पळशी ...एक सुंदर गाव !!
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असणारे पळशी हे गाव एका दिवसाच्या सहलीसाठी अतिशय सुंदर असे ठिकाण आहे.पळशीचा गढीवजा भुईकोट किल्ला , होळकरांचे दिवाण राहिलेल्या पळशीकरांचा सुंदर लाकडी वाडा , " राही-रखुमाई " नावाचे विठ्ठलाचे देखणे मंदिर , हे सारं काही पळशी गावात पर्यटकांच्या स्वागतास उभे आहे.खरतर महाराष्ट्रात खूप कमी गावे आहेत कि जी इतिहासाने आणि गावातील वास्तुस्थापत्याने ओळखली जातात. अश्या गावात इतिहासाचा संपन्न वारसादेखील वास्तूंमधून पाहावयास मिळतो.त्यामुळेच या अश्या गावात भटकंतीची सारी रूपे याची देही याची डोळा पाहायला मिळतात.या अश्या मोजक्या गावांपैकीच एक गाव म्हणजे पळशी.आडवाटेवर असणारे , पर्यटकांच्या गर्दीपासून दूर असणारे आणि अस्सल ग्रामीण ढंगाचे हे गाव पाहणे म्हणजे सुरेख पर्वणीच ठरावे.त्यामुळेच एखाद्या सुट्टीच्या दिवशी सहकुटुंब कुठे जायचे असेल तर पळशी गावाचा सर्वोत्तम पर्याय तुमच्यापुढे असायलाच हवा.पारनेर पासून पळशी पर्यंत चांगला डांबरी रास्ता असल्यामुळे आणि हे गाव तालुक्यात चांगलेच प्रसिद्ध असल्यामुळे चुकण्याची शक्यता तशी कमीच. पुणे नाशिक महामार्गावरील आळ...