सोनोरीचे वैभव !!
महाराष्ट्राला संपन्न असे गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग, स्थळदुर्ग किंवा भुईकोट,अभयारण्ये,प्राचीन मंदिरे असा वारसा लाभला आहे. जगभरात कुठेही नसतील एवढे आणि तेवढेच वैविध्यपूर्ण प्रकारचे गड-किल्ले आपल्याकडे पाहायला मिळतात.पूर्वजांचा पराक्रम आणि स्मृतींना उजाळा देणाऱ्या, आपल्या वास्तुपरंपरेचे समृद्ध दर्शन घडवणाऱ्या, आजही मूकपणे इतिहासाचे कथन करत असलेल्या इमारती म्हणजे आपल्यासाठी सोनेरी पानेच.असच एक पान पुणे जेजुरी रस्त्यावर असणाऱ्या दिवेघाटाच्या तोंडावरच वसले आहे सोनोरी नावाचे.सोनोरी हे सासवडजवळचे सुंदर गाव.दुर्गप्रेमींमध्ये किंवा पर्यटकांमध्ये सोनोरीचा गड किंवा मल्हारगडाचा पायथा म्हणून हे गाव प्रसिद्ध. वेशीच्या आत वसलेले हे टुमदार गाव ‘मंदिरांचे गाव’ म्हणून आपली वेगळी ओळख जपून आहे. पेशव्यांचे तोफखाना प्रमुख भिवराव पानसे यांचे हे गाव. त्यामुळे या गावात इतिहासाने भारलेली आणि वास्तुस्थापत्याने नटलेली काही पाने नक्कीच वाचायला मिळतात.या गावात मराठेशाहीतील बांधला गेलेला सर्वात शेवटचा किल्ला आणि सरदार पानसे यांचा अप्...