देशभक्तीची स्फुर्तीगाथा सांगणारा "राजगुरू वाडा"
खरं तर भटकंतीदरम्यान आपण कितीतरी जुन्या प्राचीन वास्तू पाहत असतो . या वास्तुंना इतिहासाचा संदर्भ असतो तर काही वास्तू ह्या स्थापत्यकलेने आणि त्यावरील कलाकुसरींनी नटलेल्या असतात . तर काही वास्तू ह्या त्या - त्या शहराची ओळख बनतात . अश्या अनेक सुंदर वास्तू आपल्या जवळपास घेऊन पुणे जिल्ह्यातील खेड हे शहर उभं आहे . पुणे - नाशिक या रस्तेमाहामार्गावर राजगुरूनगर म्हणजेच खेड हे गाव आपल्याला लागत . गावाच्या नावाचा इतिहास मोठा रंजक आहे . हे गाव तसं प्राचीन . सध्याच्या राजगुरूनगराचं प्राचीन काळात नाव होत " खेटक ". काही इतिहासकार " खेट " असंहि सांगतात . याला शिलालेखाचा संदर्भही देतात . गावातल्याच सिद्धेश्वर मंदिरातील शिलालेखात " खेट " म्हणून उल्लेख आला आहे . अपभ्रंशाने या नावाचं पुढं खेड असे नामकरण झाले असावे . आता हे तालुक्याचं ठिकाण झालंय पण या गावाला पुढं ओळख मिळाली ती हुतात्मा राजगुरू यांच्यामुळे . देशासाठी भगतसिंग - सुखदेव आणि राजगुरू यांनी मोठं ब...