
या! याच्या कुशीत, भवताली सौंदर्याचे दालन सताड उघड असलेलं दिसेल. येथे तुम्हाला
लालसर पाण्याने भरलेली शेते दिसतील. डोंगराच्या कड्यावरून जीवाच्या आकांताने
कोसळणारे पांढरेशुभ्र फेसाळलेले धबधबे दिसतील. डोंगराच्या कानात गुजगोष्टी करणारे
ढगांचे पुंजके दिसतील, चिखलाने भरवलेल्या पायवाटा दिसतील, झाडांच्या पाना-पानातून
ओंघळणारे पावसाचे थेंब दिसतील. पाण्याचा लोंढा घेवून वाहणारी अवखळ नदी तुम्हाला
आडवी येईल. खट्याळपणे उगाचच इकडे-तिकडे धावणारे ओढे-नाले नजरेस पडतील. अंगावर इरले
घेवून शेतीची कामे करणारा कष्टाळू शेतकरी तुम्हाला दिसेल. अंगावरचे पाणी झटकणारा
एखादा पक्षी झाडाच्या फांदीवर अलगदपणे बसलेला असतो. डोंगरउतारावर सपाटीवर जिकडे
जमिन दिसेल तिकडे उगवलेलं हिरवं गवत दिसेल. डोंगराच्या कुशीत भिजलेलं एखाद खेडे
तुम्हाला थांबवेल.. या आणि अशा कितीतरी गोष्टीत तुम्हाला पाऊस दिसेल. या साऱ्या
गोष्टीत मला तरी पाऊस दिसत आलाय आणि प्रत्येकवेळी आशयपूर्ण वाटत आलाय. या साऱ्यात
मी अगदी गुरफटून जात असतो. पावसाच हे विविध रुपात व्यक्त झालेलं पाहून मी अगदी
हरखुन जात असतो. जे-जे डोळ्यात साठवता येईल, ते-ते साठवतजात असतो. डोळे कमी पडले
की, कॅमेराचा “क्लिक-क्लिकाट” सुरु करतो. तरीही मन भरत नाही.मग शब्दांची मदत घेवून
कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करतो. येथेही शब्द धीटे पडतात. मग मात्र मी हतबल होतो.
पाऊस आणि सह्याद्रीच्या या नात्याला मनोमन हात जोडतो. धन्यवाद देतो. देवाचे आभार
मानतो, की किती भाग्यवान मी या सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलो. या निसर्गसोहळ्याचा
साक्षीदार झालो. हे सार पाहताना, अनुभवताना मला कशा-कशाचही भान राहत नाही. वेळेच
तर नाहीच नाही. हे सर्वकाही भरभरून पहायचच या हट्टापायी पावसात चालत राहतो. या
चालण्याला ध्येय असते ते गडकिल्ल्यांचे, तर कधी आडवाटेवर असलेल्या लेण्यांकडे, तर
कधी हजारो वर्षापूर्वी निर्माण केल्या गेलेल्या प्राचीन मंदिराकडे, तर कधी एखाद्या
रानाकडे! हा प्रवास थांबूच नये अस वाटत असत. अधाशासारखं पावसात फिरणं चालूच राहतं...
पावसात
फिरण्याचा माझा हा प्रवास आजपर्यंत प्रत्येक वर्षी अखंडित सुरु आहे. या प्रवासात
मन विषण्ण करणाऱ्या गोष्टीही दिसत असतात. निसर्ग घाण करणारे, प्लास्टीकचा कचरा
फेकणारे ग्रुप दिसतात. निसर्गाच्या अदाकारीची एवढी नशा समोर असताना दारूच्या नशेत
बाटल्या फेकणारे अभागी तरुणही दिसतात. कधी धबधब्यात भिजण्यासाठी प्राण धोक्यात
घालणारे जीवही धडपडताना दिसतात. कधी धरणात पोहण्यासाठी अतिउत्साही वीरही दिसत
असतात. या साऱ्यांना फिरायचे नसते तर फक्त हुल्लडबाजी करायची असते. यांच्याकडे मी
तर दुर्लक्षच करत असतो. पण आता होतंय काय. या साऱ्या अरसिक पर्यटकांचा विळखा या
सह्याद्रीला पडत चालला आहे. आणि हा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. आडवाटेवर आम्ही
शोधलेलं ठिकाण दुसऱ्या वर्षी गर्दीने कचऱ्याने फुलून गेलेलं दिसतंय. गर्दी वाढली
की, हुल्लडबाजीही वाढते आणि निसर्गही धोक्यात येतोय. हे समीकरण अगदी पक्क आहे.
येथे येऊन निसर्गाची फिकीर कोण करतो? आम्हाला फक्त वीकेंड साजरा करायचा हा उन्माद
आणि मजा या लोकांत असते. यांच्या दृष्टीने पाऊस म्हणजे फक्त ‘चहा आणि भजी’ एवढाच
आहे. मला कधी यांना सांगावस वाटत आणि बऱ्याचदा सांगतोही, अरे वेड्यानो तुम्हाला हा
सह्याद्री आणि पाऊस कळलाच नाही. तुम्ही आधी येथल्या निसर्गाला समजून घ्या. पावसाच
येथल्या निसर्गाशी असलेलं पवित्र नात समजून घ्या. पण समजून घेण्यासाठी ही मंडळी
आलेलीच नसतात. त्यामुळे या गर्दीपासून वाट काढत आपणच दुसरा मार्ग शोधायचा असतो.
आपल भाग्य थोर की, या सह्याद्रीची कुशी बरीच मोठी असल्यामुळे ही वाटही लगेच सापडते
आणि हा प्रवास आणखीनच बहारदार होत राहतो.
असो...
आताही खिडकीबाहेर पाऊस बरसत आहे. डांबरी सडकेवरची चिकचिक, शहरातील गर्दी, रेल्वे-बसची
कोंदट हवा नकोशी वाटत आहे. या साऱ्यांना दूर सारून मी पुन्हा एकदा सज्ज झालोय एका
सुंदर प्रवासासाठी...............

खूप छान, मनापासून आणि शब्दमर्यादेत न पडता लिहिलंय!!आवडलं
ReplyDeleteनवीन आणि चांगलं वाचायला मिळुदे!!
नक्कीच.इथे शब्दांना मर्यादा नाही हे मात्र खर.ब्लॉगचा आग्रह तुझ्यासारख्या काही स्नेही जणांचा होता हे देखील या ब्लॉगच्या निर्मितीस सहाय्यभूत ठरलं आहे. आवर्जून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
Deleteखुपच छान लिखाण शैली.
ReplyDeleteधन्यवाद सर. आपल्यापासुनच घेतलेली हि प्रेरणा आहे.
Delete