गोष्ट एका मंदिराची...!!
"वाघेश्वर" मावळ तालुक्याच्या पश्चिमेला असणारं छोटंसं गाव! तसं पाहिलं तर जिल्ह्याच्याच नव्हे तर तालुक्याच्याही नकाशात हे गाव शोधताना दमछाक होईल. इतकं याचं अस्तित्व लहान आहे.इथला सारा भाग पवनमावळ म्हणून ओळखला जातो.पवना नदीच्या काठचा हा परिसर.मोहक..आणि तितकाच निसर्गरम्य! साधारण पन्नास वर्षांपूर्वी याच गावासारखीच आजूबाजूची काही गावे पवना धरणाखाली गेली आणि आजूबाजूला विस्थापित झाली. या गावच्या जमिनीबरोबरच येथली देवळे, वाडे, घरे आदींना जलसमाधी मिळाली.ह्या साऱ्या वास्तू शिवकाळातील होत्या तर मंदिरे मात्र अगदी हेमाडपंथी धाटणीचीच होती. परंतु हे सारं काही पाण्याखाली गेलं आणि आपण सर्वजण या अनमोल अशा वैभवशाली ठेव्याला मुकलो.तसं पाहिलं तर पवनमावळचा हा सारा परिसरच तुंग-त्रिकोणा-लोहगड-विसापूर अशा ऐतिहासिक किल्ल्यांच्या कोंदणात स्थित आहे. त्यामुळे या अशा किल्ल्यांच्यापायथ्याशी असणारी ही गावेसुद्धा इतिहासातून तावून-सुलाखून निघालेली होती यात शंकाच नाही. मावळातील या किल्ल्यांवर जशी उत्कृष्ट बांधकामे, स्थापत्याची ...